कोरोना व्हायरस : 5G मोबाईल तंत्रज्ञानामुळे जास्त प्रसार झाला का? - रिअॅलिटी चेक

    • Author, रेचल स्कॅरिअर आणि एलेनॉर लॉरी
    • Role, बीबीसी रिअॅलिटी चेक

कोरोना व्हायरस जगभरात पसरण्यासाठी 5G मोबाईल सिग्नल जबाबदार आहे का? गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना अशा काही टीकेला सामोरं जावं लागलं आहे, त्यामुळे चीनपासून सुरू झालेल्या कोव्हिड-19 आणि चीनमध्ये अंशतः सुरू असलेल्या 5G मोबाईल टेकनॉलॉजीचा काही न काही संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत दोन प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत - एक म्हणजे 5G तंत्रज्ञान आल्यामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. तसंच हा व्हायरस नेटवर्कच्या रेडिओ लहरींचा वापर प्रसारासाठी करतोय आणि त्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचून प्रसाराचा वेग वाढवत असल्याचं काही जण सांगत आहेत.

पण शास्त्रज्ञांनी हे दावे बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. या व्हायरसचा आणि 5G तंत्रज्ञानाचा एकमेकांशी संबंध असणं जैविकदृष्ट्या अशक्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ सायमन क्लार्क युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगमध्ये पेशीआधारित सुक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, "5G तंत्रज्ञानामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते या विधानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. रोगप्रतिकारक शक्तीवर अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. खूप थकल्यामुळे किंवा नीट जेवण न झाल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते, पण असे चढउतार होत राहतात. आणि इतक्या लहानशा चढउतारांमुळे तुम्ही व्हायरसला बळी पडू शकत नाही."

अतिशय शक्तिशाली रेडिओ लहरीमुळे उष्णता निर्माण होते, हे जरी खरं असलं तरी 5G रेडिओ लहरी लोकांच्या शरीराच्या तापमानात बदल करण्याइतक्या शक्तीशाली नक्कीच नाहीत. मानवी रोगप्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकत नाही हे आधीच्या अनेक अभ्यासातून सिद्ध झालंय.

5G आणि इतर मोबाईल टेक्नोलॉजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरी कमी फ्रिक्वेन्सीच्या असतात. X-Ray किंवा सूर्याची अतिनील किरणे यांच्यासारखी मानवी पेशांना इजा करण्याची शक्ती त्यांच्यात नसते.

ब्रिस्टल युनिव्हर्सिटीत प्राध्यापक असणारे अॅडम फिन सांगतात की 5G रेडियो लहरींव्दारे व्हायरस ट्रान्समिट करणं पूर्णतः अशक्य आहे.

"हा रोग एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो. या व्हायरसवर प्रयोगशाळेत अभ्यासही सुरू आहे. या व्हायरसचा मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नटिक लहरींशी अर्थाअर्थी संबंध नाही. साखर आणि ससा यांच्यात जितका फरक असेल ना, तितकाच मोबाईल फोन आणि या व्हायरसचा आहे," असं ते सांगतात.

इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, 5G तंत्रज्ञान उपलब्ध नसणाऱ्या भागांमध्येही हा व्हायरस पसरतो आहे.

5G नेटवर्क विविध प्रकारच्या रेडिओ लहरींचा वापर करतं. या लहरी नॉन-आयोनायसिंग प्रकारच्या असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजेच या लहरींचा मानवी DNAवर परिणाम होण्याची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे मोबाईल क्षेत्राला यासाठी जबाबदार धरता येऊ शकत नाही.

मार्च महिन्यात नॉन आयोनायसिंग प्रोटेक्शनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत एक अभ्यास केला. हँडसेटच्या रेडिएशनवर काही प्रमाणात मर्यादा आणण्याबाबतचा सल्ला त्यांनी दिला. पण 5G मुळे कॅन्सर किंवा इतर कोणत्याच प्रकारचा आजार पसरत असल्याबाबत कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.

तर, दुसरा एक आरोप नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. यामध्ये बॅक्टेरिया रेडिओ लहरी तयार करू शकतात, असं सांगण्यात आलंय. पण कोरोना व्हायरस हा बॅक्टेरिया नाही तर तो विषाणू अर्थात व्हायरस आहे.

लोक आरोप करत असलेल्या दोन्ही मु्द्द्यांवर शंका येण्याचं आणखी एक कारणही आहे. युकेमध्ये ज्या-ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरलाय तिथं अद्याप 5G नेटवर्क सुरू झालेलं नाही. जपान आणि इराणसारख्या देशांनीही हे तंत्रज्ञान अजूनपर्यंत वापरलेलं नाही, मात्र तिथे या रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड असल्याची नोंद घ्यायला हवी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)