You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मूल ट्रान्सजेंडर आहे म्हणून आई-वडिलांना सहन कराव्या लागल्या यातना
लुईस पाच वर्षांचा आहे. मात्र, त्याला अगदी बालपणापासून मुलींचे कपडे घालायला, मुलींसारखं नटायला आवडतं. त्याच्या या आवडीचा आदर करत त्याचे पालकही त्याला घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी मुलींचे कपडे घालू लागले.
मात्र, समाजातून याला विरोध झाला. हे प्रकरण थेट सरकार दरबारी पोचलं. असं काही होईल, याची लुईसच्या पालकांना कल्पनाही नव्हती.
लुईस, त्याचे वडील सिझर आणि आई मारिया ब्राझीलमधल्या सँटा कॅरोलीना प्रांतात राहतात. ओळख गुप्त ठेवण्यासाठी त्यांची नावं बदलण्यात आली आहे.
2018 पासून लुईसचे पालक त्याला मुलींचे कपडे घालून देतात. मात्र, त्याच वर्षी ब्राझीलच्या महिला, कुटुंब आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या हॉटलाईनवर या कुटुंबाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
लुईसचे पालक त्याला मुलींचे कपडे घालायला भाग पाडतात. परिणामी लुईसला शाळेतली मुलं चिडवतात, त्याचा छळ होते, असं या अज्ञात तक्रारदाराचं म्हणणं होतं.
पुढे हे प्रकरण पब्लिक प्रॉसिक्युशन सर्विस म्हणजे एका अर्थाने कोर्टात वर्ग करण्यात आलं.
लुईसचे वडील सिझर सांगतात, "हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. मला तो सर्व प्रकार मूर्खपणाचा वाटला."
'वडिलांचं हृदयपरिवर्तन'
सिझर एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या मनात समलैंगिकांविषयी एक प्रकारचा तिरस्कार होता.
मात्र, लुईसने मुलींचे कपडे घालण्याचा हट्ट केला तेव्हापासून समलैंगिकांकडे आणि समलिंगी संबंधांकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात बराच बदल झाला आहे.
या तक्रारीमुळे लुईसची आई मारिया यांनाही धक्का बसला. मारिया आणि सिझर यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, त्यासुद्धा लुईसचा सांभाळ करतात. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "ती खूप अवघड परिस्थिती होती. कुणी काहीतरी म्हणेल आणि त्यामुळे लुईसचं मन दुखावेल, याची मला जास्त काळजी होती."
लुईसला मुलींचे कपडे घालायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने मारियाची काळजी आणखी वाढली.
तक्रारीनंतर पोलीसांनी चौकशी सुरू केली. ब्राझीलच्या बालसुरक्षा कायद्यानुसार या सर्व प्रकारामुळे लुईसच्या अधिकारांना गदा येऊ शकते किंवा त्या अधिकारांचं उल्लंघन होऊ शकतं, असं सांगण्यात आलं.
मात्र, चौकशीअंती सादर केलेल्या अहवालाच्या शेवटी अधिकारी लिहितात, मुलाच्या पालकांचं ठाम म्हणणं आहे की मुलींचे कपडे घालण्याची इच्छा त्यांच्या मुलानेच व्यक्त केली आहे.
"उलट हे प्रकरण हाताळताना पालकांनी बरीच परिपक्वता आणि विवेक दाखवला आहे. लुईसला त्याच्या पालकांची भक्कम साथ आहे. त्यामुळे मुलाच्या हक्काला बाधा पोहोचत असल्याचे कुठलेही पुरावे नाही," असं पोलिसांनी सांगितलं.
27 नोव्हेंबर 2018 रोजी ही केस बंद करण्यात आली.
या चौकशीबद्दल लुईसच्या पालकांनी त्याला कधीच सांगितलं नाही.
मारिया म्हणतात, "तो खूप लहान आहे आणि काही गोष्टी त्याला सांगणं आम्हाला योग्य वाटत नाही."
मानसशास्त्रीय सल्ला
लुईसला लुईसा म्हणवून घ्यायला आवडतं, असं त्याचे पालक सांगतात.
त्यांनी बीबीसीलाही तीच विनंती केली. मात्र, हे प्रकरण खूप सुरुवातीच्या पायरीवर आहे. त्यामुळे आम्ही लुईसचा मुलगा म्हणूनच उल्लेख करत आहोत.
जवळपास दोन वर्षांपूर्वी लुईसच्या पालकांनी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं ठरवलं आणि लुईस ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोचले.
