You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः कर्जाचे हप्ते 3 महिने पुढे ढकलण्याची सवलत घ्यावी का?
27 मार्चला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना एक महत्त्वाची सूचना दिली.
या बँका वा वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज घेणाऱ्यांना पुढचे 3 महिने हप्ते परतफेडीसाठी 'Moratorium' - मोरॅटोरियम देण्यात यावा अशी ही सूचना होती. 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीतल्या कर्जाच्या हप्त्यांसाठी हे आदेश होते.
रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं?
1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीतल्या मुद्दल वा व्याजाच्या परतफेडीचे, EMIचे वा क्रेडिट कार्डच्या थकित रकमेचे हप्ते भरण्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात यावी.
Moratorium - मोरॅटोरियम म्हणजे काय?
Moratorium या शब्दाचा अर्थ तात्पुरती स्थगिती. म्हणजे 3 महिन्यांचे तुमचे कर्जाचे हप्ते भरायला तात्पुरती स्थगिती बँकांकडून मिळू शकते. पण याचा अर्थ तुमचे या 3 महिन्यांचे हप्ते वा व्याज रद्द झालं, असा नाही.
फक्त 3 महिने तुम्हाला पैसे न भरण्याची मुभा तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेकडून मिळू शकते. पण या कालावधीनंतर तुमचे हप्ते पुन्हा सुरू होतील आणि या काळामध्ये तुमच्यावर व्याजही आकारलं जाईल.
ही सुविधा कशी मिळेल?
RBIने ही सरसकट घोषणा केलेली नाही. RBI ने बँकांना सूचना दिल्या आहेत, आणि बँका याची अंमलबजावणी करत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी यामध्ये सगळ्या ग्राहकांना ही सुविधा देऊ केली असून, एखाद्या ग्राहकाला ही सुविधा नको असल्यास त्यांनी बँकेला तसं कळवायचं आहे.
पण खासगी बँकांनी मात्र ज्या ग्राहकांना ही सुविधा हवी आहे, त्यांनी संपर्क करावा असं आवाहन केलंय.
खासगी बँकांनी कर्ज घेणाऱ्या सरसकट सगळ्या ग्राहकांसाठी याची अंमलबजावणी केलेली नाही. जर तुम्हाला या 3 महिन्यांमध्ये आर्थिक अडचण असेल, आणि कर्ज परतफेडीचे हप्ते पुढे ढकलायचे असतील, तर तुमच्या बँकेला तसं कळवावं लागेल. तुम्ही कळवलं नाहीत, तर तुमचा हप्ता नेहमीप्रमाणे सुरू ठेवायचा आहे, असं बँका गृहित धरतील.
त्यामुळे जर तुम्ही बँकेला दर महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे परस्पर कापून घेण्याचे अधिकार दिले असतील, आणि तुम्ही बँकेला 3 महिन्यांची सुविधा घेत असल्याचं सांगितलं नाहीत, तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.
कोणत्या कर्जांना लागू?
सर्व प्रकारच्या मुदत कर्जांसाठी ही सुविधा आहे. यामध्ये गृहकर्जं, शेतीसाठीची मुदत कर्जं, पीक कर्जं, गट खरेदीसाठी घेण्यात आलेली कर्ज, या सगळ्यांना हप्त्यांसाठीची स्थगिती सुविधा मिळू शकते.
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
ही सेवा फक्त मुद्दलासाठी की व्याजासाठीही आहे?
1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीतल्या मुदत कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीचं पुनर्आखणी (Re-scheduling) करता येईल. म्हणजे तुमचा पुढचा हप्ता आता 1 जूनला भरावा लागेल.
EMI वर आधारित मुदत कर्जांच्या हप्त्यांसाठी या तीन महिन्यांच्या हप्त्यांना तात्पुरती स्थगिती मिळेल. आणि तुमचा परतफेडीचा कालावधी 3 महिन्यांनी वाढवला जाईल.
सगळ्या उद्योगांनी वा कर्ज घेणाऱ्यांनी हा फायदा घ्यावा का?
