या आरोग्यदायी आहारशैलीपासून पुरूष दूर का पळतात?

    • Author, जारिया गोरवेट
    • Role, बीबीसी फ्युचर

साधारणपणे दोन प्रकारच्या आहारशैली सर्वसामान्यांना माहिती असतात. एक शाकाहारी आणि दुसरी मांसाहारी. मात्र, व्हेगन आहारशैलीचंही बरंच स्तोम आहे. व्हेगन म्हणजे पूर्णपणे वनस्पतींपासून मिळणारे अन्नपदार्थ खाणे.

प्राण्यांपासून मिळणारे कुठल्याही पदार्थाचा या आहारशैलीत वापर केला जात नाही. म्हणजे दूध आणि दुधापासून बनणारे सर्व पदार्थ वर्ज्य. इतकंच नाही तर मधमाशांपासून मिळणारं मधही व्हेगन आहारशैलीत खाल्लं जात नाही.

1947च्या आसपास युरोपात उगम पावलेली ही आहारशैली आज जगभरात पसरली आहे. सेलिब्रेटींमध्ये तर हिच्याप्रती विशेष आकर्षण आहे. फिल्म स्टार्स आणि लोकप्रिय व्यक्तींमुळे व्हेगन आहारशैलीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

माईली सायरस, विनस विलियम्स, अरियाना ग्रँड, बियोन्से या अमेरिकी सेलिब्रिटींना व्हेगन आहारशैलीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हटलं जातं. यांना बघूनच बॉलीवुडमधल्या अनेक सिनेतारकांनीही आपण व्हेगन असल्याचं जाहीर केलं. यात सोनम कपूर, करीना कपूर, मल्लिका शेरावत अशी अनेक नावं आहेत. याशिवाय शाहीद कपूर, आमीर खान, अक्षय कुमार यासारखे काही बॉलीवूड नायकही आपण व्हेगन असल्याचा दावा करतात.

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे व्हेगन पुरूषांच्या तुलनेत व्हेगन स्त्रियांची संख्या बरीच मोठी आहे. व्हेगन लोकांची नेमकी संख्या किती, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेचा सॅम्पल साईज 11 हजार होता. या सर्व्हेमध्ये आढळलं की व्हेगन आहार घेणाऱ्यांमध्ये केवळ 24% पुरूष होते. व्हेगन आहार आरोग्यदायी समजला जातो. तरीही पुरूष या आहारशैलीकडे आकर्षित का होत नसावे?

मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कदाचित पुरूषांना मांसाहार पौरुषत्वाचं लक्षण वाटत असावं आणि फक्त फळ, भाज्या खाल्याने त्यांच्या पौरुषत्वाला धक्का बसत असावा. समाजात त्यांच्याकडे तुच्छपणे बघितलं जातं. हे म्हणजे असं झालं लहानपणी एखाद्या मुलाने बाहुलीची वेणी घालायला घेतली की त्याला चिडवलं जातं तसंच हे आहे.

हा विचार आला कुठून?

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियामध्ये मानसशास्त्रज्ञ असणारे प्रा. स्टीव्हन हाईन सांगतात की सुरुवातीला माणूस पोट भरण्यासाठी शिकार करून मांस भक्षण करायचा. शिकार करणं पुरूषाच्या वाट्याचं काम होतं. समाज या व्यवस्थेची कल्पनाही जेव्हा अस्तित्वात नव्हती तेव्हासुद्धा त्यावेळचा मनुष्य अप्रत्यक्षपणे पितृसत्ताक व्यवस्थेतच जगत होता. पुरूष शिकार करायचे त्यामुळे ते मांस भक्षणाला स्वतःची शान समजायचे.

पुढे मार्केटनेही पुरूषांच्या या विचारसरणीला आणि सवयीला प्रोत्साहनच दिलं. एकोणविसाव्या शतकात महिलांनी पार्ट्यांमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा रेस्टॉरंट आणि जाहिरात कंपन्यांनी खाण्याला दोन भागात विभाजित केलं. डाळ, भाजी, दही हे स्त्रियांचं खाणं म्हटलं जाऊ लागलं तर मांस, मासे, अंडी याला पुरुषांचं जेवण म्हटलं जाऊ लागलं. हेच आपण आजही आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत.

