You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स स्कॅंडलः अफगाणिस्तानात राजकारण्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी न्यूज, काबूल
सरकारमधील उच्चपदस्थांवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनी सध्या अफगाणिस्तान सरकार हादरून गेलं आहे. अधिकारी या आरोपांचा इन्कार करत असले तरी काही महिलांनीच बीबीसीला याविषयीची माहिती दिली आहे.
काबूलला चारही बाजूंनी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका घरात मी एका माजी महिला सरकारी कर्मचाऱ्याला भेटले.
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्या माझ्याशी बोलल्या. मात्र, जगाने आपली व्यथा ऐकावी, अशी त्यांची इच्छा आहे.
या महिलेने सांगितलं की सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री असलेले त्यांचे बॉस त्यांचा सतत छळ करायचे आणि एक दिवस त्या या बॉसच्या ऑफिसमध्ये गेल्या असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
त्या सांगतात, "त्यांनी मला लैंगिक संबंध ठेवण्याची थेट मागणी केली. मी म्हटलं की मी सुशिक्षित आणि अनुभवी आहे. तुम्ही मला असं काही म्हणाल, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी बाहेर जाण्यासाठी उभी राहिले. त्यांनी माझा हात धरून त्यांच्या केबिनच्या मागे असलेल्या खोलीकडे नेलं. त्यांनी मला त्या खोलीकडे ढकललं आणि म्हणाले, 'फक्त काही मिनिटं लागतील. काळजी करू नको. ये माझ्यासोबत.'"
"मी त्यांना ढकललं आणि म्हणाले थांबा. मला आरडाओरडा करायला भाग पाडू नका. त्यानंतर मी त्यांना कधीच बघितलं नाही. मी खूप संतापले होते आणि अस्वस्थ झाले होते."
या घटनेनंतर त्यांनी तक्रार नोंदवली का?
त्या सांगतात, "नाही. मी नोकरीचा राजीनामा दिला. माझा सरकारवर विश्वास नाही. तुम्ही न्यायालयात किंवा पोलिसांकडे गेलात तर ते किती भ्रष्ट आहेत, याची तुम्हाला कल्पना येईल. तक्रार करण्यासाठी कुठलीच सुरक्षित जागा नाही. तुम्ही आवाज उठवलात तर लोक स्त्रिलाच दोष देतील."
याच मंत्र्याने इतर दोन महिलांवर बलात्कार केल्याचं स्वतः त्या महिलांनीच आपल्याला सांगितल्याचं या माजी महिला सरकारी कर्मचाऱ्याने सांगितलं. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पडताळणी बीबीसीला करता आलेली नाही.
त्या सांगतात, "कसलीही तमा न बाळगता त्याचं हे कृत्य सुरू आहे. ते सरकारमध्ये एका वजनदार पदावर असल्याने त्यांना कुणाचीच भीती नाही."
स्त्रियांना राहण्यासाठी सर्वाधिक वाईट देशांमध्ये अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो. संयुक्त राष्ट्रांनी 2018 साली एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात अफगाणिस्तानमध्ये स्त्रिया कशा प्रकारे लैंगिक गुन्हे आणि हिंसाचाराला बळी पडतात आणि याविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकण्यात येतो, याचा तपशील देण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये तर पीडित महिलेवर झालेल्या अत्याचारासाठी तिलाच दोष दिला जातो.
अशा वातावरणात एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून होणाऱ्या लैंगिक छळवणुकीविरोधात बोलणं सोपं नाही.
आणि याच कारणामुळे आम्ही ज्या सहा महिलांशी बोललो त्यातल्या बऱ्याचजणींनी आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्याशी झालेल्या चर्चेवरून एक गोष्ट निश्चित कळली की अफगाणिस्तान सरकारमध्ये स्त्रियांचा लैंगिक छळ एक मोठी समस्या आहे. ती कुणा एका व्यक्तीपुरती किंवा एका मंत्रालयापुरती मर्यादित समस्या नाही.
'हा आता इथल्या संस्कृतीचाच भाग बनला आहे'
एका छोट्या बागेजवळ असलेल्या ऑफिसमध्ये मी दुसऱ्या एका महिलेला भेटले. त्यांनाही त्यांची व्यथा मांडायची होती. त्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज भरला होता. त्यांना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या जवळच्या सहकाऱ्याला भेटायला सांगण्यात आलं.
त्या सांगतात, "ती व्यक्ती होर्डिंग्जवर राष्ट्राध्यक्षांसोबत अनेकदा दिसायची. त्याने मला त्याच्या खाजगी कार्यालयात यायला सांगितलं. तो म्हणाला ये, बस. मी तुझी कागदपत्र मंजूर करतो. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला चल ड्रिंक्स घेऊया आणि सेक्स करूया."
"माझ्याकडे दोन पर्याय होते. एक तर ऑफर स्वीकारायची किंवा तिथून निघून जायचं. आणि मी ती ऑफर स्वीकारली असती तर हा प्रकार इथेच थांबला नसता. अनेक पुरूषांनी माझ्याकडे अशाच प्रकारची मागणी केली असती. ते खूप धक्कादायक होतं. मी घाबरले आणि तिथून पळ काढला."
मी विचारलं नोकरीचं काय झालं. त्यांनी सांगितलं त्या सरकारी विभागांमध्ये सतत फोन करायच्या. त्यांना सांगण्यात आलं, "कल्पना कर तुझ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. मात्र, तू ते न काढण्याचा निर्णय घेतला."
बोलता बोलता त्यांना रडू कोसळलं. त्या म्हणाल्या, "या सर्वांमुळे माझी रात्रीची झोप उडाली. खूप राग येतो. खूप नैराश्य येतं."
