कोरोना व्हायरस : WTO म्हणतं जगात 2008 पेक्षाही वाईट मंदी येईल

जागतिक व्यापार

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जागतिक व्यापार
    • Author, अँड्र्यू वॉकर
    • Role, अर्थविषयक प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

जागतिक व्यापारात यावर्षी मोठी घसरण होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं (WTO) व्यक्त केला आहे.

जागतिक व्यापारावर लक्ष ठेवून असणाऱ्या आणि या व्यापाराचं नियमन करणाऱ्या WTOने काळजीत टाकणारं भाकित वर्तवलं आहे.

यावर्षी जागतिक व्यापारात 13 ते 32 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज WTOने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे.

सध्या जग ज्या आरोग्य संकटाचा सामना करत आहे त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा नेमका अंदाज सध्यातरी कुणालाच नाही. याच अनिश्चिततेमुळे व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटामुळे जागतिक व्यापारावर जसा परिणाम झाला होता, त्यापेक्षाही मोठा परिणाम सध्याच्या आरोग्य संकटाचा होऊ शकतो, असं WTOचं म्हणणं आहे.

कोरोना
लाईन

जागतिक व्यापारासंबंधी जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते भयावह असल्याचे WTO चे महासंचालक रॉबर्टो अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला आरोग्य संकटाचा सामना करणं महत्त्वाचं आहे आणि लोकांचे प्राण वाचवण्यालाच सरकारने प्राधान्य द्यायला हवं, असंही अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं, "कोरोनाच्या साथीमुळे आधीच लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यात आता व्यापारात होणारी अपरिहार्य घट यामुळे सामान्यांच्या कुटुंबावर आणि व्यवसायावरही परिणाम होणार आहे."

जागतिक व्यापार

फोटो स्रोत, getty images

फोटो कॅप्शन, जागतिक व्यापार

वस्तूंच्या व्यापारात 13 टक्के घट होणं, तुलनेत आशादायी चित्र असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अर्थात, 2020 च्या उत्तरार्धात म्हणजे पुढच्या काही महिन्यांनंतर आपण आरोग्य संकटातून बाहेर पडू लागलो तरच हे चित्र असू शकेल.

मात्र याची खात्री देता येत नाही. त्यामुळे परिस्थिती सुधारली नाही तर व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो, याचाही अंदाज बांधण्यात आला आहे. तशा परिस्थितीत सुरुवातीला व्यापारात मोठी घसरण होईल. ही घसरण दीर्घकाळ असेल आणि त्यातून परिस्थिती पूर्णपणे सावरली जाणार नाही.

"अनिश्चिततेची शक्यता खूप जास्त आहे आणि म्हणून 2020 आणि 2021 या दोन वर्षांत व्यापारातील घट अंदाजित आकडेवारीच्या वर किंवा खाली असू शकते," असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

या अहवालानुसार जागतिक व्यापार वाढ गेल्या वर्षीच्या अखेरीस मंदावली होती. 2019 च्या अंतिम तिमाहित जागतिक व्यापारात 2018च्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत एक टक्क्याची घट झाली होती.

जागतिक आरोग्य संकटानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी व्यापार महत्त्वाचा भाग असेल आणि संभाव्य व्यापार संकटातून काही प्रमाणात सावरण्यासाठी बाजार खुले ठेवणं महत्त्वाचं असेल, असं अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद सधताना, "हे युद्ध आपण जिंकणार, पण त्यानंतर अर्थव्यवस्थेचं युद्ध असेल. ते लढण्यासाठी आपण सक्षम पाहिजे, ते वेगळं युद्ध सुरू होईल," असं म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)