You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण विमान अपघात: युक्रेनच्या विमानावर 'चुकून' हल्ला केल्याची इराणची कबुली
युक्रेनच्या विमानावर अनवधानाने हल्ला केल्याचं इराणच्या सैन्याने म्हटलं आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलने ही माहिती दिली आहे.
शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात हा हल्ला म्हणजे एक मानवी चूक होती असं इराणने म्हटलं आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.
बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत इराणच्या एका क्षेपणास्त्रामुळेच हे विमान कोसळल्याच्या आरोपाचा इराणने इन्कार केला होता.
युक्रेन एअरलाईन्सच्या PS752 हे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 176 लोकांचा मृत्यू झाला होता. इराणने अमेरिकेवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला होता.
इराणने अमेरिकेविरोधात हल्ल्याची तयारी केली होती. त्यामुळे हे विमान म्हणजे अमेरिकेचंच युद्धविमान असेल असा इराणचा समज झाला असावा असा दावा अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी केला होता.
काय घडलं?
युक्रेन इंटनॅशनल एअरलाईन्सचं फ्लाईट क्रमांक PS752 हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. विमानात बहुतांश प्रवासी कॅनडा आणि इराणचे होते.
युक्रेनच्या तेहरानमधल्या दूतावासाने सुरुवातीला या अपघातचं कारण इंजिनात झालेला बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहीवेळाने तपास आयोगाच्या अहवालानंतरच विमान दुर्घटनेचं नेमकं कारण सांगता येईल, असं म्हणत त्यांनी पत्रक माघारी घेतलं होतं.
विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा व्हिझिबिलिटी (दृश्यमानता) चांगली होती आणि विमान चालक दलही अनुभवी होता.
कुठलाही अधिकृत अहवाल येत नाही तोवर या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवू नये, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे.
इराणने या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. ही दुर्घटना म्हणजे दहशतवादी कारवाई नाही, असंही इराणकडून सांगण्यात आलं आहे.
विमानात कोण-कोण होतं?
विमानात 82 इराणी नागरिक, 63 कॅनेडियन नागरिक, चालक दलासह 11 युक्रेनचे नागरिक, 10 स्वीडनचे नागरिक, 4 अफगाणिस्तानचे नागरिक आणि ब्रिटन आणि जर्मनीचे प्रत्येकी 3-3 प्रवासी होते, अशी माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मृतांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे.
मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानात जर्मन नागरिक होते का, याविषयी खात्रीशीर माहिती आपल्याकडे नसल्याचं जर्मनी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
इराणच्या एका अधिकाऱ्याने विमानात 147 इराणी नागरिक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच प्रवाशांपैकी काही जणांकडे दुहेरी नागरिकत्व असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इराणकडून खेद व्यक्त
इराणच्या सैन्याने निवेदनात म्हटलं, "विमान रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या कोरच्या बेसच्या जवळ आलं होतं. अशा परिस्थितीत एक मानवी चूक झाली आणि विमानावर हल्ला करण्यात आला." रिव्हॉल्युशनरी गार्ड त्यांच्या निवेदनात म्हणतात, "ज्याची चूक असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. सैन्याकडूनही व्यापक सुधारणा करण्यात येतील. म्हणजे अशा चुका भविष्यात होणार नाही."
विमान पाडल्याची जबाबदारी घेण्याबाबात इराणवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढला होता. अमेरिका आणि अन्य देशांनी सांगायला सुरुवात केली की इराणच्या क्षेपणास्त्रामुळे हे विमान पडलं. या विमान अपघाताच्या काही वेळापूर्वीच अमेरिकेच्या सैन्यतळावरही इराणने हल्ला केला होता. त्यामुळे इराणवरचा संशय वाढला.