'सॉय बॉय' असा एक शब्द आहे. आहारात सोयाबीन जास्त खाणारी मुलं किंवा पुरूषांना सॉय बॉय म्हणतात. सोयाबीन अधिक प्रमाणात खाल्ल्यास पुरुषांची शारीरिक रचना बदलते, कामेच्छा कमी होते, असं म्हणतात. मात्र, याला शास्त्रीय आधार नाही. तरीही 'सॉय बॉय' हा शब्द शब्दकोशातही आहे. प्रा. हाईन यांचं म्हणणं आहे की रेस्टॉरंटमध्ये सॅलड किंवा भाज्या ऑर्डर करताना अनेक पुरूषांना कमीपणा वाटतो. त्यांना आत कुठेतरी भीती वाटत असते की त्यांच्या पौरुषार्थावर संशय तर घेतला जाणार नाही ना.

'स्त्रिया अधिक मायाळू'

संशोधनात असंही आढळलं आहे की स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत अधिक मायाळू आणि दयाळू असतात. प्राण्यांची त्यांना ओढ असते. कदाचित या कारणामुळेही पुरूषांच्या तुलनेत व्हेगन महिलांची संख्या जास्त असेल. प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या संस्थांमध्येही स्त्रियांचीच संख्या जास्त आहे.

जवळपास 75%. 1940 साली अमेरिकेत प्राण्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या दोन महिलाच होत्या. मात्र, प्राणी आवडणाऱ्या महिला अजिबात मांस खात नाहीत, असंही गरजेचं नाही. अनेक अभ्यासांमध्ये असं आढळलं आहे की प्राण्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांना मांसाहार आवडतो.

खरंतर बाजारात मांसविक्री अशाकाही पद्धतीने होते की घेणारा हे विसरूनच जातो हे की मांस एखाद्या प्राण्याची कत्तल करून मिळवण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ मांसविक्री करणाऱ्या दुकानांमध्ये प्राण्यांचे डोळे, चामडी, जीभ असे अवयव ठेवले जात नाहीत.

कारण दर्शनी भागात असे अवयव ठेवल्यास घेणाऱ्याचं मन बदलण्याची शक्यता अधिक असते. तसंच रेस्टॉरंटमध्येही मांसाहारी खाद्यपदार्थ्यांची वेगवेगळी आणि तोंडाला पाणी सुटेल, अशी नावं असतात. उदाहरणार्थ डुकराच्या मांसाला पोर्क म्हटलं जातं. बकऱ्याच्या मांसाला मटण म्हणतात. ही नावं कदाचित आपल्या हातून पाप घडतंय, ही भावना दूर ठेवण्यासाठी दिली असावी.

मांसाहारी आपण कसे बरोबर आहोत, हे पटवून देण्यासाठी युक्तीवादही करतात. ते म्हणतात सुरुवातीचा माणूस हा मांसाहारीच होता. दुसरं म्हणजे मांस खाल्लं नाही तर निसर्गचक्र कोलमडेल. काहींचं म्हणणं आहे की मांसातून मुबलक प्रमाणात प्रथिनं (प्रोटीन) मिळतात.

1980 साली करण्यात आलेल्या संशोधनात असं आढळलं आहे की आदिम काळात पुरूषच शिकार करायचा. कारण तो जास्त बलवान होता. त्यामुळे असे समाज जिथे मांस खाण्याची प्रथा जास्त आहे ते समाज पुरूषप्रधान आहेत. उलट शेतीवर अवलंबून असणारा समाज समानतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणारा असतो. कारण अशा समाजात महिलांचा वाटाही मोठा असतो.

तर पुरूषांच्या तुलनेत व्हेगन महिलांची संख्या जास्त का आहे, यावर अजून संशोधन सुरू आहे. मात्र, एक मोठं वास्तव हेच आहे की व्हेगन डाएट घेणाऱ्यांमध्ये स्त्रियांचीच संख्या जास्त आहे. याचं एक कारण सहानुभूती असावं, जी पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)