तालिबान - अमेरिका चर्चेमुळे अफगाणिस्तानची वाटचाल स्थैर्याच्या दिशेनं?

    • Author, दाऊद आझमी
    • Role, बीबीसी पश्तो सेवा

अमेरिकेसोबत सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच त्यातून चांगला तोडगा निघेल, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

जर अमेरिका आणि तालिबानदरम्यानची ही चर्चा खरंच सफल झाली तर अफगाणिस्तानमध्ये गेल्या 18 वर्षांपासून असलेली अस्थिरता संपुष्टात येईल.

हा अफगाण शांती चर्चेचा पहिला टप्पा आहे आणि त्यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरू होईल.

या चर्चेचं फलित म्हणजे अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य बाहेर काढण्यासाठी अमेरिका एक योजना सादर करेल. अमेरिकन सैन्य कधी हटविण्यात येईल हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतील.

अफगाणिस्तानला भविष्यात इतर देशांपासून कोणताही धोका नसेल आणि अल् कायदासारख्या कट्टरपंथी संघटनांसोबत संबंध ठेवणार नाही, अशी खात्री तालिबानलाही पटवून द्यावी लागेल.

या दोन मुद्द्यांवर गेल्या वर्षभरापासून तालिबान आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे आणि सध्या या चर्चेची नववी फेरी सुरू आहे. येत्या काही दिवसांत या दोन्ही प्रश्नांवर सामंजस्यानं मार्ग निघेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेसोबत चर्चेची फेरी आटोपल्यानंतर तालिबान आणि अन्य अफगाण नेते अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करतील. या चर्चेत अफगाणिस्तानचं सरकारही सहभागी होणार आहे.

एक टीम तालिबानची असेल तर दुसरी टीम काबुलहून येणार आहे. काबुलच्या टीममध्ये सरकारी सदस्यांव्यतिरिक्त सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधीही असतील. हे एक सर्वसमावेशक शिष्टमंडळ असेल.

दोन्ही पक्षांमधील चर्चा किती वेळात पूर्ण होईल, हे अजूनही स्पष्ट नाहीये. अफगाणिस्तानातील राजकीय भविष्य कसं असेल, महिला हक्क, माध्यमांचं स्वातंत्र्य आणि नागरिकांचं स्वातंत्र्य अशा विविध विषयांवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. या चर्चेमध्ये अमेरिकेला फारसं स्थान नसेल.

अफगाणिस्तानच्या समस्यांचं निराकरण हे लष्करी उपाययोजनांमध्ये नाहीये आणि चर्चेतूनच यावर तोडगा काढला जाऊ शकतो, या गोष्टीवर गेल्या 18 वर्षांत पहिल्यांदाच सर्व पक्षांचं एकमत झालं आहे.

या चर्चेनंतर प्रदेशातील अन्य शेजारी देशांचं सहकार्य मिळवणं, हे अफगाणिस्तान समोरचं मोठं आव्हान असेल. अफगाणिस्तानमधील संघर्ष केवळ या देशापुरता मर्यादित नाहीये, तर त्याला प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय आयामही आहेत.

(बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्यासोबतच्या चर्चेवर आधारित)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)