कोरोना व्हायरस रोगाला आळा घातला, या चीनच्या दाव्यावर खरंच भरवसा करायचा का?

चीनमधल्या ज्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसची साथ सुरू झाली होती, तिथे आता 11 आठवड्यांनंतर लॉकडाऊन उठवण्यात आलाय.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोव्हिड-19 आजाराचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन उठवल्यानंतर अचानक रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत.

एकट्या रविवारी चीनमध्ये 108 नवे रुग्ण आढळले, जे बहुतांश बाहेर आलेले लोक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे खरंच चीनने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अगदी शून्यापर्यंत आणला होता का, असा प्रश्न विचारला जातोय.

आणि त्यामुळेच चीनची ही कमी झालेली आकडेवारी आणि कोरोना संपवल्याचा दावा किती विश्वसनीय आहे, याबाबत सांगत आहेत बीबीसीचे प्रतिनिधी रॉबिन ब्रँट.

गेले अनेक महिने चीन पहाटे तीन वाजता त्यांच्याकडच्या कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर करतो. 7 एप्रिल रोजी चीनने जाहीर केलेली आकडेवारी आहे एकूण रुग्ण 81,740 आणि मृत्यू 3,331.

ज्या देशातून हा विषाणू साऱ्या जगभर पसरला त्या देशाने ज्या सक्षमपणे विषाणू संक्रमणाला आळा घातला, त्याचं जगभर कौतुक झालं. चीनने ज्या 'वेगाने साथ आली असल्याचं शोधून काढलं' आणि चीनने दाखवलेली 'पारदर्शकता', याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस अॅडहॅनॉम गेब्रेयेसूस यांनीही प्रशंसा केली.

खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने चीनचं कौतुक केलं असलं तरी चीनकडून देण्यात येणारी अधिकृत आकडेवारी आणि संक्रमणाला आळा घातल्याचा चीनचा दावा, यावर सातत्याने संशय व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात ब्रिटिश सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री असलेले माइकल गोव्ह यांनी बीबीसीशी बोलातना सांगितलं होतं, "संसर्ग किती पसरलाय, तो किती पसरू शकतो, अशा काही प्रश्नांबाबत चीनचे अहवाल स्पष्ट नव्हते."

संसर्ग आणि मृत्यू याविषयी चीन देत असलेली आकडेवारी कमी असल्याचं जाणवतं, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या आठवड्यात म्हटलं होत. इतकंच नाही तर अमेरिकेच्या एका नेत्याने चीनवर आजारासंबंधीची माहिती दडवत असल्याचाही आरोप केला होता.

जगभरात कोव्हिड-19च्या रुग्णांची आणि या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत अमेरिकेने चीनला खूप आधीच मागे टाकलं आहे. अशा परिस्थितीत ही आकडेवारी कमी कशी करता येईल, यावर चीनने उत्तर द्यावं, अशी अनेकांची अपेक्षा आहे.

मात्र, चीन प्रामाणिकपणे त्यांच्या देशातली आकडेवारी सांगत नसल्याबद्दल चिंता वाढतेय. चीनप्रती वाढत्या अविश्वासामागे काही प्रमाणात त्यांचा इतिहास आहे. तर काही प्रमाणात चीनकडून स्पष्टीकरणाचा अभाव जबाबदार आहे. स्पष्टीकरण दिलं जात नसल्याने त्यांच्याप्रति अविश्वास वाढणं स्वाभाविक आहे.

गुप्त माहितीचा इतिहास

जगाला कुठलीही अधिकृत आकडेवारी देण्याबाबत चीनचा लौकिक काही चांगला राहिलेला नाही, विशेषतः अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारी.

विकासदर हा चीन आणि तिथल्या कम्युनिस्ट सरकारच्या प्रगतीचा प्रमुख निकष आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनावरून बहुतांश राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची वास्तविक कामगिरी समजत असते. मात्र, चीनच्या बाबतीत असं नाही. त्यांची आकडेवारी केवळ एखाद्या गाईडप्रमाणे असते. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेचा ढोबळ अंदाज येतो.

कोरोना विषाणूची साथ येण्याआधी चीनने साल 2020 साठी 6 टक्के विकासदराचं लक्ष्य निश्चित केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे गेली कित्येक वर्ष चीनने आर्थिक विकासदराचं लक्ष्य गाठलं आहे. त्यात जराही गडबड झालेली दिसत नाही.

