काबूल हल्ला: जगभरातल्या शिया मुस्लिमांवर हल्ले का होत आहेत?

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शनिवारी लग्न सोहळ्यादरम्यान एक स्फोट झाला आहे. यात 63 जणांचा मृत्यू झाला आहे. शिया बहुल भागात हा हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानासहित जगभरातील शिया मुस्लिमांवर हल्ले होत आहेत.

तालिबाननं अफगाणिस्तानवर 1996 ते 2001 या कालावधीत राज्य केलं. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर तालिबाननं प्रदीर्घ काळ बंडखोर मोहीम कायम चालवली आहे.

गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये 50 पेक्षा जास्त लोक हल्ल्यांमध्ये मारले गेलेत.

शिया मुस्लिमांवर सातत्याने हल्ले का होतात हे जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला आहे. शिया आणि सुन्नी या इस्लामच्या पंथामध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. या संघर्षाला धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलू आहेत.

'शियांना संपवण्याची मोहीम'

तालिबान जगभरात शियांना संपवण्याची मोहीम राबवत आहे, असं ऑल इंडिया शिया लॉ बोर्डचे प्रवक्ते यासूब अब्बास यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

अब्बास सांगतात, "अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तान, इराक सगळीकडेच शिया मुस्लिमांना संपवण्याची मोहीम चालू आहे. तालिबान, वहाबी समुदाय हे गट ही मोहीम चालवत आहे. एका शियाला माराल, तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, असं त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं असतं. त्यासाठी लहान मुलांचा सुसाईड बॉम्बर म्हणून वापर केला जात आहे."

"अफगाणिस्तानमध्ये हजारा, बामियानमधल्या हजारो शिया मुस्लिमांना ठार करण्यात आलं आहे. असं असलं तरी, तालिबान तिथं पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. कारण जगाला त्यांचा खरा चेहरा कळाला आहे. शिया समुदायाला संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," ते पुढे सांगतात.

आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक निळू दामले यांच्या मते, "तालिबानचं मोठं बळ अफगाणिस्तान आहे. अमेरिका, रशिया त्यांना कुणीच नष्ट करू शकलेलं नाही. तालिबान ही मूळातच सुन्नींची संघटना आहे आणि ती तळामध्ये पसरली आहे. खेड्यांमध्ये त्यांची माणसं पसरलेली आहे. त्यामुळे आजही अवस्था अशी आहे की, अफगाणिस्तानमध्ये कुणाचंही सरकार असलं, तरी इफेक्टिव सत्ता ही तालिबानांच्याच हातात असते. तालिबानला संपूर्ण सत्ता हवीय, त्यांना सत्तेत कुणीच भागीदार नकोय. तसंच अफगाणिस्तानच्या भूमीवरही दुसरं कुणीच नकोय."

शिया समुदांयावरील हल्ल्यांमागे शिया आणि सुन्नी या समुदायांतील जन्मजात वैर कारणीभूत आहे, असं दामले सांगतात.

'जन्मजात वैर'

त्यांच्या मते, "शिया समुदांयावर हल्ले होतात याचं कारण जगभरात शिया-सुन्नी यांच्यात संघर्ष आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सुन्नी बहुसंख्य आहेत. शियांना संपवणं हेच सुन्नी लोकांचं कायम टार्गेट राहिलं आहे. त्यांना शिया हे मुसलमान वाटत नाही. कारण ते मोहम्मदांच्या वंशजाला मानत नाहीत. ते अलीला मानतात. त्यामुळे त्यांचं जन्मजात वैर आहे आणि मग ते शियांवर कायम हल्ले करत असतात."

ते पुढे सांगतात, "अफगाणिस्तानावर आपली सत्ता राहावी, असा बाहेरच्या लोकांचा प्रयत्न आहे. ती कशासाठी हवी तर अफगाणिस्तान शांत राहिलं तर पाईपलाईन अफगाणिस्तानातून जाऊन पाकिस्तानात जाते. तेव्हा तेलाच्या आणि संपर्काच्या दृष्टीनं अफगाणिस्तानला पहिल्यापासून महत्त्व आहे. अफगाणिस्तानची सीमा चीन, रशिया, पाकिस्तान, इराण अशी सगळीकडे आहे. पण, तालिबानची सत्ता आली, तर ते बाहेरच्यांचं ऐकत नाहीत. बाहेरचे म्हणतात, आम्ही तुमच्या तिथून पाईपलाईन नेणार, मग इतके पैसे देऊ. तर तालिबानी म्हणतात, नकोच आम्हाला ते. आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही कोण आलेत सांगायला?"

"आता अमेरिका आणि तालिबानमध्ये कतारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. आम्ही वाटाघाटी करू, पण तुम्ही आम्हाला आमच्या भूमीत नको, असं तालिबान म्हणतं. त्यामुळे या वाटाघाटी कोसळतात," ते पुढे सांगतात.

तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये अफगाणिस्तानील युद्ध संपुष्टात आणण्याची चर्चा सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 16 ऑगस्टला ट्वीट केलं होतं की, "नुकतीच अफगाणिस्तान संदर्भातील बैठक संपवली. या बैठकीत विरोधकांतील बहुतेक जण कराराच्या बाजूनं दिसत आहेत."

तालिबानचा धोका वाढलाय?

तालिबानचा उदय 1990च्या काळात झाला. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडल्या होत्या.

कट्टरपंथीयांनी 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानवर राज्य केलं. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या फौजांनी तालिबानचा पाडाव केला. पण तालिबानचा प्रभाव 2014पासून वाढत आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बीबीसीनं केलेल्या अभ्यासात तालिबानचा धोका अफगाणिस्तानच्या 70 टक्के भूभागावर दिसून आला होता. या संघर्षात नागरिकांचाही बळी जाऊ लागला आहे. 2017मध्ये अफगाणिस्तानात 10 हजार लोक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

कोण आहेत सुन्नी, शिया आणि वहाबी मुस्लीम?

सुन्नी

  • पैगंबर मोहम्मद (इसवी सन 570-632) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे.
  • सुन्नी पंथानुसार पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर त्यांचे सासरे हजरत अबु बकर (632-634 इसवी सन) मुसलमानांचे प्रमुख झाले.
  • सुन्नी पंथ त्यांना खलिफा म्हणतो.
  • एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी 80 ते 85 टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित 15 ते 20 टक्के शिया पंथाचे आहेत.

शिया

  • सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात.
  • पैगंबरांनंतर दूत पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक आहेत.
  • पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई हजरत अली यांना शियापंथीय उत्तराधिकारी म्हणून मानतात.
  • शियांच्या म्हणण्यानुसार पैगंबरांनीही अली यांनाच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं.
  • पण, हजरत अबू बकर यांनी फसवून प्रमुखपदी वर्णी लावून घेतली.

वहाबी

  • मुस्लीम समुदायातील नेते अब्दुल वहाब यांच्यामुळेच या समुदायाला वहाबी नाव मिळाले. आखाती देशांमधील इस्लामिक विद्वान या समुदायानं मांडलेल्या संकल्पनांनी प्रभावित आहेत.
  • या समुदायाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते अत्यंत कट्टर असतात आणि मूलतत्ववादाला पाठिंबा देतात.
  • सौदी अरेबियाचं राजघराणं याच विचारांचं आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही सल्फी विचारप्रवाहाचा समर्थक होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)