You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पूर आला, वणवा पेटला तरीही मी हे जंगल सोडून जाणार नाही'
"माओवादी, महापूर, वणवा... हे सर्व मी अनुभवलं आहे. तरीही मी या जंगलात आनंदाने राहत आलोय. हे जंगल माझं घर आहे आणि मी ते कधीच सोडणार नाही." नव्वदीच्या घरातले चोल नायक आदिवासींचे प्रमुख चेरिया वेलुता सांगत होते.
केरळमधील मेप्पाडीच्या दाट जंगलात वेलुता, त्यांच्या दोन बायका वगळता आता फारसं कुणी उरलेलं नाही.
या जंगलातले अनेक आदिवासी चांगल्या राहणीमानाच्या शोधात आधीच शहरात जाऊन वसले आणि जे मागे राहिले होते, त्यांना केरळ सरकारने ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरानंतर बळजबरीने स्थलांतरित केलं.
प्रशासनानं या महापुराला 1924 नंतरचा या शतकातील दुसरा सर्वांत मोठा पूर घोषित केलं आहे.
भूस्खलनात घर गमावलेल्या आदिवासींच्या पुनर्वसनाची हमी केरळ सरकारने दिली. चोल नायक आदिवासींपैकी अनेक तरुणांनी आधीच मदत छावण्यांचा आसरा घेतला तर काही जण अजूनही कायमस्वरूपी पुनर्वसनाची वाट बघत याच जंगलात कशीतरी गुजराण करत आहेत.
मात्र केरळमध्ये अस्तित्वात असलेल्या या एकमेव शिकारी आदिवासी जमातीतील सर्वांत वयोवृद्ध चेरिया वेलुता यांना आपलं जंगल सोडायचं नाही. आपण अजूनही या जंगलात गुजराण करू शकतो, असा विश्वास त्यांना वाटतो. जन्म आणि मृत्यू तर निसर्गाच्या हाती आहे, यावर त्यांचा विश्वास आहे.
चेरिया यांची भेट घेण्यासाठी आम्ही वायनाड जिल्ह्यातील मुप्पाईनाडू पंचायतीतून आठ किलोमीटरचा ट्रेक चढून गेलो. त्यांचं जंगलाप्रती प्रेम आणि शहरातील सुरक्षित जीवनाला दिलेला ठाम नकार, यामागची कहाणी आम्हाला जाणून घ्यायची होती.
डोंगराच्या त्या पायवाटेवरून जाताना उंचच उंच जंगली झाडांवर वाढलेल्या कंच हिरव्या वेली आम्हाला दिसल्या. वेलुता यांच्या घराकडे जाणाऱ्या वाटेत आम्हाला हत्तीची विष्ठा दिसली. या अर्थ हत्तींचा कळप आमच्या आसपासच होता. या विचारानेच आमचा थरकाप उडाला.
सडपातळ बांध्याचे वेलुता यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांना आमच्याशी बोलायला नकारच दिला. मात्र आमच्यासोबत M. सुनील कुमार होते. वेलुता त्यांना ओळखायचे. सुनील यांनी त्यांना समजावलं तेव्हा ते आमच्याशी बोलायला तयार झाले.
ते आमच्याशी चोल नायक आदिवासी भाषेतच बोलले. मलयाळम-कन्नड मिश्रीत अशी ही बोली आहे. बोलताना मध्येच ते तेलाने चापून चोपून बसवलेल्या आपल्या दाट सोनेरी केसातून हात फिरवायचे आणि एक मोठं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटायचं.
दोन-तीन लहान मुलंही तिथे आसपास खेळत होती. ती मध्येच येऊन आमच्या कॅमेऱ्याकडे कुतूहलाने बघायची.
वेलुतांना आमचा पहिला प्रश्न होता की आदिवासींनी जंगल सोडून गावांत जावं, यासाठी सरकारने अन्न, सुरक्षा आणि निवाऱ्याचं आश्वासन देऊन इतरांचं मन वळवलं. मग त्यांना जंगल का सोडायचं नाही?