मात्र चीनबाहेर असणाऱ्या अनेक अर्थतज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चीनसारखी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या इतर कुठल्याच देशाने इतक्या सातत्याने विकासदराचं लक्ष्य गाठलेलं नाही.

कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व असल्यामुळे अशी लक्ष्यं किंवा भविष्यवाणी खरी ठरवली जातात. मग ती उद्दीष्टं वास्तवात गाठली गेली असो किंवा नसो. म्हणजे जे निष्कर्ष पक्षाने ठरवलेलं लक्ष्य पूर्ण करत नसेल ती आकडेवारी दाबली जाते.

काही अंदाजांनुसार चीनचा खरा विकास दर चीनने नमूद केलेल्या आकडेवारीच्या निम्मा आहे. गेल्या काही वर्षात काही स्वतंत्र अर्थतज्ज्ञांनी चीनच्या प्रांत स्तरावरून मिळवलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. चीनने दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा त्यांचा जीडीपी विकासदर खूप कमी आहे, असं या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचं या अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अर्थव्यवस्थेच्या विकासदरावरून चीनवर सातत्याने संशय व्यक्त होत असेल तर कोरोना विषाणुच्या संक्रमणाविषयी चीनने दिलेली आकडेवारीसुद्धा साशंक असू शकते.

सत्य दडवण्याचा प्रयत्न

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहानमधून कोरोना विषाणुचा फैलाव झाला. याच हुबेई प्रांताचे वरिष्ठ कम्युनिस्ट नेते यिंग यॉन्ग यांनी काही दिवसांपूर्वी या प्रांतातील अधिकाऱ्यांना चूक आणि माहिती दडवण्याचे होणारे प्रयत्न रोखावे, अशी तंबी दिली होती.

2019 सालच्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणुचा फैलाव सुरू झाला. मात्र, चीनने सुरुवातीच्या दिवसात विषाणुचं अस्तित्व, त्याचा फैलाव आणि त्यांचं गांभीर्य लपवण्याचा प्रयत्न केला, हे लपून राहिलेलं नाही.

बऱ्याच दिवसांपूर्वी स्वतः वुहानच्या महापौरांनी हे मान्य केलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीला जेव्हा जवळपास 100 रुग्ण आढळले होते ते 23 जानेवारीला संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करेपर्यंतच्या काळात प्रत्यक्ष कृती करण्यात आम्ही कमी पडल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

चीनने 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेला या विषाणुविषयी माहिती दिली होती. मात्र, आपल्याला हेदेखील माहिती आहे की जवळपास त्याच दरम्यान एक डॉक्टर ज्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सार्ससारख्या आणखी एका भयंकर विषाणुची साथ पसरण्याचा धोक्याचा इशारा दिला होता, त्यांना स्थानिक पोलिसांनी दटावलं होतं.

या जागतिक आरोग्य संकटाची धोक्याची घंटा वाजवणारे डॉ. ली वेनलिआंग आणि त्यांच्यासारख्या इतर 'व्हिसलब्लोअर्सचा' आवाज स्थानिक यंत्रणेने दाबून टाकला होता. काही दिवसांनंतर स्वतः डॉ ली वेनलिआंग यांचा कोव्हिड-19 आजारामुळे मृत्यू झाला.

काही आठवड्यांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी वुहानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यादरम्यान हुबेई प्रांत वगळता चीनमधल्या इतर कुठल्याच प्रांतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता.

हॉन्गकाँग युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक बेन काउलिंग यांच्या मते त्यावेळी जी आकडेवारी देण्यात आली ती स्थानिक वृत्तांवर आधारित होती.

मात्र, यातला 'वृत्त' हा शब्द अतिशय महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वुहानचा दौरा करणार होते तेव्हा जपानच्या क्योडो या वृत्तसंस्थेने एका स्थानिक डॉक्टरला कोट करत लिहिलं होतं की कोरोना संसर्गाचे जे नवीन रुग्ण आढळत आहे त्यांना अधिकृत आकडेवारीत जोडण्यात येऊ नये, असे सख्त निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत.

ब्लूमबर्गने यापुढे जात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालासंबंधी वृत्त प्रसिद्ध केलं. या वृत्तानुसार व्हाईट हाऊसला सादर करण्यात आलेल्या अधिकृत गुप्तचर अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की चीने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यातले आकडे मुद्दाम कमी करण्यात आले आहेत आणि ही आकडेवारी खोटी आहे.

