होळी : नंदुरबारमध्ये 12 दिवस साजरा अनोखा होलीमाय उत्सव

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी

भारतात प्रदेश बदलला की भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि सण साजरे करण्याची पद्धतही. आता होळी म्हटलं की होलीका दहन, रंगांची उधळण आणि पुरणपोळी. पण नंदुरबारमधली आदिवासींची ही होळी जरा खास आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी होळीचा सण खूप मोठा. शेतातली कामं संपत आलेली असतात आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भिल्ल, पावरा, तडवी या आदिवासी जमाती होळी उत्साहात साजरी करतात.

आदिवासींचा होळी उत्सव 10-12 दिवस चालतो. जशी गावोगावी होळी पेटवली जाते, तशी या भागातली 'काठीची राजवाडी होळी' खूप प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यातल्या काठी या गावी होणारी ही होळी 700 वर्षांपासून चालत आली आहे.

आदिवासी राजाच्या राजवटीपासून या होळीची परंपरा आहे, असं म्हटलं जातं. होळीला 'होलीमाय' म्हणायची प्रथा आहे. होळी मातेकडे सुबत्ता आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.

महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण म्हणजेच सेक्स रेशो 977 इतका आहे. आदिवासी भागात स्त्रियांच्या जगण्याचा स्तर उंचावलेला असल्याने हे प्रमाण सकारात्मक दिसतं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)