वेलुता यांनी मान हलवली आणि म्हणाले, "तुम्ही किती वेळा घाबरून जीव वाचवण्यासाठी पळ काढाल? पाऊस पडल्यावर पूर तर येणारच, हे निसर्गाचं चक्रच आहे. तुम्ही पावसाला घाबरून, पूर येईल म्हणून घाबरून जाऊन जंगल सोडलं तर उद्या कदाचित पाणी नाही म्हणून तुम्हाला मरण येईल."
"कुणाचा मृत्यू कधी होईल, हे कुणालाच माहिती नाही. मृत्यूला घाबरत जगणं मूर्खपणा आहे. खरंच मोठा धोका असेल तर त्याची पूर्वकल्पना निसर्ग देतोच आणि अशा परिस्थितीत कुठे आसरा घ्यायचा, हे मला माहीत आहे," ते सांगतात.
"या जंगलातली झाडं-झुडपं, गुहा, इथली सुरक्षित ठिकाणं, सगळं मला माहीतीये. मी इतकी वर्षं कुठल्याच त्रासाविना इथे आरामात राहत आलोय. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते ती म्हणजे बाहेरची माणसं इथे आणतात ते अन्न आणि आजार."
वेलुता आठवड्यातून एकदा डोंगराच्या माथ्यावर असलेल्या इतर आदिवासींना भेटायला किंवा सरकारने भेटायला बोलावलं असेल तरच आपल्या घरातून बाहेर पडतात.
"माझे आजोबा सांगायचे वणव्यानंतर जंगल आपली सगळी संपत्ती तुमच्यासाठी उघडी करतो आणि पाऊस सगळी घाण धुवून काढतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीव कसा वाचवायचा, हे आम्हाला माहीत आहे. मुसळधार पाऊस किंवा निसर्गाचा कोप झाल्यावर दरवेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत जाण्याला काही अर्थ नाही," असंही ते सांगतात.
2002 सालीही पूर आला होता. त्यावेळी इथली सगळी घरं वाहून गेली होती. त्यावेळीही वेलुता यांनी ही जागा सोडायला नकार दिला होता. उद्याची त्यांना चिंता नाही.
पुरानंतरही तुम्ही इथे या जंगलात कसे राहता, याबद्दल विचारल्यावर वेलुता मोठ्याने हसले आणि म्हणाले, "ही झाडं किती जुनी आहेत मला माहीत नाही. मी लहान असतानाही ही इथेच होती. ती अजूनही वाढतच आहेत. त्यांच्याप्रमाणे मला माझं वयही माहीत नाही. इथे राहणारे आमच्यातले बहुतांश लोक आपलं वय दिवस आणि वर्षांमध्ये मोजत नाही."
"हे आमचं जंगल आहे, असं आम्ही मानतो. सूर्योदय होताच आम्ही उठतो आणि सूर्यास्ताला झोपी जातो."
"जंगलात जे मिळतं तेच मी खातो. गावात कीटकनाशक फवारून पिकवलेल्या भाज्या मी खात नाही. मी टोमॅटोही खात नाही. एखाद दिवशी जंगलात काही मिळालं नाही तर काही हरकत नाही. निसर्ग देईल तेव्हाच आम्ही पोट भरतो."
वेलुता जंगलात मिळणारी कंदमुळं, लहान घोरपड आणि रानडुकरांवर जगतात. मात्र गेल्या काही दिवसात जेव्हा त्यांनी घोरपड खाल्ली तेव्हा त्याची चवही बदललेली होती आणि त्यांचं पोटही दुखलं.
वेलुता म्हणतात, "कदाचित बाहेरून आलेल्या लोकांनी केलेल्या प्रदूषणामुळेच त्या घोरपडींच्या त्वचेवर कुठलातरी संसर्ग झाला असावा."
