Australia Fire: हजारो उंटांची होणार कत्तल

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात असणाऱ्या हजारो उंटांना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालून ठार मारण्यात येणार आहे. दुष्काळ आणि प्रचंड उष्म्यामुळे उंटांची ही कत्तल करण्यात येणार आहे.

बुधवारी या कत्तलीला सुरुवात झाली असून पुढचे 5 दिवस ही कत्तल सुरू राहणार असून उंटांच्या मोठ्या कळपांमुळे शहरांचं आणि इमारतींचं नुकसान होत असल्याची तक्रार दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या अॅबओरिजिनल (आदिवासी) समाजानं केली होती.

"पाण्याच्या शोधात हे कळप रस्त्यात फिरत आहेत. आम्हाला आमच्या लहान मुलांची काळजी वाटते," कनपी भागात राहणाऱ्या मारिटा बेकर सांगतात.

काही जंगली घोड्यांचीही कत्तल करण्यात येणार आहे.

या प्राण्यांची कत्तल करण्यासाठीचे नेमबाज ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जल खात्यातील असतील.

अनांगू पिटजनजाहजारा याकुंजाजारा (Anangu Pitjantjatjara Yankunytjatjara) भागामध्ये ही कत्तल होणार असून या भागात तुरळक लोकवस्ती आहे. ही बहुतेक वस्ती स्थानिक मूळ वंशाच्या समाजाची आहे.

"APY भागांतील आदिवासी समाज अतिशय तणावाखाली आहे. उंटांचे कळप पाण्याच्या शोधात येत असल्याने त्याचा त्यांच्या आयुष्यावर आणि गुरं चारण्यावर परिणाम होतोय," APYचे जनरल मॅनेजर रिचर्ड किंग यांनी एका निवेदनात म्हटलंय.

"सध्याचं कोरडं वातावरण पाहता उंटांचे असे कळप मोठ्या संख्येने एकत्र येणं हे मूळ आदिवासी समाजांसाठी आणि एकूण पायाभूत सुविधांसाठी धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच तातडीन उंटांवर कारवाई गरजेची आहे," ते पुढे म्हणतात.

"आम्ही अतिशय गरम आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात जगतोय. उंट कुंपणं पाडून घरांजवळ येतात आणि एअर कंडिशनरमधलं पाणी प्यायचा प्रयत्न करतात," APY एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या सदस्य मारिटा बेकर सांगतात.

गरम आणि कोरड्या वातावरणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मोठे वणवे पेटले आहेत. शिवाय गेली काही वर्षं देशात दुष्काळ आहे.

उंट हा प्राणी मूळचा ऑस्ट्रेलियातला नाही. 19व्या शतकात भारत, अफगाणिस्तान आणि मध्य-पूर्वेतून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यासोबत उंट आणले.

सध्या देशात एकूण किती उंट आहेत, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी ऑस्ट्रेलियाच्या मध्य भागांमध्ये हजारो उंट असल्याचा अंदाज आहे.

पण मोठ्या संख्येतल्या या उंटांमुळे लोकांना त्रास होतोय. उंट कुंपणं पाडतात, शेताचं आणि उपकरणांचं आणि वस्त्यांचं नुकसान करतात. आणि या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सध्या सगळ्यात गरजेचं असलेलं पाणी उंट पितात.

शिवाय उंट मिथेन या ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण करणाऱ्या वायूचं उत्सर्जन करतात, ज्यामुळे हवामान बदलांना हातभार लागतो.

गेले अनेक महिने ऑस्ट्रेलियात धुमसणाऱ्या वणव्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 2000 घरं जळून खाक झाली आहेत. तर सप्टेंबरपासून आतापर्यंत किमान 25 जणांचा बळी गेलाय.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व आणि दक्षिण भागांना सर्वांत जास्त झळ बसलेली आहे. अनेक प्राणीही इथल्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेत.

वर्षाच्या या काळामध्ये ऑस्ट्रेलियात नेहमीच वणवे लागतात, पण यावेळी भीषण वणवे पेटले आहेत.

गेल्या काही दशकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तापमानातही वाढ झाली असून हे तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

या अशा उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे भविष्यात आगींचं प्रमाण आणि भीषणता वाढेल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)