टूरिंग टॉकिज : 'द एंड'ला टेकलेल्या दुनियेची झलक

गेल्या सात दशकांपासून 'टूरिंग टॉकिज', अर्थात फिरते सिनेमागृह चंदेरी दुनियाची जादू भारतातील खेड्या-पाड्यांत पोहचवत आहेत.

जत्रा असो किंवा उरूस, टूरिंग टॉकिजमध्ये एखादा सिनेमा पाहून आल्याशिवाय घरी परतायचं नाही, असा सिनेमाबहाद्दरांचा अलिखित नियम असतो.

ज्या गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत, तिथं हे फिरते टॉकिज कोट्यवधी लोकांपर्यंत सिनेमा पोहचवत आहे.

तंबू, पडदा, हाताने चालवता येणारे प्रोजेक्टर, रीळ, बांबू, दोऱ्या हे साहित्य आपल्या महाकाय ट्रकमध्ये भरून टूरिंग टॉकिजवाला एखाद्या जत्रेमध्ये पोहचतो.

जत्रेमध्ये फिरून, दमून-भागून आलेले लोक आपल्या आवडत्या कलाकाराचा आवडता चित्रपट पाहण्यासाठी विसवतात. आणि चित्रपट सुरू झाल्यानंतर काही क्षणातचं हे लोक त्या स्वप्नाच्या दुनियेत हरवून जातात.

पण आता ही समीकरणं बदलताना दिसत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान, दळण-वळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात झपाट्याने झालेली वाढ या गोष्टींमुळं लोकांच्या हाती मनोरंजनाची नवं साधनं पोहचली आहेत.

डीव्हीडी आणि मोबाइलवर सहज चित्रपट उपलब्ध होत असल्यामुळं टूरिंग टॉकिजमधील लोकांचा रस कमी होताना दिसत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा फटका या व्यवसायाला बसला आहे.

2008 मध्ये अमित मधेशिया या फोटोग्राफरनं भारतातील वेगवेगळ्या टूरिंग टॉकिजची छायाचित्र काढायचा प्रकल्प हाती घेतला. या काळात त्यानं जे अनुभवलं ते त्यानं आपल्या शब्दात मांडलं आहे --

मी 2008 ला टूरिंग टॉकिजची छायाचित्र काढण्याचं काम सुरू केलं. सिंगल स्क्रीन थिएटर एका पाठोपाठ बंद होत होती आणि मल्टिप्लेक्सचा उदय होत होता.

मनोरंजन जगताची ही मंदिरं उद्धवस्त होताना पाहून मी व्यथित झालो. हा विषय लोकांसमोर कसा मांडावा याचा विचार मी करू लागलो.

मी आणि माझा सहकारी शिर्ले अब्राहम दोघांनी यासाठी भारतभर फिरण्याची आम्ही तयारी ठेवली. पण आम्ही नेमकं काय शोधतोय हे आम्हालाही माहित नव्हतं?

मग या कामानिमित्त आम्ही एक गाव गाठलं. तिथं एक टूरिंग टॉकिज आली होती. गर्दीचा भाग होऊन चित्रपट पाहायचा, असं आम्ही ठरवलं.

एका लिंबाच्या झाडाखाली गावकरी बसून चित्रपट पाहत होते. एक वृद्ध माणूस हाताने प्रोजेक्टर चालवून त्यांना चित्रपट दाखवत होता. तिथे असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह तर लपतच नव्हता.

आपली दिवसभराची कामं आटोपून गावकरी चित्रपट पाहायला बसले होते. त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे दिसत होतं की ही सर्व मंडळी जादुई जगात हरवली होती. हे सारं आपणच प्रत्यक्ष जगतोय, असा त्यांना कदाचित भास होत होता.

पण थोड्या वेळानंतर प्रोजेक्टरचा आवाज बंद झाला. तंबू आणि पडदा तो पुन्हा ट्रकमध्ये टाकण्यात आला... आणि स्वप्न घेऊन आलेली तो ट्रक निघून गेला.

आज या टूरिंग टॉकिजची कल्पना एखाद्या दंतकथेप्रमाणे वाटते.

अद्ययावत तंत्रज्ञानाने सिनेमा पाहण्याचा अनुभव जरी बदलला असला तरी सिनेमाबद्दलचं कुतूहल अद्यापही ओसरलं नसल्याची आम्हाला कल्पना आली.

आमच्या लक्षात आलं की ही कथा अद्याप कुणीच सांगितलेली नाही आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये टूरिंग टॉकिजनं लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे.

पण आता डीव्हीडी, मोबाइल फोनमुळं या टूरिंग टॉकिजचा व्यवसाय करणं कठीण झालं आहे. महाराष्ट्रात अद्यापही अनेक ठिकाणी टूरिंग टॉकिज चालतात, हे पाहून आम्हाला आनंद झाला.

पण येत्या काळात या टूरिंग टॉकिज संपुष्टात येतील, याचा विचारही आम्हाला दुःखी करून गेला.

याच विषयातून प्रेरणा घेऊन मी एक चित्रपट तयार केला - 'द सिनेमा ट्रॅव्हलर्स'.

2016 मध्ये हा कान चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला 'स्टॅंडिंग ओव्हेशन'सह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच डॉक्युमेंटरीसाठी देण्यात येणारा विशेष ज्युरी पुरस्कारही मिळाला.

चित्रपटात हरपून गेलेल्या लोकांची ही कथा सर्व जगभरातील लोकांना चित्तवेधक वाटेल. केवळ चित्रपटांचा जादुई अनुभव जगणाऱ्यांचं हे छायाचित्रण सर्वांना आवडेल अशी मला आशा वाटते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)