You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या या माजी हॉकीपटूला का हवीय भारताची मदत?
भारत आणि पाकिस्तान! हे शब्द एकत्रित उच्चारले तरी वातावरण तापतं. खेळाच्या मैदानावर हे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकले की मुकाबला कट्टर होणार हे नक्की. भारत-पाकिस्तान हॉकीचे सामने अशाच कडव्या द्वंद्वांची प्रचिती देतात. पण मैदानाबाहेरचं सौहार्द अनेकदा एक उदाहरण घालून देतं.
हॉकीच्या मैदानावर पाकिस्तानच्या जर्सीत भारताविरुद्ध विजयासाठी जिवाचं रान करणारा एक खेळाडू निवृत्तीनंतर आयुष्याच्या लढाईसाठी भारताकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी हॉकीपटू मंसूर अहमद. उपचारांचा भाग म्हणून ह्दयात पेसमेकर बसवण्यात आलेले 49 वर्षांचे मंसूर ह्दय दात्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारतात त्यांना असा एक दाता मिळण्याची आशा आहे.
आणि या ह्रदय प्रत्यारोपणासाठी भारतात यायचं असल्याने त्यांनी भारत सरकारकडून व्हिसा मिळवण्यासाठी विनंती केली आहे.
युट्यूबवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये मंसूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला ह्रदय दात्याची गरज आहे आणि मला भारत सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे," असं मंसूर सांगताना दिसतात. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध दुरावलेले असले तरी मेडिकल व्हिसासाठी पाकिस्तानचे नागरिक भारताकडे विनंती करू शकतात.
"हॉकीच्या मैदानावर पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत असताना मी अनेक भारतीय चाहत्यांची मनं दुखावली आहेत," असं मंसूर यांनी 'स्पोर्ट्स टॉक' या न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं.
मेडिकल व्हिसाचा विनंती अर्ज मान्य करावा यासाठी मंसूर यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विनंती केली आहे.
पाकिस्तानच्या महान हॉकीपटूंमध्ये मंसूर यांची गणना होते. एक गोलकीपर म्हणून त्यांनी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.
1992 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या पाकिस्तान संघाचा ते भाग होते. 1994 मध्ये सिडनीत झालेल्या हॉकी विश्वचषकविजेत्या पाकिस्तान संघातही मंसूर होते.
मी भारतात अनेक सामने खेळलो आहे आणि पाकिस्तानला जिंकवून दिलं आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याला भेटण्यासाठी उत्सुक आहे, असं मंसूर यांनी सांगितलं.