अमेरिका-तालिबान शांतता चर्चा: 'डोनाल्ड ट्रंप यांनी शांतता चर्चा रद्द केल्याचा धोका अमेरिकेलाच'

अफगाणिस्तानातील शांतता चर्चेतून माघार घेण्याच्या डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाचं मोठं नुकसान अमेरिकेलाच होईल, असं तालिबाननं म्हटलंय.

शेवटच्या क्षणापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं, असंही तालिबाननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी एक ट्वीट करून सांगितलं होतं की ते अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी आणि तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना अमेरिकेच्या कँप डेव्हिडमध्ये रविवारी स्वतंत्ररीत्या भेटणार होते.

कारण अफगाण सरकार म्हणजे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्यानं थेट चर्चा करायला घाबरतं, अशी टीका तालिबान करतं. त्यामुळे दोघांशीही ट्रंप स्वतंत्ररीत्या चर्चा करणार असल्याचं सांगितलं.

मात्र अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट घडला आणि या स्फोटाची जबाबदारी तालिबाननं घेतली. या स्फोटात 12 जणांचा जीव गेला, ज्यांच्यात एका अमेरिकन सैनिकाचाही समावेश होता. त्यामुळं ट्रंप यांनी अश्रफ घानी आणि तालिबानी नेत्यांसोबतची बैठक रद्द करून टाकली.

अफगाणिस्तान सरकारनं मात्र अमेरिकेच्या चर्चा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर तालिबाननं नाराजी व्यक्त केलीय.

डोनाल्ड ट्रंप भडकले

तालिबानसोबत शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती कालच (8 सप्टेंबर) स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलीय.

ट्रंप यांनी ट्वीट करून सांगितलं की, "हे आणखी कुणालाच माहिती नव्हतं, पण अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी आणि तालिबानचे वरिष्ठ नेते कँप डेव्हिडमध्ये रविवारी मला वेगवेगळे भेटणार होते. त्यासाठी ते अमेरिकेत येणार होते.

"मात्र त्यांनी काबूलमधील एका हल्ल्यात सहभाग असल्याचं कबुल केलं आहे, ज्यात एक अमेरिकेचा शूर जवान आणि 11 इतर लोकांचा बळी गेला. मी ताबडतोब ही भेट रद्द केली आहे आणि शांतता चर्चा बंद करतोय," असं ते म्हणाले.

ट्रंप यांनी तालिबानच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "जर शांततेसाठीच्या चर्चेदरम्यान हल्ले रोखू शकत नाहीत आणि 12 निष्पाप लोकांचा जीव घेत असतील, तर कुठलीही चर्चा करण्याची त्यांची कुवतही नाही."

अमेरिकेचे प्रतिनिधी झाल्मय खलिजाद यांनी तालिनबानसोबत 'तत्वत:' शांतता करार झाल्याची सोमवारीच घोषणा केली होती. खालिजाद हे अफगाणिस्तानातील शांततेसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी आहेत.

अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी तालिबानसोबतची चर्चा यशस्वी झाली तर अमेरिका 20 आठवड्यांच्या कालावधीत आपले 5,400 सैनिक अफगाणिस्तानातून माघारी घेईल, या करारानुसार ठरलं होतं. मात्र आता खलिजदाद यांनी आता सांगितलंय की, या कराराला अंतिम मंजुरी डोनाल्ड ट्रंप हेच देतील.

सन 2001पासून गेली 18 वर्षं अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. सध्या सुमारे 14 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आहेत.

गेल्या आठवड्यात काय झालं होतं?

गेल्या आठवड्यात गुरुवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल एका मोठ्या स्फोटाने हादरलं. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

कारमध्ये हा बाँब ठेवण्यात आला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमेरिकेच्या सैनिकाचाही समावेश आहे.

परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी परदेशी नागरिकांची वस्ती असणाऱ्या रहिवासी भागामध्ये हा हल्ला करण्यात आला होता.

अफगाणास्तानमध्ये सतत होत असलेले हिंसक हल्ले आणि त्यामुळे नागरिकांचे जाणारे जीव याचं सत्र, अमेरिका आणि तालिबानमधल्या वाटाघाटींमुळे थांबणार नसल्याची भीती यामुळे व्यक्त करण्यात येतेय.

अमेरिका-तालिबान वाटाघाटी

सन 2001पासून गेली 18 वर्षं अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. आणि सध्या सुमारे 14 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आहेत.

जगाच्या पाठीवरचं सर्वांत दीर्घकाळ चालणारं हे युद्ध संपवण्यासाठी ऑक्टोबर 2018 पासून अमेरिका आणि तालिबानमध्ये कतारमध्ये वाटाघाटी सुरू असून आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱ्या झाल्या आहेत.

2001मध्ये अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानात दाखल झालं. पण सध्याच्या घडीला अफगाणिस्तानाचा मोठा भाग सशस्त्र कट्टरतावाद्यांनी काबीज केलाय.

2001पासूनचं आतापर्यंतचं हे प्रमाण सर्वाधिक आहे. अफगाण सरकार हे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्याचं सांगत तालिबानने त्यांच्याची चर्चा करायला नकार दिला आणि थेट अमेरिकेसोबत बोलणी सुरू केली.

अफगाण युद्धाची पार्श्वभूमी

11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. या हल्ल्यांमागील अल्-कायदाने त्यावेळी अफगाणिस्तानात आश्रय घेतलेला होता. अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची राजवट होती आणि त्यांनी या हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या ओसामा बिन-लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला नकार दिला. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रांचं सैन्य अफगाणिस्तानात दाखल झालं आणि या युद्धाला सुरुवात झाली.

तालिबानला यानंतर लवकरच अफगाणिस्तानातली सत्ता सोडावी लागली. पण तालिबानच्या अफगाणिस्तानातल्या कट्टरतावादी कारवाया आणि हल्ले सुरूच राहिले.

2014मध्ये आंतराष्ट्रीय आघाडीने (International Coalition) आपली अफगाणिस्तानातली युद्ध मोहीम संपवली, पण अमेरिकेने मात्र आपल्यातर्फे युद्ध सुरूच ठेवलं.

तर नाटोच्या मिशनचा भाग म्हणून 1 हजार ब्रिटिश सैनिक सध्या अफगाणिस्तानात आहेत. अफगाण सुरक्षा दलांना प्रशिक्षण देण्याचं काम हे सैनिक करतात. पण आता मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना हे युद्ध संपवायचं आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार या युद्धापायी अमेरिकेला दरवर्षी 45 दशकोटी डॉलर्सचा खर्च सोसावा लागतोय.

2001मध्ये मोहीम सुरू केल्यापासून आंतरराष्ट्रीय आघाडीचे 3,500 सैनिक आतापर्यंत मारले गेले असून त्यापैकी 2,300 अमेरिकन सैनिक आहेत.

आतापर्यंत किती अफगाण नागरिक, कट्टरतावादी आणि सरकारी फौजेतेल्या सैनिकांचा बळी गेला, याची मोजदाद करणं कठीण आहे.

आतापर्यंत 32 हजारांपेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या फेब्रुवारी 2019 मधल्या अहवालात म्हटलं होतं.

तर आतापर्यंत 58 हजार सैनिक आणि प्रतिपक्षाचे 42 हजार योद्धे मारले गेल्याचं ब्राऊन युनिव्हर्सिटीमधल्या द वॉटसन इन्स्टिट्यूटने म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)