You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उघड्यावर शौचास बसलेल्या दलित मुलांची मारहाण करून हत्या
- Author, शूरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
मध्यप्रेदशातील शिवपुरी जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसलेल्या दलित मुलांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घङली आहे.
सिरसौद ठाणे क्षेत्रातल्या भावखेडी गावात ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी वाल्मिकी समाजातील दोन मुलं, रोशनी (12 वर्षे) आणि अविनाश (10 वर्षे) पंचायत भवनसमोरच्या रस्त्यावर शौचास बसली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हकीम आणि रामेश्वर या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हकीमने या मुलांना रस्ता खराब न करण्याविषयी हटकले आणि दोघांनी मिळून दोन्ही मुलांवर हल्ला केला.
पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. ही दोन्ही मुलं नात्याने आत्या-भाचा होते. हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणाव वाढीस लागल्यामुळे, अधिक पोलीस बळ तैनात करण्यात आले.
"हाकीम आणि रामेश्वर यादव यांनी मुलांना बेदम मारलं, त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारलंय. मी तिथे पोचेपर्यंत ते दोघंही पळून गेले होते,'' असं अविनाशचे वडील मनोज वाल्मिकी यांनी सांगितलं.
या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शिवपुरी येथे पाठवले होते.
मनोज वाल्मिकी यांचे आरोप
रोशनी मनोज यांची लहान बहीण होती, त्यांनी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केला होता. अविनाश आणि रोशनी एकाच वयाचे असल्याने भावा-बहिणीसारखे राहायचे.
मनोज यांच्या घरी शौचालय बनवण्यास आडकाठी करण्यात आली होती. शौचालय उभारण्यासाठी पंचायतीकडे पैसाही आला होता, परंतु "या लोकांनी ते उभारू दिले नाही." असं मनोज यांनी सांगितलं. शौचालय न बांधल्यामुळे आमच्या कुटुंबाला शौचासाठी बाहेर जावं लागायचे. या लोकांमुळे गावात माझ्या कुटुंबाला वाईट वागणूक मिळायची, असाही आरोप मनोज यांनी केला आहे.
दोन वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी मनोजनी रस्त्यावरील लाकूड कापून घेतले होते, त्यावेळचा राग दोन्ही हल्लेखोरांच्या मनात होता. ते नेहमीच शिवीगाळ करायचे आणि धमक्या द्यायचे. कामाची मजुरीही कमी द्यायचे, असेही मनोज यांनी सांगितलं.
मनोज यांच्याकडे कुठलीही जमीन नाही, पोट भरण्यासाठी ते मोलमजुरी करतात.
पोलीस काय म्हणतात -
सिरसौद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आर. एस. धाकड म्हणाले की, "दोन्ही मुलं उघड्यावर शौचाला बसली होती, आरोपींनी आधी त्यांना हटकलं आणि मग काठीनं मारहाण केली.''
शिवपुरीचे एस. पी. राजेश चंदल म्हणाले की, "दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे."
राजकारण सक्रिय
या घटनेमुळे राजकारणही तापत आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दोन्ही लहान मुलांना बेदम मारहाण करून हत्या केल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. मायावती यांनी याप्रकरणी केलेल्या ट्वीटमध्ये काँग्रेस आणि भाजपलाही जाब विचारला आहे.
मायावती आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "देशातल्या लाखो-करोडो दलित, वंचित आणि धार्मिक अल्पसंख्यांकांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येतं, तसंच त्यांच्यावर अत्याचारही केले जातात. यामुळेच मध्य प्रदेशातील शिवपुरीमधल्या दोन दलित मुलांची मारहाण करून हत्या केल्याची घटना अतिशय निंदनीय आहे.''
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपालाही जाब विचारला आहे, यासंदर्भात त्यांनी अन्य ट्वीट केले होते, यात त्या म्हणतात, "काँग्रेस आणि भाजपच्या सरकारने गरीब दलित आणि वंचितांच्या घरी शौचालय का बांधण्यात आलं नाही याचं स्पष्टीकरण द्यावं. या लोकांना सुविधा न मिळाल्यामुळे उघड्यावर शौचास बसावं लागतं, दलित मुलांची मारहाण करून हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवायला हवं.''
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुलांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याबरोबरच सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देणारं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)