मृत्यूनंतरही आपले केस आणि नखं वाढत राहतात का?

    • Author, क्लॉडिया हॅमंड
    • Role, बीबीसी फ्युचर

तुमचं हृदय बंद पडतं, रक्त थंड होतं, अवयव कडक होतात. तुम्ही मेला आहात, हे दर्शवणारी ही सगळी चिन्हं. असं असतानाही देखील तुमची नखं आणि केस वाढत राहतात. खरंच? निदान आपल्याला तरी तसंच सांगितलं आहे आजवर.

एरिक मारिआ रेमार्क्यूच्या 'All Quiet on the Western World' या पुस्तकात मेलेल्या माणसाचं वर्णन आहे. सूत्रधाराचा मित्र मरतो. पण त्याच्या नखांचे विळखे वाढतच राहतात. त्याच्या फुटलेल्या कवटीतून त्याचे केस वाढत राहतात जसं काही सुपीक मातीत पिकच उगवलं आहे. ऐकायला कसंतरीच वाटत असलं तरी खरंच असं होतं का?

मृत्यूनंतर माणसाच्या नखांची आणि केसांची वाढ होते का? होते तर किती होते? यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले अभ्यास उपलब्ध नाहीत. अगदीच शोधायचं म्हटलं तर जुन्या गोष्टीमध्ये, इतिहासात काही उल्लेख सापडतात. जे वैद्यकीय विद्यार्थी मृतदेहावरून शिकत होते, त्यांच्या किश्यांमध्येही याचे उल्लेख सापडतात.

अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यविशारदांनाही मानवी शरीरातील वेगवेगळ्या पेशी मृत्यूनंतर वेगवेगळ्या कालावधीपर्यंत कार्यरत असतात, असा अनुभव आला आहे.

शरीरातील वेगवेगळ्या पेशी वेगवेगळ्या वेळी मरतात. हृदय थांबल्यानंतर मेंदूला होणारा रक्तप्रवाह थांबतो. रक्तशिवाय दुसरा कुठलाही ग्लुकोजचा पुरवठा नसल्याने मज्जातंतू मृत्युनंतर तीन ते सात मिनिटात मरतात.

अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या शल्यविशारदांना अवयवदात्यांच्या किडन्या, यकृत आणि हृदय मृत्यूनंतर तीस मिनिटाच्या आत काढावे लागतात. इतकंच नाही तर ज्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आहे, त्यात अवयव काढल्यानंतर सहा तासांत प्रत्यारोपण करावं लागतं.

नवीन पेशी

हाताची नखं वाढण्यासाठी नवीन पेशी तयार व्हाव्या लागतात, जे ग्लुकोजशिवाय शक्य नाही. नखं दररोज सरासरी 0.1 मिलीमीटरनं वाढतात. वाढत्या वयासोबत नखवाढीचा हा वेग मंदावतो.

नखाच्या तळाशी असलेल्या टिश्यूंचा (ऊती) थराला जर्मिकल मॅट्रिक्स म्हणतात. नखाच्या वाढीस कारणीभूत असलेल्या पेशी तयार होण्यास त्याचा उपयोग होतो. नवीन पेशी जुन्या पेशींना पुढे ढकलतात. त्यामुळेच नखांची लांबी वाढलेली दिसते. मृत्यूनंतर ग्लुकोजचा पुरवठा बंद होतो, स्वाभाविकच नखांची वाढही थांबते.

केसांच्या बाबतीतही तसंच होतं. केसांचा वाढीला बीजकोश कारणीभूत असतात. त्या बीजकोशाच्या तळाशी पेशी समूह असतो. त्याचं विघटन होऊन नवीन पेशी तयार होतात आणि त्यामुळेच केसांची वाढ होते. जोवर ऊर्जेचा पुरवठा सुरू आहे, तोवर हे विघटन वेगानं सुरू असतं. ती ऊर्जा ग्लुकोजच्या ज्वलनातून येते आणि त्याकरता ऑक्सिजनचं अस्तित्व लागतं.

एकदा का ह्रद्यानं रक्ताला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला की, ऊर्जेची निर्मिती थांबते. त्यामुळे पेशी समूहाचं कामही थांबतं.

तसं असेल तर मृत्यूनंतर केस आणि नखं वाढतात हा समज कसा काय दृढ झाला? या अशा दाव्यांमध्ये तथ्य नाही. पण कधीकधी काही जैविक कारणंही असतात. प्रत्यक्षात नखांभोवतीची त्वचा आक्रसते त्यामुळे नखं मोठी दिसू लागतात.

त्यामुळे आता कोणी सांगितलं की मृतदेहाची नखं आणि केस वाढतात, तर तसं केवळ हॉररपटात किंवा कथा-कांदबऱ्यांत शक्य आहे, प्रत्यक्षात नाही, हे लक्षात असू द्या.

(सूचना : या मजकूरात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यास वैद्यकिय सल्ला मानू नये.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)