अफगणिस्तान: काबूलमध्ये लग्नात स्फोट, 63 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लग्न सोहळ्यादरम्यान स्फोट झाला आहे. या घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 180हून अधिक जण जखमी झाले आहेत.

रिसेप्शन हॉलमध्ये निमंत्रितांची गर्दी जमली होती. काल रात्री 10.40 ला लग्न समारंभात आत्मघातकी हल्ला झाला त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला.

काबूलमधल्या शिया बहुल भागात हा हल्ला करण्यात आला आहे.

हा हल्ला घडवून आणला नसल्याचं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या शिया मुस्लिमांना तालिबान आणि आयएसनं टार्गेट केलं आहे.

"हल्ल्यानंतर घटनास्थळी मी अनेक मृतदेह पाहिले," असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

लग्नासाठी आलेले पाहुणे मोहम्मद फऱ्हाग यांनी सांगितलं, "पुरुष मंडळी जमलेल्या ठिकाणी हा हल्ला झाला. त्यानंतर प्रत्येक जण मोठ्यानं रडत बाहेर येत होता."

"20 मिनिटांत संपूर्ण हॉलमध्ये धूर जमा झाला होता. पुरुष मंडळींमधील जवळपास सगळेच दगावल्याची शक्यता आहे. हल्ला होऊन 2 तास झाल्यानंतरही मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे," फऱ्हाग पुढे सांगतात.

आत्मघाती हल्ले

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधल्या आत्मघाती हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

याच महिन्यात काबुलमधल्या एका पोलीस चौकीवर हल्ला करण्यात आला होता. यात 14 जणांनी जीव गमावला होता. तसंच 150 हून अधिक जण जखमी झाले होते.

तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

एकीकडे तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये अफगाणिस्तानील युद्ध संपुष्टात आणण्याची चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे याप्रकारचे मोठमोठे हल्ले होत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 16 ऑगस्टला ट्वीट केलं होतं की, "नुकतीच अफगाणिस्तान संदर्भातील बैठक संपवली. या बैठकीत विरोधकांतील बहुतेक जण कराराच्या बाजूनं दिसत आहेत."

अमेरिका आणि तालिबान लवकरच शांती कराराची घोषणा करतील, असेही अहवाल आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)