ऑस्ट्रेलिया वणवा: 'नासाने जारी केलेला फोटो' म्हणून हे नकाशे होतायत व्हायरल

    • Author, जॉर्जिना रॅनार्ड
    • Role, बीबीसी न्यूज

'ऑस्ट्रेलियात लागलेल्या अभूतपूर्व वणव्याचा हा फोटो नासाने अंतराळातून टिपलाय,' या आशयाच्या मेसेजसह वरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या विनाशकारी संकटाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा फोटो व्हायरल होत असला तरी तो दिशाभूल करणारा आणि चुकीचा आहे. मग या फोटोंचं सत्य काय?

ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या भागात गेल्या सप्टेंबर महिन्यापासून लागलेल्या वणव्यांमध्ये आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे. 2000 घरांचं नुकसान झालं आहे तर लाखो प्राणीही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.

गेल्या आठवड्यात काही भागात पाऊस झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारनंतर तापमान पुन्हा वाढणार असल्याने अग्निशमन दलाचे कर्मचारी पुन्हा तयारीला लागले आहेत.

व्हिज्युअलायजेशनचा चुकीचा अर्थ

ट्विटरवर एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. सुप्रसिद्ध गायिका रिहाना हिनेदेखील हा फोटो ट्वीट केला आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीच्या मोठ्या भागात वणवा भडकल्याचं दिसतंय.

मात्र, हा फोटो खरा नाही. नासाच्या फायर इन्फर्मेशन फॉर रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम या विभागाने वणवा पेटलेल्या भागाचा एका महिन्याचा जो डेटा गोळा केला होता, त्या माहितीच्या आधारे अँथनी हर्से या कलाकाराने केलेलं हे डेटा व्हिज्युअलायझेशन आहे.

हा फोटो दिशाभूल करणारा आहे, अशी टीका जेव्हा सोशल मीडियावर सुरू झाली, तेव्हा स्वतः अँथनी हर्से यांनी इन्स्टाग्रामवर याबाबतचा खुलासा केला.

ते लिहितात, "नासाच्या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे त्यांनी हे चित्र बनवलं होतं. ग्राफिक्सच्या काही तांत्रिक कारणांमुळे चित्रात वणव्याची तीव्रता अधिक जाणवते. मात्र, सध्या काही भागातला वणवा शांत झाला आहे आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी पेटलेल्या वणव्याची माहिती एकत्र करून हे चित्र तयार केलेलं आहे. "

दिशाभूल करणारा नकाशा

ऑस्ट्रेलियाचा ज्वाळांचे चिन्हं असलेला आणखी एक नकाशा सध्या व्हायरल झाला आहे. या नकाशासोबत लिहिलंय, "ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या ठिकामी लागलेल्या आगी."

ऑस्ट्रेलिया सरकारच्या वेबसाईटवरून हा नकाशा घेतलेला आहे. मात्र, या नकाशात दाखवण्यात आलेली ज्वाळांची चिन्हं म्हणजे केवळ पेटलेला वणवा नाही. तर उष्णतेचा कुठलाही स्रोत या ज्वाळांच्या चिन्हांतून दर्शवण्यात आला आहे. त्यात कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा (Gas flares), तेलशुद्धीकरण कारखान्यातील भट्ट्या, उष्णता परावर्तीत करणारे औद्योगिक कारखान्यांचे छत अशा सगळ्यांचा समावेश त्यात असल्याचं ऑस्ट्रेलिया सरकारच्या वेबसाईटवरच दिलेलं आहे.

मात्र, नकाशाचे स्क्रीनशॉट काढून ते पोस्ट केले जातात. त्यासोबत दिलेली माहिती पोस्ट होत नाही आणि त्यामुळे लोकांची दिशाभूल होते.

न्यू साउथ वेल्स राज्यातल्या ग्रामीण अग्निशमन दलाने प्रसिद्ध केलेल्या या नकाशात लाल आणि नारंगी रंगांच्या ज्वाळांच्या चिन्हांच्या माध्यमातून सतर्कतेचे 'सल्ला' ते 'इमरजेंसी वॉर्निंग' असे वेगवेगळे स्तर दाखवले आहेत.

एका नकाशात ऑस्ट्रेलिया खंडाला इतर खंडांशी जोडून वणव्यामुळे प्रभावित झालेला भाग किती मोठा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, हा दावाही पूर्णपणे खरा नसल्याचं काही ट्विटर युजर्सने सांगितलं आहे.

बीबीसीने ऑस्ट्रेलियातील वणव्याचे नकाशे कसे बनवले?

बीबीसी न्यूजने वणव्यासाठी एक व्हिज्युअल गाईड तयार केलं आहे. हे गाईड तयार करण्यासाठी माहितीचे वेगवेगळे स्रोत एकत्र करून नकाशे आणि व्हिज्युअलायझेशन तयार करण्यात आलं आहे.

वणव्याचा नकाशा तयार करण्यासाठी बीबीसीच्या पत्रकारांनी न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया फायर सर्व्हिसने दिलेल्या लाईव्ह फायर मॅपमधून भौगोलिक डेटा घेण्यासाठी पायथन कोडचा वापर केला.

बीबीसीचे डेटा जर्नलिस्ट टॉम हौसडेन सांगतात, "यामुळे वणवा पेटलेल्या भागाचा आकार ऑस्ट्रेलियाच्या नकाशात दाखवण्यासाठी आम्हाला मदत झाली. आम्ही नकाशा रोज अपडेट करतो आणि हे संकट असेपर्यंत आम्ही तो अपडेट करत राहणार."

याशिवाय वणवा कसा पसरतोय हे दाखवण्यासाठी बीबीसी न्यूजने नासाच्या फायर डेटाचाही वापर केला आहे.

नासा सॅटेलाईटच्या माध्यमातून आगीची माहिती गोळा करतं. यात प्रत्यक्ष वणव्यासह गॅस फ्लेअर्ससारख्या आगीच्या इतर स्रोतांचाही समावेश आहे. मात्र, हे इतर स्रोत 1 टक्क्याहूनही कमी असल्याची माहिती नासाने बीबीसीला दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)