AFP या वृत्तसंस्थेनुसार इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी म्हणाले की युक्रेनचं विमान पाडणं ही एक खूप मोठी दुर्घटना आहे. ज्याने ही चूक केली त्या व्यक्तीची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनीही ट्वीट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "हे अतिशय दु:खद आहे. लष्कराच्या सुरुवातीच्या चौकशीत लक्षात आलं की ही एक मानवी चूक आहे. अमेरिकेने केलेल्या दु:साहसामुळे आधीच संकट ओढवलं आहे आणि त्यात ही घटना घडली. आम्ही या प्रकरणी माफी मागतो. आम्ही लोकांच्या दु:खात सहभागी आहोत."
बुधवारी इराणने इराकमधील अमेरिकी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सुरुवात केल तेव्हा आंतरराष्ट्रीय हवाई मार्गात बदल करण्यात आले होते. अमेरिकेने त्यांच्या विमानानला इराणच्या हवाई क्षेत्राचा वापर न करण्याचा आदेश दिला होता. इराणने तेहरानमध्ये विमानांच्या वाहतुकीवर बंदी का घातली नाही?
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपिओ यांनीही इराणनेच युक्रेनचं विमान पाडल्याचा दावा केला होता. इराणने व्हाईट हाऊसवर लावलेल्या निर्बंधांनंतर पाँपिओ म्हणाले, "आम्हाला असं वाटतं की युक्रेनच्या विमानाला इराणच्या क्षेपणास्त्रानेच मारलं आहे. आम्ही याची चौकशी करत आहोत."
पाँपिओ यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही इराणनेच हा हल्ला केल्याचा दावा केला आहे.
ही 'चूक' का झाली असावी?
युक्रेनच्या विमानावर अनवधानाने हल्ला केल्याचं इराणच्या सैन्याने म्हटलं आहे. पण हे कशामुळे घडलं असावं? BBC Reality Check ने त्याविषयी तज्ज्ञांशी बातचीत केली होती.
इराणनं अमेरिकी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही तासांतच युक्रेनचं विमान कोसळलं. त्यावेळी अमेरिकेकडून प्रतिहल्ला होण्याच्या शक्यतेमुळे इराणचं सैन्य हाय अलर्टवर असावं. त्यात रडारवर दिसलेलं प्रवासी विमान शत्रूचं विमान वाटलं असावं.
जिथे हे विमान कोसळलं तो भाग इराणची राजधानी तेहरानच्या जवळ आहे. तसंच तिथे आसपास इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डसचा तळही आहे. त्यामुळं तिथल्या हवाई वाहतुकीवर रडार ऑपरेटरचं बारकाईनं लक्ष असणं आवश्यक होतं.
प्रत्येक प्रवासी विमानाला ते ज्या देशातलं आहे तिथल्या कोडसह विशिष्ट रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो. विमान हा नंबर, हवेतली स्थिती, उंची याविषयीचे सिग्नल सतत पाठवत असतं. त्यामुळं रडारवर दिसणारं विमान प्रवासी विमान आहे की नाही हे सांगता येतं.
क्षेपणास्त्र डागण्यासाठी वापरली जाणारी रडार सिस्टिम विमानानं पाठवलेल्या सिग्नलवरून हे विमान प्रवासी विमान आहे हे ओळखू शकते. पण त्यात चूक झाली, तर दुर्घटना होऊ शकते. अशा प्रकारे प्रवासी विमान पाडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.
2014 साली युक्रेनमध्ये रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रानं मलेशियन एयरलाईन्सचं MH 17 हे विमान पाडलं, त्यात 298 जणांचा मृत्यू झाला.
1988 साली इराणचं एक प्रवासी विमान अमेरिकन अमेरिकन युद्धनौकेनं केलेल्या हल्ल्यामुळे कोसळलं होतं, त्यात 290 जणांचा जीव गेला.
1983 साली कोरियातलं प्रवासी विमान भरकटून सोव्हिएत हद्दीत गेलं, तेव्हा त्यावर सोव्हिएत फायटर जेटनं हल्ला केला. त्यात 269 प्रवाशांचा जीव गेला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)