त्यांच्या मते जंगलाबाहेर गावात कीटकनाशक फवारून पिकवलेल्या फळ-भाज्या इथल्या आदिवासींनी खाल्ल्या तर ते नक्कीच आजारी पडतात, काहींचा तर मृत्यूही ओढावला आहे.
ते म्हणतात, "मला माझं जंगलच सगळं देतो. आमच्यातली अनेक तरुण मंडळी जंगलाबाहेर गावात किंवा काही शहरातही गेली आहेत. त्यांना जाऊ दे. मला त्याचा पश्चात्ताप नाही. शहरात राहणं आम्हा आदिवासींसाठी सोपं नाही."
"नुकताच पल्लकडला रहायला गेलेल्या एका तरुणाला मी गेल्याच महिन्यात वनौषधींनी बरं केलं. मी कुणालाही थांबवत नाही आणि मी कसं जगावं, हे कुणी मला सांगितलेलं मला आवडतही नाही," ते सांगतात.
शहरातल्या समस्या
"शहरातल्या लोकांना इथे जंगलात राहता येईल का? तुम्हाला तरी ते शक्य आहे का? तसंच मीसुद्धा तुमच्यासारखं शहरात जगू शकत नाही. इथे हवा, पाणी, अन्न सगळंच मला माझा निसर्ग देतो."
"तुमच्या शहरात मला अशी शुद्ध हवा, पाणी, अन्न मिळेल का? तुमच्या बाटलीबंद पाण्याने माझा घसा खराब होईल. तुम्ही पिकवत असलेल्या भाज्या मी खाऊ शकत नाही, कारण त्याने माझ्या तब्येतीवर परिणाम होईल. कंदमुळं, मध आणि या जंगलात मिळणारं अन्नच मी खातो."
चोल नायक आदिवासींचा कोणताही विशिष्ट देव किंवा धार्मिक विधी नाही. मात्र त्यांची निसर्गावर आणि पूर्वजांच्या पुण्याईवर अपार श्रद्धा आहे. जंगल सोडलं तर ईश्वर त्यांच्यावर नाराज होईल, असं वेलुतांना वाटतं.
ते म्हणतात, "जंगल सोडा आणि बाहेरच्या जगात चला, असं अनेक सरकारी लोक सांगत असतात. मात्र माझं जंगलच माझं घर आहे. हे तुम्हाला घनदाट जंगल वाटतं. मात्र इथेच मला छप्पर मिळालं आहे आणि त्यामुळेच मी इतकी वर्षं जगलो आहे. मी इथून गेलो तर निसर्गदेवता माझ्यावर नाराज होईल."
"मी इथली झाडं, इथली शांतता, इथल्या पशू, पक्षी, कीटक यांच्या आवाजाच्या प्रेमात आहे."
सळसळणाऱ्या पेरियार नदीकडे बघत वेलुता सांगतात, "या नदीजवळ तुम्हाला एक हत्तीएवढा दगड दिसेल. तिथेच माझ्या आईने मला जन्म दिला. मी ही जागा कशी सोडू? माझ्या पूर्वजांना इथेच पुरलं आहे. ते इथेच आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी त्यांना सोडू शकत नाही. मला इथेच शेवटचा श्वास घ्यायचा आहे."
"सरकार मला सिमेंट-काँक्रीटचं घर देईल. पण माझं हे छप्पर आणि इथली शुद्ध हवा तिथे नसेल. मी इथे जन्मलो आणि म्हणूनच इथेच मरेनही. मी कोणत्याच तरुणाला थांबवत नाही. ज्यांना जायचा आहे त्यांना जाऊ द्या."
1970 पर्यंत या चोल नायक आदिवासींबद्दल बाहेरच्या जगाला माहिती नव्हती. ते गुफेत राहत असल्याने बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्कच नव्हता.
2011च्या जनगणनेनुसार केवळ 124 चोल नायक आदिवासी शिल्लक आहेत. पुरानंतर अनेकांनी जंगलाबाहेर गावात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची संख्या आणखी कमी होईल, असं आमचे गाईड सुनील यांनी सांगितलं.