केअर रेटिंग्सचे असोसिएट डायरेक्टर सौरभ भालेराव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, वा तुमचं उत्पन्न थांबलं असेल तर तुम्ही या सवलतीचा फायदा घेऊ शकता, पण या 3 महिन्यांच्या कालावधीतही तुमच्या कर्जावर व्याजाची आकारणी चालूच रहाणार आहे आणि नंतर तो भरावा लागणार असल्याचं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच शक्य असेल, वा तुमचा पगार होत असेल तर कर्जाचे हप्ते नियमित सुरू राहू द्या, त्याने तुमची वाढीव व्याजाची रक्कम वाचेल. अडचणीत आलेल्या लहान उद्योग-धंद्यांसाठी मात्र ही 3 महिन्याची स्थगिती नक्कीच फायद्याची ठरेल."
उदाहरणार्थ जर तुमचं कर्ज आहे 1,00,000 रुपये आणि त्यावर दरसाल 12 टक्क्यांनी व्याज आकारलं जातं. तर यानुसार तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये व्याजाचे भरावे लागतात. जर तुम्ही हे तीन महिने हप्ते न फेडता पुढे ढकलायचं ठरवलंत, तरीही 12 टक्के दराने ही व्याज आकारणी सुरूच राहील.
म्हणूनच 3 महिन्यांच्या शेवटी व्याज आणि टॅक्स मिळून 3030.10 रुपये देणं तुमच्या नावावर जमा होईल.
याचप्रकारे जर तुमच्या कर्जावर दरसाल 10 टक्क्यांनी आकारणी होत असेल तर तुम्हाला दरमहा 833 रुपये व्याज भरावं लागतं. यानुसार 3 महिन्यांचे तुम्हाला 2521 रुपये भरावे लागतील.
क्रेडिट कार्डचं काय?
ही सवलत क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठीही लागू आहे. क्रेडिट कार्ड्सच्या बाबतीत एरवी किमान रक्कम भरणं बंधनकारक असतं आणि तसं न केल्यास 'क्रेडिट ब्युरो'कडे त्याचा अहवाल जातो. पण आता RBIने दिलेल्या सूचनांनुसार या 3 महिन्यांच्या थकबाकीचा अहवाल क्रेडिट ब्युरोकडे पाठवला जाणार नाही.
पण इथेही तुमच्या थकित रकमेवर व्याज आकारलं जाईल. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या बँकेकडून या व्याजाच्या प्रत्यक्ष रकमेची खातरजमा करून घ्या. पण या काळात पेनल्टी मात्र आकारली जाणार नाही. पण क्रेडिट कार्डवरचे हे व्याजदर सहसा इतर व्याजदरांपेक्षा जास्त असल्याने विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा असं तज्ज्ञ सांगतात.
गृहकर्ज ग्राहकांसाठी वेगळी संधी
पण सध्याच्या या परिस्थितीत गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी एक वेगळी संधी असल्याचंही सौरभ भालेराव सांगतात. ते म्हणतात, "बँका सध्या गृहकर्जांवरचे त्यांचे व्याजदर कमी करतायत. त्याचा फायदा तुम्ही घेतलात तर एकीकडे तुमचा कर्जाच्या हप्त्याची रक्कम काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण समजा तुम्ही तुमची हप्त्याची रक्कम आधीइतकीच कायम ठेवलीत, तर तुम्हाला तुमच्या कर्जाचा कालावधी कमी करता येईल.
म्हणजे थोडक्यात या कर्जाची परतफेड लवकर करता येईल. यात तुमचा फायदा आहे. बँकांनी व्याजदर कमी केलेले आहेत, रिझर्व्ह बँकेने त्यांचा CRR एका वर्षासाठी कमी केलेला आहे. पुढच्या वर्षी तो कदाचित पुन्हा वाढेल. तेव्हा कदाचित कर्जाचे व्याजदर बँका वाढवतील वा इतकेच राहतील. म्हणून तुम्हाला शक्य असेल, तर आता हा फायदा घेता येईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)