अफगाणिस्तानात जखमी झालेल्या अमेरिकन सैनिकाचं लिंग प्रत्यारोपण झालं यशस्वी!

अफगाणिस्तानात लढताना एक अमेरिकन सैनिक जखमी झाला. एक पाय गेला, ओटीपोटाचा काही भाग गेला आणि सोबतच त्याच्या लिंग आणि वृषणाचं जबर नुकसान झालं. मार इतका वाईट होता की याचा एकच उपाय होता - संपूर्ण प्रत्यारोपण.

आणि अमेरिकेतल्या डॉक्टरांच्या एका पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली, जी संपूर्ण लिंग आणि वृषण प्रत्यारोपणाची जगातली पहिली शस्त्रक्रिया होती.

बाल्टिमोर, मेरीलँडमधल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातल्या 11 डॉक्टरांनी 26 मार्चला 14 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया करून हे अवघड आव्हान पेललं.

डॉक्टरांनी सांगितलं की त्या सैनिकाचं लिंग, वृषण आणि ओटीपोटाच्या काही भागाचं सैनिकाच्या शरीरात रोपण करण्यात आलं.

लिंग पुर्नरचनेनंतर व्यक्तीच्या लैंगिक तसंच प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. मात्र या शस्त्रक्रियेनंतर सैनिकाची लैंगिक क्षमता पूर्ववत असेल असा डॉक्टरांना विश्वास आहे.

अफगाणिस्तानात एका लपवून ठेवलेल्या बाँबवर पाय पडल्याने या सैनिकाला ही गंभीर दुखापत झाली होती.

कामावर असताना जखमी झालेल्या सैनिकाचं अशा प्रकारे लिंग आणि वृषण प्रत्यारोपण होण्याची पहिलीच वेळ होती. वृषणाशी संलग्न पेशी आणि ओटीपोटीच्या महत्त्वाच्या भागाचं रोपण होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

पण काही नैतिक गोष्टींचा विचार करून अंडकोषाचं रोपण करण्यात आलेलं नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

"अगदीच भीषण परिस्थितीत शरीरापासून वेगळे झालेले अवयव दिसून येतात आणि त्यातून स्वाभाविकच व्यंग निर्माण होतं. युद्धादरम्यान झालेले काही घाव लपून राहतात, म्हणून त्यांचं गांभीर्य अनेकांच्या लक्षात येत नाही," असं जॉन हॉपकिन्स विद्यापीठातले प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रकटिव्ह सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. W.P अँड्यू ली यांनी सांगितलं.

युद्धादरम्यान जननेंद्रियाला झालेल्या दुखापतींबाबत कुणीच बोलत नाही, असं डॉ. ली यांनी सांगितलं.

"2014 मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठातर्फे सहप्रायोजित 'इंटिमसी अफ्टर इंज्युरी' (जखमांनंतरची जवळीक) या परिसंवादात आम्ही सैनिकांच्या पत्नी, त्यांच्या घरचे तसंच निकटवर्तीयांकडून अवघड जागी झालेल्या दुखापतींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आत्मविश्वासावर आणि नातेसंबंधांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घेतलं," ते सांगतात.

"मला जाग आली तेव्हा सगळं काही पूर्वीप्रमाणेच वाटलं," असं शस्त्रक्रिया झालेल्या सैनिकानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

वैद्यकीय परिभाषेत या शस्त्रक्रियेला vascularised composite allotransplantation असं म्हणतात. याद्वारे त्वचा, हाडं, स्नायू, रक्तवाहिन्या या सगळ्यांचं रोपण केलं जातं.

'द जॉन हॉपकिन्स जेनिटल ट्रान्सप्लांट प्रोग्राम' अंतर्गत या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च उचलण्यात आला. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी हा कार्यक्रम आधी फक्त मानसिक उपचारांपुरता मर्यादित होता.

सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीत हा सैनिक दैनंदिन आयुष्य सुरळीत जगू शकेल, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं.

शस्त्रक्रियेनंतर सैनिकाची प्रकृती ठीक असून, आठवडाभरात त्याला घरी सोडण्यात येईल, असं ट्रान्सप्लाट प्रोग्रामचे चिकित्सा संचालक डॉ. रिक रेडेट यांनी सांगितलं.

"ही रोपण शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे झाल्याने या सैनिकाला योग्य पद्धतीने लघवी करता येईल. त्याच्या लैंगिक क्षमताही सुरळीत असतील आणि त्याला दैनंदिन आयुष्य शांतपणे जगता येईल," असं डॉ. रिक यांनी सांगितलं.

सैनिकांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींसाठीही ही शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचं डॉक्टरांनी पुढे सांगितलं.

ट्रान्सप्लांट प्रोग्रामअंतर्गत लिंग तसंच वृषण प्रत्यारोपणाच्या 60 शस्त्रक्रियांना हॉपकिन्स विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

अमेरिकेतील बोस्टन येथे 2016 मध्ये पहिल्यांदा लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती.

हे वाचलंत का?