"याविरोधात तुम्ही न्यायाधीश, पोलीस किंवा वकिलाकडे तक्रार करायला गेलात तर तोसुद्धा तुमच्याकडे सेक्सची मागणी करतो. तेही असंच करत असतील तर जायचं कुणाकडे? तुमच्या सभोवती असणाऱ्या प्रत्येक पुरूषाला तुमच्याशी संभोग करायचा आहे, हा जणू इथल्या संस्कृतीचा भागच बनला आहे."
याविषयावर कुणीच बोलत नव्हतं किंवा बोललं तरं दबक्या आवाजातच. मात्र, गेल्या मे महिन्यात या अन्यायाला वाचा फुटली. राष्ट्राध्यक्षांचे एकेकाळचे सल्लागार आणि आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले जनरल हबिबुल्लाह अहमदझई यांनी अफगाणिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचं बिंग फोडलं.
त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांवर 'देहव्यापाराला चालना' देत असल्याचा आरोप केला.
आम्ही राष्ट्राध्यक्षांकडेही मुलाखतीसाठी वेळ मागितला होता. मात्र, राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने नकार दिला. आम्ही ई-मेलवरून पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरंही त्यांनी दिली नाही. त्यांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेलं निवेदन आम्हाला पाठवलं. त्यात म्हटलंय जनरल अहमदझई यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. स्वतःच्या हितासाठी ते खोटं बोलत आहेत.
सरकारमध्ये मंत्री असलेल्या नरगीस नेहान यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्या म्हणतात, "NUG (National Unity Government) सरकारच्या मंत्रिमंडळातील महिला सदस्य या नात्याने मी पूर्ण आत्मविश्वासाने हे सांगू शकते की हे सर्व आरोप तथ्यहिन आहेत."
मात्र, आताआतापर्यंत खासदार असलेल्या महिला अधिकार कार्यकर्त्या फौझिया कोफी सांगतात की विद्यमान सरकारमधल्या अनेक अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत.
त्या सांगतात, "सरकारने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ते या विषयाकडे अफगाणिस्तानच्या सर्व स्त्रियांचा प्रश्न म्हणून नाही तर राजकीय मुद्दा म्हणून बघत आहेत."
"काहीही केलं तरी शिक्षा होणार नाही, ही संस्कृती वाढीस लागली आहे. गुन्हा करणाऱ्या पुरूषाला या सरकारमध्ये सुरक्षित वाटतं आणि त्यातूनच त्यांना अधिकाधिक गुन्हे करण्याची प्रेरणा मिळते."
लैंगिक छळवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी नियुक्त केलेल्या महाधिवक्त्यांच्या देखरेखीखाली ही चौकशी सुरू आहे.
मी महाधिवक्त्यांचे प्रवक्ते जामशीद रसुली यांची त्यांच्या काबुलमधल्या ऑफिसमध्ये भेट घेतली. त्यांच्या टेबलाच्या मागच्या भिंतीवर राष्ट्राध्यक्ष घनी यांचा मोठा फोटो टांगलेला होता.
मी त्यांना विचारलं ही चौकशी निष्पक्ष होईल, यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा?
ते म्हणाले, "राज्यघटनेने महाधिवक्त्यांना निष्पक्ष राहण्याचे अधिकार दिले आहेत. लोकांचा या चौकशीवर विश्वास बसावा, यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम धर्मगुरू आणि मानवाधिकार संघटनांनाही या चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे."
ज्या पीडित महिलांना आम्ही भेटलो त्यांचा सरकारी संस्थांवर विश्वास नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं.
ते म्हणाले, "प्रत्येक तक्रारकर्त्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, हे आम्ही आधीच जाहीर केलं आहे. जे आमच्याशी सहकार्य करतील ते आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा पुरवण्याची तरतूद आम्ही करू."
देशात लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी अफगाणिस्तानने मोठी किंमत मोजली आहे. तिथे झालेल्या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या राजवटीत महिलांवर अनन्वित अत्याचार व्हायचे. त्यामुळे या तालिबान्यांविरोधात झालेल्या युद्धाचा एक हेतू महिलांचे अधिकार आणि त्यांची प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं, हा देखील होता.
अफगाणिस्तानात सध्या Resolute Support ही नाटोच्या नेतृत्वात मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या अधिकाऱ्यांनीदेखील अफगाणिस्तान सरकारमध्ये सुरू असलेला लैंगिक अत्याचार हा अफगाणिस्तानचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. संयुक्त राष्ट्रांच्या UN Women या आघाडीकडेही आम्ही प्रतिक्रियेसाठी वारंवार विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया मिळाली नाही. ब्रिटीश दूतावासानेही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
अफगाणिस्तानातल्या महिलांसाठी हा अनिश्चिततेचा काळ आहे. अमेरिका आणि तालिबान यांच्यात सध्या सुरू असलेल्या शांतता चर्चेत आपलं म्हणणंही ऐकलं जावं, अशी इथल्या महिलांची इच्छा आहे. 2001 साली तालिबान्यांची सत्ता संपली. तेव्हापासून आतापर्यंत अफगाणिस्तानातल्या, किमान काही भागातल्या, महिलांनी एक मोठा टप्पा गाठला आहे.
मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये लैंगिक छळ करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर महिलांच्या या प्रगतीला काहीच अर्थ उरणार नाही.
"मी राष्ट्राध्यक्षांना सांगू इच्छिते की महिलांचा आवाज ऐकणं आणि तो स्वीकारणं, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना हा देश सुरक्षित करायचा असेल तर त्यांनी ही समस्याही सोडवली पाहिजे", अशी प्रतिक्रिया एका पीडित महिलेने दिली. ती पुढे म्हणते, "एक दिवस सत्य नक्कीच समोर येईल. मात्र, सध्यातरी हे दूरचं स्वप्न आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)