सुप्रीम कोर्टाच्या वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचे छापे

सर्वोच्च न्यायालयातील वकील इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या दिल्ली आणि मुंबईमधील घरांवर सीबीआयनं छापे मारले आहेत.

त्यांच्या दिल्लीतील लॉयर्स कलेक्टिव्ह या NGO नं परदेशातून येणाऱ्या देणग्यांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. दिल्लीमध्ये सीबीआयनं जयसिंह आणि ग्रोवर यांच्या 54- निजामुद्दीन ईस्ट भागातील निवासस्थानावर आणि सी-6 निजामुद्दीन ईस्टमधील लॉयर्स कलेक्टिव्हच्या कार्यालयावर छापे मारले.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आनंद ग्रोवर हे इंदिरा जयसिंह यांचे पती आहेत. इंदिरा जयसिंह भारताच्या अॅडिशनल सॉलिसिटर जनरल होत्या. त्यांच्या NGO नं Foreign Contribution Regulation Act चं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

लॉयर्स कलेक्टिव्हनं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या महिन्यात सीबीआयनं ग्रोवर आणि त्यांची NGO लॉयर्स कलेक्टिव्हविरोधात खटला दाखल केला होता. ग्रोवर या NGO चे संचालक आहेत आणि त्यांच्या पत्नी इंदिरा जयसिंह विश्वस्त आणि सचिव आहेत.

परदेशी निधीमध्ये अनियमिततेचा आरोप

गृह मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयनं हा खटला दाखल केला होता. लॉयर्स कलेक्टिव्हवर 2006-07 आणि 2014-15 दरम्यान 32.39 कोटी रुपयांहून अधिक परदेशी निधीच्या अनियमिततेचा आरोप आहे.

या NGO चा एफसीआरए रजिस्ट्रेशन नंबर 2016 मध्येच निलंबित करण्यात आला होता. कारण अनियमिततेच्या आरोपांवर त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नव्हतं, असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

अर्थात, हा खटला वस्तुस्थिती आणि कायदेशीर प्रक्रियेला धरून दाखल केला नाहीये तर जाणूनबुजून लक्ष्य करण्यासाठी दाखल केला असल्याचं लॉयर्स कलेक्टिव्हनं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी या छाप्यावर ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "आनंद ग्रोवर आणि इंदिरा जयसिंह यांच्यावर आपल्या एनजीओसाठी परदेशी निधीचा वापर केल्याचा ठपका राजकीय सूडबुद्धीनं ठेवण्यात आला आहे. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून छापेमारी आणि खटल्यांचा वापर हा विरोधकांना त्रास देण्यासाठी होतोय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)