You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी मला माझे स्तन काढावे लागले'
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात राहणाऱ्या सॅराफिना नॅन्सला जेव्हा कळलं की तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा तिने प्रतिबंधात्मक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. याला मॅस्टेक्टोमी सर्जरी म्हणतात.
यात कॅन्सर झालेला किंवा होण्याची दाट शक्यता असणारा स्तन ऑपरेट करुन अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकतात. सॅराफिनाने डबल मॅस्टेक्टोमी आणि त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डबल मॅस्टेक्टोमी म्हणजे दोन्ही स्तन काढणे आणि त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन म्हणजे स्तनरोपण करणे.
या सर्जरीमुळे तिची कॅन्सरची रिस्क खूप कमी होणार होती. मात्र, यासाठी तिला तिचे दोन्ही स्तन गमवावे लागणार होते. परिणामी सर्जरी झालेला भाग संवेदनाहिन होणार होता. तो भाग पूर्णपणे बधीर होणार होता.
26 वर्षांच्या सॅराफिनाने या परिणामांसाठी स्वतःच्या मनाची पूर्ण तयारी केली होती. मात्र, रिकन्स्ट्रक्शन सर्जरीने तिला त्या संवेदना परत मिळवून दिल्या आहेत.
'माझा मृत्यू झाला तर?'
सॅराफिनाच्या वडिलांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर सॅराफिनाने स्वतःची जेनेटिक वैद्यकीय चाचणी करुन घेतली. यात तिला तिच्या वडिलांकडून BRCA2 हा कॅन्सरचा जीन (गुणसूत्र) मिळाल्याचं स्पष्ट झालं. या गुणसूत्रांमुळे तिलाही कॅन्सर होण्याचा धोका होता.
डॉक्टरांनी सॅराफिनाला वर्षातून दोनदा ब्रेस्ट स्क्रिनिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने ब्रेस्ट स्क्रिनिंग केलं आणि या पहिल्याच चाचणीत डॉक्टरांना सगळं आलबेल नसल्याचं लक्षात आलं. पहिल्याच एमआरआय स्कॅनिंगनंतर डॉक्टरांनी तिला बायोप्सी करायला सांगितलं.
सॅराफिना सांगते, "रिपोर्टची वाट बघत असताना मी खूप खचून गेले होते. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना म्हटलं आपल्या दोघांनाही कॅन्सर असेल तर? मी मेले तर?"
सॅराफिना आतून हादरली होती. मात्र, तरीही तिने अवघ्या 26 व्या वर्षी डबल मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीत तिचे दोन्ही ब्रेस्ट टिश्यू पूर्णपणे काढून इम्प्लॅन्टच्या मदतीने नवीन स्तन तयार करण्यात येणार होते.
स्तन काढण्याचा सल्ला कुणाला दिला जातो?
मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरीचा सल्ला दोन प्रकारच्या रुग्णांना दिला जातो. एकतर ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, अशा रुग्णांना आणि दुसरं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची हाय जेनेटिक टेंडसी असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक सर्जरी करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना. थोडक्यात ब्रेस्ट कॅन्सर झालेले रुग्ण आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याची दाट शक्यता असणाऱ्या व्यक्तींना ही सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
यूके चॅरिटी ब्रेस्ट कॅन्सर संस्थेत क्लिनिकल संचालक असणाऱ्या डॉ. एमा पेनेरी सांगतात की सॅराफिनासारख्या महिलांना देण्यात येणारी प्रोसिजर आणि ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना देण्यात येणारी प्रोसिजर यात फरक आहे. कॅन्सरवर योग्य पद्धतीने उपचार झाले पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
डॉ. एमा पेनेरी म्हणतात, "ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी स्तनाग्रे किंवा अॅरिओला (स्तनाग्रांजवळचा गडद भाग) याच्या मागे असू शकतात. त्यामुळे कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तुम्हाला बरीच खबरदारी घ्यावी लागते."
या उपचारांचा रिकन्स्ट्रक्शनवरही परिणाम होऊ शकतो, असंही त्या सांगतात.
त्या म्हणतात, "तुम्हाला मिठी मारलेली कळत नाही."
सॅराफिना बर्कलेच्या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करत आहे. सर्जरीविषयी माहिती घेताना तिला विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असल्याचा चांगलाच फायदा झाला.
ती म्हणते, "आपल्याबाबत पुढे काय घडणार आहे, याची पुरेपूर कल्पना असणं फार अस्वस्थ करणारं असतं."
"मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करणाऱ्या महिलांना स्तनांमध्ये संवेदना जाणवत नाहीत. म्हणजे कुणी तुम्हाला मिठी मारल्यावर तुम्हाला त्याची संवेदना जाणवत नाही. किंवा समुद्रात पोहताना लाटांचा स्पर्श जाणवत नाही."
