FIFA 2018 : फुटबॉल वर्ल्डकपमुळे असा बदलला रशिया

फोटो स्रोत, PA
- Author, निना नाझारोवा
- Role, बीबीसी रशियन सर्व्हिस
रशियात वर्ल्डकपच्या निमित्ताने अनेक परदेशी नागरिक येऊन गेले. रशियाची प्रतिमा भीतीदायक, गंभीर आणि खूप थंड अशी त्यांच्या होती. इथे आल्यावर त्यांना रशिया आधुनिक, खुल्या विचारांचा, मदत करण्यात पुढे आणि आनंदी वाटला, असं ते सांगतात.
रशियन नागरिकांचाही या नव्या, खुल्या, आनंदी वातावरणामुळे आत्मविश्वास वाढला... बीबीसीच्या रशियातल्या प्रतिनिधी सांगत आहेत, वर्ल्डकपचे रशियन अनुभव...
मी ब्रिटनमध्ये राहिले आहे, युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटला आहे. तर, थायलंडमधल्या देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर हवाईमध्ये जाऊन मोठ्या व्हेल्सही पाहिल्या आहेत आणि कोलंबियन नॅशनल पार्कमध्ये कँपिंग करून राहिले देखील आहे.
थोडक्यात, गेल्या 34 वर्षांच्या काळात मी अनेक परदेशी नागरिकांना भेटले आहे. त्यामुळे केवळ वर्ल्डकप पाहण्यासाठी जगभरातले चाहते आमच्या मॉस्कोमध्ये येतील असं मला वाटलं देखील नव्हतं.
USSRचा पाडाव होऊन आता 30 वर्षं होऊन गेली. त्यामुळे परदेशी नागरिकांना रशियाला भेट देणं सोपं झालं आहे.
मॉस्को हे खूप मोठं आणि आधुनिक, काहीसं बहुभाषिक शहर आहे अशा समजुतीतच माझी पिढी मोठी झाली. पण, वर्ल्डकपच्या निमित्तानं मॉस्को शहरात सळसळतं चैतन्य बघायला मिळालं, विविध देशांतील नागरिक आणि त्यांच्या झेंड्यामुळे या शहरांचा रंगच पालटल्याचं दिसून येत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्डकपचे सामने सुरू झाले जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांनी रशियात धाव घेतली. सरान्स्क या छोट्या शहरांत हे सामने होते होते. त्या शहरांतल्या परदेशी नागरिकांचं प्रमाण आश्चर्यकारकरीत्या 235 पटीनं वाढलं होतं.
जेव्हा मॉस्कोतल्या विद्यापीठात मी मोठ्या प्रमाणात अर्जेंटिनाचे झेंडे पाहिले, तेव्हा मी खरोखरच भारावून गेले होते.
रशियातल्या जवळपास 70 टक्के नागरिकांकडे परदेशात जाण्यासाठी पासपोर्टही नाहीत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जगभरातून आलेले परदेशी नागरिक पाहणंही ही इथल्या स्थानिकांसाठी पर्वणी ठरली.
खूप वेगळं वाटतंय...
मॉस्कोसाठी गेला महिना खऱ्या अर्थानं आगळा-वेगळा गेला आहे. रस्त्यावर मोठ्या संख्येनं वावरणाऱ्या चाहत्यांच्या समूहांकडे पोलिसांनी चक्क दुर्लक्षच केलं होतं. कारण, एरवी असं फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. जर, विरोधकांचा मोर्चा असेल तर परवानगी मिळतच नाही.
FIFA World Cup 2018ची सुरुवात झाली आणि प्रशासनानं या सगळ्याकडे काणाडोळा करण्यास सुरुवात केली. थेट रस्त्यावर दारु पिणं आणि पार्ट्या करणं या सगळ्याकडे दुर्लक्षच करण्यात आलं. एरवी असं करणाऱ्यांना अटकच होते.

