आगीमुळं कॅलिफोर्नियामधल्या डिस्नीलँड पार्कचं आकाश गडद

ऑक्टोबरमध्ये कॅलिफोर्नियाच्या डिस्नीलँड पार्कची थीम हॅलोवीन आहे. पण, कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हा पार्क राखेच्या धुराने गडद झाला आहे.

पार्कला भेट देणारे लोक काळ्याशार आकाशाचे आणि राखेनी भरलेल्या ढगांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

नेट ग्रॅफी या पार्कचे वार्षिक पासधारक आहेत. आठवड्यातून एकदा-दोनदा ते या पार्कला भेट देतात.

डिस्नीलँडमध्ये पसरलेली राख आणि त्यामुळे पालटलेलं पार्कचं स्वरूप याचा फोटो त्यांनी सोमवारी काढला होता.

"वातावरणात सगळीकडे राख पसरलेली आहे. अशा वातावरणात राख नाका-तोंडात आणि डोळ्यात जाणार नाही म्हणून काळजी घ्यावी लागते. श्वासोच्छवासाद्वारे शरीरात राख जाणं धोक्याचं आहे," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

जेनिफर बर्निच यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले असून त्यात, 'डिस्नीलँडचं आकाश अधिकाधिक गडद होत आहे,' असं म्हटलं आहे.

राखेचे ढग पाहून 'जग संपतंय की काय?' असा प्रश्न एका जणानं ट्विटरवर विचारला आहे.

या आगीमुळे अॅनहाईम हिल्स भागातील हजारो लोकांना घरं सोडावी लागली आहेत. यामुळे येथील रहिवाशांसाठी हे पार्क बंद करण्यात आलं आहे.

"राखेपासून बचाव करण्याकरता कोणतेही फिल्टर वापरण्यात आले नाहीत," या कॅप्शनसह रॅशल सर्फिटी यांनी सोशल मीडियावर फोटो टाकले आहेत.

अॅन्ड्रयु वेईस यांनी आपली पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासोबत सोमवारी या पार्कला भेट दिली.

पार्कच्या स्थितीविषयी त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "पार्कमधील दृश्य अत्यंत भीतीदायक होतं.

आकाश तर इतकं काळंकुट्ट झालं होतं की, सर्व काही संपलं असंच वाटत होतं."

"या परिस्थितीतही बचावकार्यात तत्परतेने सहभागी झालेल्या तसंच सध्या धोक्यात असलेल्या कुटुंबांसोबत आमच्या सद्भावना आहेत," असं त्यांनी पुढे सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)