आर्क्टिक ते वाराणसी : हे आहेत जगातले सर्वांत भारी ट्रॅव्हल फोटो

पैसे भरावे लागू नये म्हणून बांगलादेशातली ही महिला धावत्या एक्स्प्रेसच्या एका कॅरेज लॉकिंग सिस्टीमवर बसून प्रवास करत आहे.

हा फोटो जी.एम.बी. आकाश यांनी काढला आहे. ते 2009 मध्ये 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इअर'चे विजेते होते.

हा फोटो लंडनमधल्या ग्रीनीच न्यू फ्री एक्झिबिशनमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. या स्पर्धेच्या काही परिक्षकांचा गेल्या 14 वर्षांतला हा सर्वांत आवडता फोटो असल्याचं म्हटलं आहे.

या प्रदर्शनातले असेच काही आणखी फोटो.

2003, होई एन, व्हिएतनाम

मायकेल मॅटलाच, अमेरिका

परीक्षकांची प्रतिक्रिया : होई एन इथे सकाळी भरणाऱ्या बाजारातले रंग आणि प्रत्येक क्षण, फोटोग्राफर मायकेल मॅटलाचने टिपले आहेत. या एका फोटोमधून बाजाराची सगळी गंमत उलगडते.

2004, कोलेंज, माली

रेमी बेनाली, फ्रान्स

कडक उन्हाळ्यात मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि त्याचा आनंद हा असा लुटला जातो.

2005, हवाना, क्युबा

लॉर्न रेस्नीक, कॅनडा

फोटोग्राफर लॉर्न रेस्नीक : मी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या अंगणात शिरलोच होतो, आणि काही कारणासाठी मी मागे एक नजर टाकली. तिथे मी एका महिला दुसरीला अंडं देताना पाहिलं आणि ते टिपलं. मी पहिल्यांदाच खिडकीतून होणारा असा व्यवहार पाहत होतो.

2005, नेदरलँड्स

जेरार्ड किंगमा,नेदरलँड्स

परीक्षकांची प्रतिक्रिया : जेरार्ड किंगमा यांनी या मेंढीच्या परिवारावर लक्ष केंद्रित केलं आणि हे प्रेक्षणीय चित्र टिपले. साहजिकच त्यांनी 'मोमेंट ऑफ फ्रीडम' अर्थात 'स्वातंत्र्याचा क्षण' या थीमवर आधारीत ही स्पर्धा जिंकली.

2005, जलिस्को, मेक्सिको

टॉड विंटर्स, यूएसए

मेक्सिकोच्या तेपाटिटलान मध्ये रस्त्याच्या कडेला एक टोपी विक्रेता बसला होता. पण या एका फोटोमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत -- हा विक्रेता झोपा काढत आहे का?

डाव्या टोकाला जो टोपीचा स्टँड रिकामा आहे, त्यानं त्यावरचीच टोपी घातली आहे, की त्या स्टँडवरची टोपी विकली गेली आहे?

२००९, मथुरा, उत्तर प्रदेश, भारत

पारस चौधरी, भारत

रंगांचा सण ओळखला जाणारा होळी हिंदूंमध्ये खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. असं म्हणतात, होळीनंतर हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागते.

2011, कॅनेडियन आर्कटिक

थॉमस कोकाता, जर्मनी

फोटोग्राफर थॉमस कोक्ता : 2011 हे वर्ष मोठ्या सौरवादळांचं असणार हे माहिती होतं. नॉर्दर्न लाइट्स अर्थात 'ऑरोरा बोरियालीस'साठी हे एक कमालीचं वर्ष असणार हे गृहित धरून मी तीन आठवडे कॅनेडियन आर्क्टिकमध्ये मुक्काम ठोकला. हे विस्मयकारक क्षण टिपण्यासाठी मी -40 ते -45 डिग्रीच्या तापमानात तग धरून बसलो होतो.

2011, व्हाईट सी, कॅरेलिया प्रांत, उत्तर रशिया

फ्रँको बेनफी, स्वित्झर्लंड

फोटोग्राफर फ्रँको बेनफी : बेलूगा देवमासा पोहत माझ्याजवळ आला आणि मला स्पर्श करण्याआधीच तो वळला. अशी त्यानं अनेकदा हूल दिली. त्यामुळे मला त्याचे बरेच फोटो काढायला मिळाले. तो आक्रमक नव्हता, त्याला फक्त खेळायचं होतं.

