Runet: रशियाच्या स्वतंत्र इंटरनेट यंत्रणेचा फायदा कुणाला? धोका कुणाला?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

फोटो स्रोत, EPA

जागतिक इंटरनेटपासून वेगळी यंत्रणा स्थापन करण्याच्या उद्देशाने 'पर्यायी इंटरनेटची यशस्वी चाचणी' घेतल्याचं रशियाने म्हटलं आहे.

'रुनेट' (Runet) या देशपातळीवरील इंटरनेट व्यवस्थेची यशस्वी चाचणी नेमकी कशी पार पडली, हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र, या चाचणीदरम्यान लोकांना इंटरनेट कनेक्शनमध्ये कुठलाही बदल जाणवला नाही, असं रशियाच्या संपर्क मंत्रालयाचं म्हणणं आहे.

या चाचणीचे निकाल आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यापुढे मांडले जातील. मात्र जागतिक इंटरनेट व्यवस्थेपासून फारकत घेण्याची काही देशांची ही पद्धत चिंतेचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

"इंटरनेटच्या मोडतोडीच्या दिशेनेच रशियाचं हे पाऊल आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असं सर्रे विद्यापीठातील संगणक शास्त्रज्ञ प्रा. अलन वुडवर्ड यांनी म्हटलं. "एकाधिकारशाही गाजवणारे देश आपल्या देशातील नागरिकांनी काय पाहावं, काय पाहू नये, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. इराण किंवा चीनने तसं केलं आहे."

"यामुळे त्यांच्या देशात काय चाललंय, याबद्दल बाहेर काय बोललं जातंय, या संवादापासूनच नागरिकांना वेगळं केलं जातंय. त्यांना त्यांच्याच विश्वात अडकवण्याचा हा डाव आहे," असंही त्यांनी पुढे म्हटलं.

'रुनेट'ची चाचणी नियोजनानुसारच पार पडल्याचं संचार मंत्रालयाचे उपप्रमुख अलेक्सी सोकोलोव्ह यांनी म्हटल्याचं काही स्थानिक वृत्तसंस्थांनी सांगितलं.

मोबाइल

फोटो स्रोत, Getty Images

"या चाचणीच्या निकालांमधून एक सांगता येईल, की बाह्य शक्ती आणि काही धोक्यांची शक्यता पाहता, आपलं प्रशासन आणि आपल्या टेलिकॉम कंपन्या, दोन्हीही रशियातील कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास सज्ज आहेत," असं सोकोलोव्ह यांनी म्हटलं.

सरकारी वृत्तसेवा 'टॅस'नुसार "बाह्य नकारात्मक शक्तींच्या प्रभाव" पडल्यास 'रुनेट' त्याला तोंड करण्यास सक्षम आहे की नाही, याची चाचणी झाली. या चाचणीदरम्यान 'इंटरनेट-ऑफ-थिंग्स' (म्हणजेच इंटरनेटद्वारे काम करणारी इतर उपकरणं, जसं की फ्रिज, लाईट्स किंवा स्मार्ट यंत्र) व्यवस्थित काम करतात का, याचंही परीक्षण झालं.

रशियातील लोकांसाठी विशेष इंटरनेट सेवा सुरू करण्याचाही रशियन सरकारचा मानस आहे. त्याशिवाय, रशियाने स्वतःचं विकिपीडियासारखं एक पोर्टल सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. तसंच एक विधेयक संमत केलं आहे, ज्यानुसार देशातील प्रत्येक स्मार्टफोनमध्ये काही रशियाचे स्मार्टफोन प्री-इन्स्टॉल्ड असतील.

'रुनेट' काम कसं करतं?

याबाबत सर्रे विद्यापीठाच्या प्रा. वुडवर्ड यांनी सांगितलं, "याद्वारे रशियातील इंटरनेट जागतिक इंटरनेटशी काही निवडक सरकारनियंत्रित पोर्ट्सद्वारेच कनेक्ट होऊ शकतील."

"त्यामुळे देशभरातील इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना (ISP) आणि टेलिकॉम कंपन्यांना एखाद्या मोठ्या इंट्रानेटप्रमाणे रशियाच्या सीमेतील इंटरनेट नियंत्रित करता येईल. हे अनेकदा मोठ्या कंपन्यांमध्ये आढळतं."

पुढे जाऊन रशियाही जागतिक सेवांची आपली आवृत्ती तयार करण्याचा प्रयत्न करेल. चीनने फेसबुक, ट्विटर आणि गुगलच्या बाबतीत असं केल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)