निळ्या रक्ताचे प्राणी जे लोकांचं आयुष्य वाचवतात

एका निळ्या रक्ताच्या खेकड्यांमुळे जगातील अनेक माणसांचा जीव वाचतो, असं सांगितलं तर कुणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. पण हे खरं आहे.

समुद्रात सापडणाऱ्या निळ्या रक्ताच्या खेकड्यांवर जगातील अनेकांचं आरोग्य अवलंबून आहे. हा खेकडा एखादा कोळी किंवा एखाद्या मोठ्या उंदराच्या मिश्र अवतारासारखा दिसतो. यांना अटलांटिक हॉर्सशू खेकडे म्हणून ओळखलं जातं.

हे खेकडे जगातील सर्वात पुरातन जीव आहे. डायनॉसोरच्या काळातही त्यांचं अस्तित्व होतं. सुमारे 450 दशलक्ष वर्षांपासून यांचं अस्तित्व पृथ्वीवर आहे.

अटलांटिक हॉर्सशू खेकड्यांचा प्रजननकाळ मे आणि जून महिन्यापासून सुरु होतो. पौर्णिमेदरम्यान समुद्राच्या भरतीच्या वेळी हे खेकडे येतात.

हे चालते फिरते जीवंत जीवाश्म अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागऱ्यांच्या किनाऱ्यावर प्रामुख्याने आढळतात. या खेकड्यांनी आजपर्यंत लाखोंचे प्राण वाचवले, हे आपलं सुदैव म्हणावं लागेल.

रक्तसाठा

1970पासून शास्त्रज्ञांनी हॉर्सशू खेकड्यांचं निळं रक्त काढण्यास सुरुवात केली. वैद्यकीय उपकरणांमध्ये तसंच शिरेच्या आतून घेतल्या जाणाऱ्या औषधांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वाप करण्यासाठी याचा वापर करता येईल का, याची चाचणी घेण्यात आली.

उपकरणांवरची हानिकारक बॅक्टेरियांची उपस्थिती धोकादायक ठरु शकते. पण हॉर्सशू खेकड्यांचं रक्त हे विषारी बॅक्टेरियांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असतं.

वैद्यकीय उपकरणांच्या माध्यमातून लसीकरण किंवा शिरेमध्ये औषधं सोडत असताना मानवी शरीरात जाण्याची शक्यता असलेल्या घाणीची चाचणी करण्यासाठी या रक्ताचा वापर केला जातो.

मोठा व्यवसाय

दरवर्षी जगात पाच लाख अटलांटिक हॉर्सशू खेकडे जैव-वैद्यकीय वापरासाठी पकडले जातात, अशी माहिती अटलांटिक स्टेट्स मरिन फिशरीज कमिशनने सांगितलं आहे.

हॉर्सशू खेकड्यांचं रक्त हे जगातल्या सर्वात महाग द्रवांपैकी एक मानलं जातं.

लीटरमध्ये याची किंमत मोजायची म्हटल्यास या खेकड्याच्या एक लीटर रक्तासाठी 15 हजार अमेरिकन डॉलर इतके पैसे लागतील.

निळे रक्त कशामुळे?

खेकड्याच्या शरीरातील रक्ताला निळा रंग त्यातील तांब्यामुळे मिळतो. मानवी शरीरात याप्रकारे लोह असतं. त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण शास्त्रज्ञांचा यात इतका इंटरेस्ट असण्याचं कारण फक्त निळा रंग नाही.

तांब्याप्रमाणेच हॉर्सशू खेकड्यांच्या रक्तात एक विशिष्ट रसायन असतं. यामुळे आजूबाजूच्या बॅक्टेरियांना शोधण्यास मदत होते.

अत्यंत कमी प्रमाणात वापरुन सुद्धा हे बॅक्टेरियाची उपस्थिती शोधू शकतं. क्लोटिंग एजंट चाचणी करण्यासाठी वापरला जातो.

अमिबोसाईट लायसेट या अमेरिकेन प्रजातीतील आणि टेकहायप्लिस अमिबोसाईट लायसेट या आशियाई प्रजातीतील चाचणीसाठीही हे वापरण्यात येतं.

रक्त काढल्यानंतर खेकड्यांचं काय होतं?

हॉर्सशू खेकड्यांच्या आवरणावर हृदयाजवळ एक छिद्र केलं जातं. त्यातून सुमारे 30 टक्के रक्त बाहेर काढलं जातं.

त्यानंतर हे खेकडे पुन्हा समुद्रात सोडले जातात.

पण या प्रक्रियेदरम्यान 10 ते 30 टक्के खेकडे मरण पावतात. वाचलेले मादी खेकड्यांना पुन्हा प्रजनन करणं अवघड असतं.

पर्याय काय?

सध्या जगात हॉर्सशू खेकड्यांच्या फक्त चार प्रजाती उरल्या आहेत.

वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत. त्याशिवाय प्रदूषणाचाही या प्रजातींवर परिणाम होत आहे.

जगाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे या खेकड्यांचा वापर करून होणाऱ्या चाचण्यासुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्यांनी विषाणूंच्या शोधासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर करण्याची मागणी केली आहे. पण औषध कंपन्यांच्या मते कृत्रिम पद्धतीचा पर्याय स्वीकारण्यासाठी याप्रकारे विषारी बॅक्टेरियांचा शोध घेता येऊ शकतो, हे सिद्ध झालं पाहिजे. त्यानंतरच हा पर्याय वापरता येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)