सुनील यांना ते दिवस आठवतात जेव्हा बाहेरचं कुणी दिसताच हे आदिवासी आपल्या गुफांमध्ये लपून बसायचे. आता मात्र त्यांची भीती दूर झाली आहे.
सुनील सांगतात, "जंगलात येणारे पर्यटक इथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या टाकतात, जंगल संपत्तीचं नुकसान करतात, म्हणून हे आदिवासी नाराज आहेत. त्यामुळेच आता कुणी बाहेरचं दिसलं की हे आदिवासी त्यांच्यावर ओरडतात, त्यांना हाकलून लावतात."
"जंगलात पूर्वी आढळणारी अनेक फळं, चिंचा आता दिसत नाही. झाडावरून फळ कधी आणि कसं काढायचं, हे या चोल नायकांना कळतं. मात्र अनेक बिगर-आदिवासींना माहिती नसल्याने ते थेट झाडच तोडतात. पावसाळ्यात गावातली माणसं, पर्यटक इथे मासे पकडायला येतात. शहरातल्या तथाकथित सुसंस्कृत माणसांनी या आदिवासींचा घास हिरावून घेतला आहे आणि त्यामुळेच सहाजिकच या लोकांना शहरातल्या लोकांचा राग येतो," असं सुनील पुढे सांगतात.
चोल नायक आदिवासींची संख्या कमी होत असल्याचं सांगताना, सुनील म्हणतात, "केवळ पूरच नाही तर इथे येणाऱ्या पर्यटकांचं शोषण, जंगलाची केलेली लूट, यामुळे इथले अनेक आदिवासी गावात राहायला गेले आहेत.
शिकार करून गुजराण करणारे हे आदिवासी आता मात्र जंगलात राहण्याची हिंमत गमावून बसलेत, असं सुनील यांना वाटतं. "आता त्यांना गरिबीची भीती वाटायला लागली आहे. चेरिया वेलुता आणि त्यांच्या दोन बायकांव्यतिरिक्त कुणालाच या जंगलात रहायचं नाही. या मेप्पाडी जंगलाप्रमाणे हे चोल नायक आदिवासीसुद्धा एकदिवस नामशेष होतील," अशी भीती सुनील यांना वाटते.
वेलुताच्या पहिल्या बायकोची मुलगी मिनी हीदेखील लवकरच हे जंगल सोडणार आहे. आपल्या तिसऱ्या बाळाला कडेवर घेतलेली मिनी सांगते, जे तिच्या आई-वडिलांनी सहन केलं ते तिला भोगायचं नाही.
ती म्हणते, "आता आम्ही किमान चांगले कपडे घालू शकतो. सरकार देत असलेला तांदूळ खातो. आमचे पूर्वज कपडेच घालायचे नाही. दशकभरापूर्वीपर्यंत आम्ही गुफेतच रहायचो. लहानपणी या जंगलातून वेचून आम्ही जे खायचो ते तर आता दिसतही नाही. मधही दुर्मिळ झालं आहे."
जंगलाजवळच्या एका सरकारी घरात मिनी एकदा थोडावेळ राहिली होती. त्यातूनच जंगल सोडण्याचा निर्णय घेण्याचं बळ तिला मिळालं.
ती म्हणते, "जंगलाबाहेर राहण्याची मला थोडी काळजी आणि भीती वाटते. पण माझ्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मला जावंच लागेल. बाहेर त्यांना शिक्षण देऊन त्यांना एक चांगलं आयुष्य मी देऊ शकेन, अशी मला आशा आहे."
नुकतेच काही सरकारी अधिकारी आपल्याला भेटल्याचं त्या सांगतात. "मी त्यांच्याकडे शिक्षण, आरोग्य आणि घर यांची मागणी केली. त्यांनी हे सर्व आम्हाला देण्याचं आश्वासन दिलं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)