2012, ओमो रिवर व्हॅली, इथिओपिया

जॅन श्लेगल, जर्मनी

फोटोग्राफर जॅन श्लेगल : बीवा हा कारो आदिवासी अत्यंत प्रतिष्ठित योद्धांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने तीन सिंह, चार हत्ती, पाच बिबटे, १५ म्हशी, अनेक मगरी आणि शेजारच्या आदिवासींसोबत झालेल्या युद्धात अनेक लोकांनाही मारल्याचं तो खूप अभिमानाने सांगतो.

त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, "आता काळ बदलला आहे. आता शिकार करायला परवानगी मिळत नाही." त्याला पूर्वजांच्या जुन्या परंपरांचीही आठवण येत, असं तो मला म्हणाला.

2012, सायबेरिया, रशिया

अॅलेसेंड्रा मेनिकोनझी, स्वित्झर्लंड

आर्क्टिक खंडातली ही एक मुलगी सरपण गोळा करते आहे. नेनेट्स हे या प्रदेशात अतिशय खडतर परिस्थितीत राहतात. ते रेनडिअरच्या कातड्यापासून फरपासून बनवलेल्या तंबूत राहतात, ज्याला 'चम' म्हणतात.

2013, फूकेट, थायलंड

जस्टिन मॉट, यूएसए

फोटोग्राफर जस्टिन मॉट : हा फोटो सर्वांना कोड्यात पाडणारा आहे : ज्या तळ्यात ही मुलगी पोहते आहे, त्यातच तो हत्ती आहे मग त्याचे पाय का दिसत नाही आहेत?

याचं उत्तर एकदम सोपं आहे. हा हत्ती पाण्यात नाहीच. ही मुलगी एका मोठ्या पूलच्या वरच्या भागात पोहत असून हत्ती तिच्या मागे जमिनीवर उभा आहे.

हा फोटो काढण्यासाठी मला माझा कॅमेरा घेऊन पाण्यात उतरावं लागलं. मी माझ्या कॅमेराला वॉटरप्रूफ बॅगेत कव्हर केलं आणि अर्धा कॅमेरा पाण्यात आणि अर्धा पाण्याच्या वर धरून हा फोटो काढला."

2014, मरा नदी, उत्तर सेरेन्गटी

निकोल कॅंब्रे, बेल्जियम

"जंगली प्राण्यांचा एक कळप पावसामुळे गोंधळला आणि दोन्ही बाजूंनी नदी पार केली. एक मोठ्या कळपासोबत पुढे जाण्यासाठी एका छोट्या कळपाने पुन्हा ती नदी पार करण्याचा प्रयत्न केला, पण ते एका मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले. या एका जीवानं क्षणभरचीही वाट न पहता दुसऱ्या छोट्या कळपावर उडी मारली."

2014, किन्शासा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ

जॉनी हेगलंड, नॉर्वे

"लेस सापेरस" हा विशिष्ट तरुणांचा गट किन्शासाच्या रस्त्यावर महागडे डिझायनर कपडे घालून फिरत असतो. त्यांच्या आजूबाजूला कितीही गरिबी असली तरी त्यांच्या पेहराव्यावरून हे काही दिसत नाही. जरी त्यांचे कपडे काँगोमधल्या इतर लोकांपेक्षा वेगळे असले तरी त्यांचं जीवन साधारणच असतं. त्यांना मुलं-बाळं आहेत आणि ते सामान्य नोकरी करतात.

2015, अटचाफलाय बेसिन, लुइसियाना, अमेरिका

मार्सेल व्हॅन ऊस्टन, नेदरलँड्स

फोटोग्राफर मार्सेल व्हॅन ओस्टेन : "अॅचाफालाय बेसिन हे अमेरिकेतलं सर्वांत मोठं वेटलँड. सकाळच्या धुक्यातून इथल्या विशाल सायप्रस वृक्षराजीतून वाट काढत जाणाऱ्या कयाकचा हा फोटो. माझ्या फोटोंमध्ये मला गोंधळ-गुंता आवडत नाही. आकार आणि रेषांना मी मोठं महत्त्व देतो. पण लुइझानामधल्या या दलदलीमध्ये नेमकं तेच आहे - गुंता."

( 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द ईयर'च्या सौजन्याने. सर्व छायाचित्रकॉपीराईट्स अबाधित आहेत.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)