फोटो स्रोत, Getty Images
इतकंच काय तर रेफ्युजींसाठीची फुटबॉल मॅच रेड स्क्वेअरवर झाली. (साधारणतः रशिया रेफ्युजींना प्रवेश देत नाही आणि फार क्वचित राजकीय शरणार्थींना स्थान देतो.)
या सगळ्यामुळेच इथल्या नागरिकांना वेगळं वागण्याचा अनुभव मिळाला.
चिडखोरपणा कमीच...
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या रशियात 'Rossia dlya grustnyh' हे वाक्य प्रसिद्ध आहे. याचा अर्थ आहे की, रशिया केवळ दुःखितांचा प्रदेश आहे.
पण, वर्ल्डकप सुरू झाला आणि आम्ही जगभरातील चाहत्यांचं जोरदार स्वागत करण्यास सुरुवात केली. जसे हे चाहते येऊ लागले आमच्या लोकांमधला काहीसा चिडखोरपणाही कमी होत गेला आणि आम्हालाही आनंदासाठी नवं कारण मिळालं.
दिवसांतले 24 तास, सगळे प्रहर केवळ 'पार्टी मूड'मध्ये कसं राहता येतं, हे सगळ्यांनाच जवळून पाहता आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या सगळ्या वातावरणामुळे भारावून गेलेल्या एका 40 वर्षीय शिक्षिकेशी मी या विषयावर गप्पा मारल्या. तिला कोणतीही परकीय भाषा येत नाही. यावेळी तिनं आवर्जून मध्य मॉस्कोचा परिसर पिंजून काढला. कारण, इथलं सर्व देशाच्या झेंड्यांनी रंगीबेरंगी झालेलं वातावरण तिनं तिच्या आयुष्यांत पूर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं. तिला या सगळ्यातून एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचं तिनं सांगितलं.
केवळ या शिक्षिकेलाच नव्हे तर संपूर्ण रशियात हे वातावरण दिसून आलं.
परंतु, एक विरोधाभासही दिसून आला. रशियातल्या आजवरच्या इतिहासातले हे बहुसांस्कृतिक क्षण असताना रशिया मात्र राजकीयदृष्ट्या एकछत्री अंमलाखाली आहे.
त्याचबरोबर गेल्या 5 वर्षांत जगभरातल्या माध्यमांमधून रशियाबद्दल फारसं चांगलं बोललं गेलेलं नाही.
युक्रेन आणि सीरियामधली युद्ध, अमेरिकी निवडणुकांमधल्या सहभागाचे आरोप, रशियाचा माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपलवर लंडनमध्ये झालेला रासायनिक हल्ला अशा नकारात्मक मथळ्यांच्याच बातम्या रशियाबद्दल प्रसिद्ध झाल्या आहेत. या सगळ्याचा आमच्यावरही परिणाम झाला आहे.
जगाशी पुन्हा जोडले जाताना...
मी या वर्षाच्या सुरुवातीला बर्लिनला गेले होते. तेव्हा तिथे सगळ्यांना कळलं की मी बीबीसीच्या रशियन सर्व्हिससाठी काम करते. माझ्यावर अनेकांनी पत्रकार परिषदेत करतात तशी प्रश्नांची सरबत्ती केली. मी रशियात काम कसं करू शकले? हा मुद्दाच या प्रश्नांच्या केंद्रस्थानी होता.

माझं रोजचं आयुष्य आणि कामाचं स्वरूप हे खूप सामान्य असतं हेच सांगण्यात माझा बराच वेळ गेला. पण, त्यांना माझ्यावर विश्वास बसला असेल असं आज तरी वाटत नाही.
आनंद आणि मौज
माझी एक मैत्रीण फोटोग्राफर असून ती मोठ्या माध्यम समूहांसाठी काम करते. तिनं मध्यंतरी एका प्रकल्पासाठी ब्रिटीश कलाकारासोबत काम करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रशियातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर काम कसं करायचं या काळजीत तो कलाकार पडला होता.

फोटो स्रोत, Getty Images
तिचे अनुभव सांगताना ती म्हणते, "वर्ल्डकप आपल्याला पुन्हा जगाशी जोडेल अशी आशा आहे आणि यातून जगलाही कळेल की इथेही चांगली मनमिळाऊ माणसं राहतात."
या वर्ल्डकपमुळे हे सगळं साध्य केल्यासारखं वाटतं. या महिन्यात मी डझनावारी परदेशी फुटबॉल चाहत्यांशी संवाद साधला असेल. या सगळ्यांनीच रशिया हा भीतीदायक, गंभीर आणि खूप थंड असेल अशी कल्पना केली होती. पण, इथे आल्यावर त्यांना रशिया आधुनिक, खुल्या विचारांचा, मदत करण्यात पुढे आणि आनंदी वाटला.
मानवी मूल्य जपणारा हा देश आहे, असा संदेशही सगळ्यांपर्यंत पोहोचला. ही गोष्ट या वर्ल्डकपशिवाय शक्य झाली नसती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