सिझर सांगतात, "तो म्हणाला त्याला दाढी आवडत नाही आणि त्याला मुलगा व्हायचं नाही. तो मुलींचे कपडे आणि त्यांच्या अॅक्सेसरिज मागू लागला."
स्वतः पोलीस अधिकारी असलेले सिझर सांगतात सुरुवातीला त्यांना लुईसच्या अशा वागण्याचा त्रास व्हायचा. मात्र, त्यांनी कायम लुईसच्या इच्छांचा आदर केला.
ते म्हणाले, "पोलिसी वातावरणात पूर्वीपासूनच पुरूषांचा वरचष्मा आहे. मी माझ्या मुलावर जरब ठेवायला हवी, असं सगळ्यांना वाटायचं. मात्र, मी थोडा उदार विचार करायचो आणि मी त्याच्या इच्छांचा आदर ठेवला."
"मला अनेकांनी सांगितलं की तुला तुझ्या मुलाची लाज वाटेल. मात्र, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे."
लुईस तीन वर्षांचा असल्यापासून सिझर आणि मारिया लुईझला मुलींसारखे हेअर क्लीप, बो, हेडबँड घालतात.
खेळणी आणि मुलींचे कपडे
अलेक्झॅन्ड्रे सादेह मानसोपचारतज्ज्ञ आणि लैंगिकतज्ज्ञ आहेत. मुल कोणतं खेळणं खेळतं यावरून त्याची लैंगिकता ठरत नाही किंवा त्यातून त्याच्या लैंगिकतेचा अंदाजही बांधता येत नाही, असं ते सांगतात.
ते म्हणतात, "बाळ जन्मताना जे त्याचं लिंग असतं त्याविरोधात त्याचं आचरण असेल तर त्याला तृतीयपंथी म्हणतात."
वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षापासून हे बदल दिसू शकतात, असंही अलेक्झँन्ड्रे यांचं म्हणणं आहे.
अधिक तपशीलवारपणे ते सांगतात, "हे प्रत्येक मुलावर अवलंबून असतं. मात्र, या टप्प्यात त्यांचा रस कशात आहे आणि ते कोण आहेत, हे सूचवू लागतात."
"हे दिसू शकतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतं."
मानवी इतिहासात ट्रान्स बालकं फार पूर्वीपासून आहेत. मात्र, त्यांच्याकडे कधीच लक्ष देण्यात आलं नाही, असं अलेक्झँन्ड्रे यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, "पूर्वीही अशा अनेक केसेस होत्या आणि आताही आहेत. मात्र, त्या पुढे येत नाहीत."
पुढे काय होणार?
लुईसमधला हा संभाव्य बदल कसा हाताळायचा, हे त्याच्या पालकांनी अजून ठरवलेलं नाही.
काही वर्षात लुईसला कायदेशीररीत्या लिंग बदल करण्याची आणि त्यासाठी हार्मोनल ट्रिटमेंट घेण्याची इच्छा होईल, असं त्याच्या पालकांना वाटतं.
सिझर म्हणतात, "मात्र, हे आम्ही कसं करू, याचा विचार आम्ही सध्यातरी करत नाही."
बीबीसीशी झालेल्या या संक्षिप्त भेटीत लुईसने आम्हाला त्याचे मामा आता त्याला स्वीकारत असल्याचं सांगितलं. तो फार आनंदी होता. त्याच्या मते त्याचे मामा धार्मिक आहेत आणि तो मुलींचे कपडे का घालतो हे त्यांना कळत नाही.
आपला निर्णय स्वीकारणं, लोकांसाठी कठीण असल्याचं त्याला कळतं. मात्र, त्याला कसलंही दडपण जाणवत नाही.
वेगळं आहे म्हणून...
तो अगदी मोकळेपणाने सांगतो, "मी वेगळा आहे. मी मुलगा म्हणून जन्माला आलो. मात्र, मी मुलगी आहे. पण, हा काही प्रॉब्लेम नाही."
लुईसला शाळेत मुलींचा गणवेश घालून जायचं आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याची ही इच्छा आहे. 2020 मध्ये तरी आपली इच्छा पूर्ण होईल, असं लुईसला वाटतं.
शाळेत मुलींचा गणवेश घालून गेल्यास इतर विद्यार्थी लुईसला त्रास देतील, असं सिझर यांना वाटतं. मात्र, ते म्हणतात, "मला वाटतं आता वेळ आली आहे. तो सुंदर आणि हुशार आहे. मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे."
भविष्यात बऱ्याच अडचणी येतील, याची लुईसला कल्पना आहे. मात्र, भविष्याबद्दल त्याच्या काही योजना आहेत.
तो म्हणतो, "मला संशोधक किंवा मॉडेल व्हायचं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)