आता असा प्रश्न उपस्थित होतो की आकडेवारी दडवण्यामागंच कारण काय? याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जनतेला येऊ घातलेल्या आरोग्य संकटाची चाहुल लागू नये म्हणून किंवा लोकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून किंवा संसर्ग फारसा पसरणार नाही आणि त्याची संपूर्ण माहिती कधीच उघड होणार नाही, या आशेमुळे कदाचित चीनने आकडेवारी दडवण्याचा प्रयत्न केला असावा.

आकडेवारी वादाच्या भोवऱ्यात

चीनने दिलेली अधिकृत आकडेवारी वैध असल्याचं मानलं तरी चीनने आजवर जाहीर केलेल्या अनेक आकडेवारीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत कोव्हिड-19 या आजाराच्या सात वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत.

प्रा. काउलिंग म्हणतात की सुरुवातीला गंभीर न्युमोनिया झालेल्या त्याच रुग्णांवरच लक्ष केंद्रित करण्यात आलं जे वुहानमधल्या समुद्री प्राण्यांची मांसविक्री करणाऱ्या मार्केटशी संबंधित होते.

कोव्हिड-19 च्या नंतर ज्या व्याख्या करण्यात आल्या त्याचे निकष सुरुवातीपासून लागू करण्यात आले असते तर चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आकडेवारी 2 लाख 32 हजारांच्या घरात गेली असती, असा प्रा. काउलिंग यांचा अंदाज आहे.

ते म्हणाले, "आम्हाला वाटतं की सुरुवातीच्या दिवसांमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालं. शिवाय, अनेक रुग्ण असेही आहेत ज्यांच्यात आजाराची कुठलीच लक्षणं दिसत नाहीत."

चीनने गेल्या आठवड्यापर्यंत असिमेटोमॅटिक म्हणजेच ज्यांना विषाणुचा संसर्ग झाला आहे मात्र त्यांना आजाराची लक्षणं दिसत नाही, अशा रुग्णांची आकडेवारीत गणतीच केली नाही.

प्रा. काउलिंग यांनी सांगितलं की जपानमध्ये डायमंड प्रिंसेस क्रूजमध्ये असलेल्या ज्या प्रवाशांना कोरोना विषाणुची लागण झाली होती त्यातील जवळपास 20 टक्के लोकांना या आजाराची कुठलीच लक्षणं नव्हती.

चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग आणि त्यांच्या जवळच्या वर्तुळातल्या लोकांनी आता देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनचे पंतप्रधान आणि चीनच्या राजकारणा दुसऱ्या क्रमांकाचं स्थान असणारे पंतप्रधान ली केकियांग यांनी गेल्याच आठवड्यात आवाहन केलं होतं की "सर्व स्थानिकांनी खुल्या आणि पारदर्शक माहितीसाठी आग्रह धरला पाहिजे."

Sars-CoV-2 या कोरोना विषाणूची आगाऊ सूचना देणारे डॉ. ली आणि त्यांच्यासारख्याच इतरांना ज्यांना सुरुवातीला शिक्षा देण्यात आली त्यांना आता अधिकृतपणे शहीद घोषित करण्यात आलं आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या इटलीसारख्या देशाला चीनने वैद्यकीय मदत आणि औषधं पाठवली आहेत तर दुसरीकडे सर्बियासारख्या गरजू मित्रराष्ट्रालाही मदत केली आहे.

कोरोना विषाणूवरच्या लशीचा माणसांवर करण्यात येणाऱ्या चाचणीचा (ह्युमन ट्रायला) पहिला टप्पा काही दिवसातच पूर्ण होईल, असंही चीनकडून सांगण्यात आलं आहे.

चीन खरी आकडेवारी देतोय की नाही, यावर साशंकतचा असली तरी दुसरीकडे हे मात्र नक्की की या जागतिक आरोग्य संकटातून चीन आता बाहेर पडतोय. इतकंच नाही संपूर्ण जग आज चीनकडे जगाला आरोग्य संकटात ढकलणारा देश म्हणून बघतोय. मात्र, या संकटातून बाहेर काढणारा देश म्हणून आपल्याकडे बघितलं जावं, यासाठी आता चीन प्रयत्न करतो आहे.

हे वाचलंत का?

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)