उद्धव ठाकरे : कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यासाठी निवृत्त सैनिकांनी पुढे यावं

सैन्यदलात ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या निवृत्त सैनिकांना पुढे येऊन आरोग्य सेवेत काम करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे -

1.हा काळ विषाणूंच्या गुणाकाराचा आहे. आतापर्यंत आपण 17 हजार चाचण्या केल्या आहेत. आपल्याकडे आकडा वाढतोय याचा अर्थ समजून घ्या. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आपण रुग्ण येण्याची वाट नाही पाहात. मुंबई, पुण्यात अशा मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत.

2.आपली गैरसोय होतेय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण घरी बसा, घरी राहा. सुरक्षित राहा. घर हेच आपले गडकिल्ले आहेत. हे युद्ध आपण जिंकणार, पण त्यानंतर अर्थव्यवस्थेचं युद्ध असेल. ते लढण्यासाठी आपण सक्षम पाहिजे, ते वेगळं युद्ध सुरू होईल.

3.जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी जर घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. यातून बाहेर पडल्यावरही आपल्याला काही दिवस मास्क वापरावा लागेल. हे मास्क घरच्याघरी चांगल्या कपड्याचा मास्क वापरता येईल. प्रत्येकाने स्वतःचाच मास्क वापरायचाय.

4.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्यासाठी शिवभोजन थाळी योजना आहे. पाच ते सहा लाख लोक आपल्या कँपमध्ये आहेत. एका दिवसात तीनवेळचं अन्न देतोय, म्हणजे दररोज जवळपास 15 लाख लोकांच्या जेवणाची सोय आपण करतोय.

5.केंद्र सरकारचं सहकार्य आहे. केंद्र सरकारची योजना ही अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहे. त्यात गफलत करू नका. केशरी कार्डधारकांसाठी आपण निर्णय घेतला आहे. आपण इतर भार उचलतोय. सध्या केंद्राने अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी फक्त तांदूळ दिलेले आहेत.

6.मध्यमवर्गींयासाठी, ज्यांचं उत्पन्न शहरी भागात मासिक 50 ते एक लाखापर्यंत आहे, त्यांच्यासाठी काहीतरी योजना दिली पाहिजे. मी पंतप्रधानांना तशी विनंती केली आहे.

7.वैद्यकीय साधनांचा जगभर तुटवडा आहे. डॉक्टरांसाठी मास्क आणि किट नाहीत. काही कंपन्या व्हेंटिलेटर्स बनवायला लागल्या आहेत. PPE किटसाठी वेगळं मटेरियल वापरावं लागतं. अशा काही गोष्टी आपण राज्यात बनवतोय. औषधांचा पुरेसा आणि मुबलक साठा आहे, अजून करतोय. केंद्राकडून येतोय. मी तयारीचा आढावा रोज घेतोय. रॅपिड टेस्ट किट वापरायची ज्याक्षणी परवानगी मिळेल, त्याक्षणी जास्तीत जास्त किट आपण महाराष्ट्रात आणू.

8.आपण ठिकठिकाणी तपासणी क्लिनिक सुरू करत आहो. सर्दी, ताप, खोकल्याची लक्षण असतील तर याच ठिकाणी जा. प्रत्येक विभागात हे क्लिनिक असतील. इतर दवाखान्यात जाऊ नको. इथे सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणं तपासली जातील. त्यानंतर पुढे पाठवलं जाईल.

9.आपण राज्यात कोव्हीड हॉस्पिटल उभारतो आहोत. ज्यांना सौम्य लक्षण, मध्यम तसेच तीव्र किंवा गंभीर लक्षण असेल त्यांच्यासाठी असे तीन टप्प्यावरील हॉस्पिटल असतील. या तीनही ठिकाणी डॉक्टर्स असतील. तीव्र किंवा गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी तिसऱ्या प्रकारचं हॉस्पिटल असेल. ते पूर्णपणे सुसज्ज असेल. आपण रुग्णालयांची विभागणी करत आहोत, जेणेकरून कोव्हिडच्या रुग्णामुळे इतरांना लागण होऊ नये.

10.सैन्यदलात ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलं असेल, अशा निवृत्त सैनिकांना मी आवाहन करतोय की त्यांनी पुढे यावं. ज्यांनी वैद्यकीय सेवेचं प्रशिक्षण घेतलं असेल, अशांनी पुढं यावं. तुमची काम करण्याची तयारी असेल तर पुढे या. महाराष्ट्राला आज तुमची गरज आहे. अशांसाठी मेलआयडी देत आहे - [email protected] यावर संपर्क करा. इतर कुणीही त्यावर सूचना किंवा इतरची माहिती टाकू नये, ही विनंती.

11.सगळ्याच गोष्टी भीतीदायक आहेत, असं नाही. चीनमधील वुहानमध्ये 75 - 76 दिवसांनंतर निर्बंध उठवण्यात आले आहे. हे जर ताणलं गेलं तर कुठंपर्यंत जाईल हे यातून दिसते. हे दिवस जातील. यातून आपण बाहेर पडू हे नक्की आहे.

हे वाचलंत का?

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)