वाराणसीचं ‘कन्यापीठ’ : मुलींच्या आध्यात्मिक शाळेतला एक दिवस

वाराणसीमध्ये मुलींसाठी पारंपारिक निवासी शाळा आहे, जिथं शिक्षणाला आध्यात्माची जोड आहे.

वाराणसीतील मा आनंदमयी कन्यापीठ मुलींसाठी एक मठ आहे. या गुरुकूलमध्ये विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षिकांसोबतच राहतात. या विलक्षण पारंपारिक शाळेला फोटोग्राफर पारोमीता चॅटर्जींनी भेट दिली.

'हिंदूंची धार्मिक राजधानी' अशी ओळख असलेल्या वाराणसीमध्ये ६९ वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना करण्यात आली. दररोज हजारो भाविक वाराणसीतून वाहणाऱ्या पवित्र गंगेत स्नान करायला येतात.

या शाळेची स्थापना आध्यात्मिक गुरू मा आनंदमयी यांनी केली होती. त्यांचा जन्म बांगलादेशमध्ये झाला होता. भाविक म्हणून त्या भारतात आल्या, आणि त्यांनी देशभरात प्रवास केला.

पहाटे चार वाजता इथं राहणाऱ्या विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचा दिवस सुरू होतो. संपूर्ण दिवसात विद्यार्थिनींना वेगवेगळ्या विषयांसह धर्मिक गोष्टीही शिकवल्या जातात.

पाच वर्षांवरील मुलींना या शाळेत प्रवेश दिला जातो. आणि मुली वयात येईपर्यंत त्यांचा मुक्काम या आश्रमशाळेतच असतो. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्यांना शाळेत शिकवलं जातं.

इथं विद्यर्थीनींना दिवसातून दोनदा वेद आणि अन्य हिंदू धार्मिक ग्रंथातले धडे दिले जातात. त्यासोबतच संस्कृत व्याकरण, इंग्रजी, हिंदी, गणित, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रसुद्धा शिकवलं जातं.

या फोटोमध्ये दिसत असलेल्या मुली दिवसातल्या पहिल्या वर्गाची तयारी करत आहेत.

शाळा सुटल्यानंतर या मुलींना दोन तास खेळायला वेळ दिला जातो. शाळेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मा आनंदमयी कन्यापीठात संगीत, पाककला, घरकाम, शिलाईकाम आणि क्राफ्टदेखील शिकवलं जातात.

शाळेतील विद्यार्थिनी इथल्याच वसतिगृहात राहतात आणि झोपतात. या मठाच्या बोर्डिंगमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे.

इथल्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी खास ड्रेस कोड आहे. आणि मोठं झाल्यावर त्यांना पांढरी साडी नेसावी लागते. या सगळ्या मुलींचे केसही अगदी छोटे कापलेले असतात.

इथल्या शिक्षिका सागतात की विद्यार्थिनींचं इथं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या स्वेच्छेने आपला मार्ग निवडू शकतात.

शाळेत राहणाऱ्या काही विद्यार्थिनी शिक्षण पूर्ण झाल्यावरही इथेच राहून काही काम करणे पसंत करतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)