You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये भारतीय वंशाचे शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
42 वर्षांचे संदीप टेक्सासमधले पहिले भारतीय वंशाचे शीख पोलीस अधिकारी होते.
ड्युटीवर असताना पगडी घालणे आणि दाढी-मिशा ठेवण्याची कायदेशीर लढाई ते जिंकले, त्यावेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते पोलीस सेवेत होते.
धार्मिक स्वातंत्र्याची लढाई लढणारी व्यक्ती म्हणून पोलीस वर्तुळात त्यांची ओळख होती.
मिळालेल्या माहितीनुसार ते ड्युटीवर असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टेक्सासमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संदीप सिंह धालीवाल यांना 'लक्ष्य करून' त्यांच्यावर 'क्रूर आणि निर्घृण' पद्धतीने हल्ला करण्यात आला.
ते दुपारी शहरात ट्रॅफिक नियंत्रित करत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.
हॅरिस काउंटीचे शेरिफ एडी गोंजालेज यांनी सांगिल्याप्रमाणे, "संदीप यांनी एका गाडीला थांबवलं. गाडीत एक स्त्री आणि एक पुरूष बसले होते. गाडी थांबवल्यावर त्यातली एक व्यक्ती खाली उतरली आणि तिने संदीपवर दोन-तीन गोळ्या झाडल्या."
संदीप यांना हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला.
गोंजालेज यांनी ट्वीट करून संदीप यांच्या मृत्यूची बातमी दिली. ते लिहितात, "हे सांगताना मला अतिशय दुःख होतं आहे की आम्ही आमच्या एका प्रियजनाला गमावून बसलो आहोत. आमच्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. आम्ही एक उत्तम वडील, पती, मुलगा, भाऊ आणि मित्राला गमावलं आहे. आम्ही टेक्सासच्या 'शांतता अधिकाऱ्या'ला गमावलं आहे."
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर जवळच्याच शॉपिंग सेंटरच्या दिशेने पळाला.
पोलिसांनी आरोपीची गाडी जप्त करून तपास सुरू केला आहे.
शेरिफ यांच्या कार्यालयातून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की या प्रकरणात रॉबर्ट सोलीस (47 वर्ष) नावाच्या एका व्यक्तीवर 'कॅपिटल मर्डर' (हत्ये)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंजालेज यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक हत्यारही जप्त केलं आहे. याच हत्याराने संदीप यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)