डॉ. पेनेरी सांगतात, "ब्रेस्ट काढणे आणि ते पुन्हा तयार करणे याचे फार विचित्र परिणाम होऊ शकतात. स्तनांचा आकार, निपल, अॅरिओलाचा आकार, ते बरोबर मध्ये आहेत का, अशा बऱ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो."
"मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करताना ब्रेस्टला पुरवठा करणाऱ्या काही वाहिन्या कापतात आणि त्यामुळे तेवढा भाग बधीर होतो."
यासंदर्भात 2016 साली लंडनमधल्या Royal Marsden मासिकात एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. या संशोधनात असं आढळलं की 'मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरीनंतर स्तनांच्या संवेदनशीलतेवर मोठा परिणाम होतो.' मात्र, यापैकी बहुतांश महिलांमध्ये कालांतराने थोडीफार संवेदना परत येते.
हे संशोधन करणाऱ्या टिममधल्या एक सदस्य आणि ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन असणाऱ्या डॉ. आएशा खान म्हणतात, "रिकन्स्ट्रक्शन सर्जरीनंतर संवेदना गमावण्याची यापूर्वी फारशी दखल घेतली जात नव्हती. मात्र, स्त्रिच्या आयुष्यात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असू शकते. शिवाय, या सर्जरीकडे ती कोणत्या दृष्टीकोनातून बघते, यावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो."
मात्र, त्या पुढे सांगतात की आता रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमध्येही नवनवे प्रयोग सुरू आहेत आणि नव्याने इम्प्लॅन्ट केलेल्या स्तनांमध्येही संवेदना राखली जावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात याचा महिलांना मोठा फायदा होईल, असं डॉ. आएशा खान यांना वाटतं.
सॅराफिनाला बराच रिसर्च करून कॅलिफोर्नियामधल्या डॉ. अॅनी पेलेड यांची माहिती मिळाली. डॉ. अॅनी पेलेड ब्रेस्ट कॅन्सर आणि रिकन्स्ट्रक्शन किंवा प्लॅस्टिक सर्जरी एक्सपर्ट आहेत.
त्यांनी स्वतः ब्रेस्ट कॅन्सरचा सामना केला आहे.
'स्तन काढण्याचा निर्णय घेणं अवघड गेलं'
त्या म्हणाल्या, "मला कॅन्सर असल्याचं कळलं तो माझ्यासाठी फार कठीण काळ होता. ब्रेस्ट काढल्याने पुढे आयुष्यभर त्या भागात काहीच संवेदना राहणार नाही आणि वयाच्या 37 व्या वर्षी ब्रेस्ट काढण्याचा निर्णय घेणं, मला फार अवघड गेलं."
अखेर त्यांनी पर्यायी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. आज त्या त्यांच्या पतीसोबत काम करतात. त्यांचे पती नर्व्ह स्पेशलिस्ट आहेत आणि दोघंही संवेदना जतन करण्याच्या नवनव्या पर्यायांवर संशोधन करत आहेत.
डॉ. पेलेड यांनी 2019 च्या उत्तरार्धात सॅराफिना यांच्यावर मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली.
सर्जरीनंतर भूल उतरल्यावर जाग आली तेव्हा सॅराफिनाने सुटकेचा निश्वास टाकला. पुढे तिची रिकव्हरीही उत्तम सुरू झाली.
ती म्हणते, "आता माझ्या उजव्या भागात संवेदना पूर्णपणे परतली आहे. तर डावीकडच्या तीन चतुर्थांश भागात संवेदना जाणवते. शिवाय दिवसागणिक संवेदना हळुहळु परत येत आहे."
सॅराफिना सध्या सोशल मीडियावरुन प्रतिबंधात्मक मॅस्टेक्टोमी आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरीविषयी जनजागृती करते. पीएचडीचा अभ्यास करतेय आणि अंतराळवीराचं प्रशिक्षण मिळावं, यासाठी तिने अर्जही दाखल केला आहे.
हा काळ तिच्या संपूर्ण कुटुंबासाठीच कठीण होता. विशेषतः तिच्या वडिलांसाठी. तिच्या वडिलांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
सॅराफिना सांगते, "आपल्यामुळे आपल्या मुलीला हे गुणसूत्र मिळालं, या सगळ्या दिव्यातून जावं लागलं, सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला, याचं माझ्या वडिलांना फार वाईट वाटलं."
"मात्र, आता सगळं सुरळीत पार पडलं आणि मी जशी होते अगदी 100% तशीच मला परत मिळाली, याचा त्यांना अभिमान वाटत असेल, असं मला वाटतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)