You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी
- Author, मोहम्मद काज़िम
- Role, बलूचिस्तानची राजधानी क्वेटाहून बीबीसी उर्दूसाठी
1970च्या दशकाच्या सुरुवातीला पहिल्यांदा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अस्तित्त्वात आली.
हा तो काळ होता जेव्हा माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या पहिल्या कार्यकाळात बलुचिस्तानामध्ये पाकिस्तानी सरकारच्या विरोधात सशस्त्र बंडाला सुरुवात झाली होती.
पण लष्करी हुकुमशहा झिया उल् हक यांनी सत्ता बळकावल्यानंतर बलुच नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली. याचा परिणाम म्हणून सशस्त्र बंड संपलं आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीही शांत झाली. पाकिस्तानातल्या याच बलुचिस्तान लिबरेश आर्मी (बीएलए) चा समावेश अमेरिकेने जहालवादी संघटनांच्या यादीमध्ये केला आहे.
पण माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या काळामध्ये बलुचिस्तान हायकोर्टाचे न्यायाधीश असणाऱ्या न्यायमूर्ती नवाज मिरी च्यांच्या खुनाच्या आरोपात बलुच नेते नवाब खैर बख्श मिरी यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर 2000 सालापासून बलुचिस्तानाच्या विविध भागांमध्ये सरकारी इमारती आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांचं सत्र सुरू झालं.
कालागणिक या हल्ल्यांमध्ये वाढ तर झालीच, पण हे हल्ले होण्याचं क्षेत्र वाढलं. बलुचिस्तानातल्या भिन्न भागांमध्ये हे हल्ले होऊ लागले.
बहुतेकदा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या हल्ल्यांची जबाबदारी घेत असे.
2006 मध्ये पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये केला. आणि नवाब खैर बख्श मिरी यांचा मुलगा नवाबजादा बालाच मिरी हा या संघटनेचा प्रमुख असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
नोव्हेंबर 2007 मध्ये बालाच मिरीचा मृत्यू झाल्याची बातमी आली. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेल्याचं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं.
चिनी तळांना विरोध
बालाच मिरीच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये राहणारा त्याचा भाऊ नवाबजादा हीरबयार मिरी हा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रमुख झाल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
पण नवाबजादा हीरबयार मिरीने मात्र आपण एका सशस्त्र गटाचा प्रमुख असल्याचे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत.
नवाबजादा बालाच मिरीच्या मृत्यूनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रमुख म्हणून अस्लम बलोचचं नाव समोर आलं. त्याची गणना या आर्मीच्या सेंट्रल कमांडर्समध्ये करण्यात येऊ लागली.
पण एका चकमकीमध्ये अस्लम बलोच जखमी झाला आणि त्याला उपचारांसाठी भारतात आणण्यात आलं. त्यानंतर त्याचे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या इतर नेत्यांसोबत मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या.
तब्येत बरी झाल्यानंतर अस्लम बलोच हा बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानाच्या विविध भागांमध्ये रहात होता.
अस्लम बलोचच्याच काळात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमधील महत्त्वाच्या एका गटाकडून आत्मघातकी हल्ल्यांना सुरुवात करण्यात आली. ही संघटना या हल्ल्यांना 'फिदायीन हल्ला' म्हणते.
चीन आणि पाकिस्तानमधील आर्थिक व्यवहारांनाही या संघटनेचा विरोध आहे. आणि त्यांच्या पाकिस्तानातील सध्याच्या कारवायांमध्ये त्यांनी चीनी संस्थांना लक्ष्य केलं.
ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्यांदाच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एका आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी घेतली. अस्लम बलोचच्या मुलाने स्वतः चागी जिल्ह्याच्या दालबंदीन इथल्या मुख्यालयावर हा हल्ला केला होता.
तसंच लष्करी प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या ज्या बसवर हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये चीनी इंजिनियर देखील होते.
इतर सशस्त्र संघटनांसोबत हातमिळवणी
यानंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने नोव्हेंबर 2018मध्ये कराचीतल्या चीनी दूतावासावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी घेतली. 3 आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केला होता.
या हल्ल्यानंतर कंदाहारच्या ऐनू मीना भागामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये अस्लमचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार आता बीएलएची जबाबदारी बशीर जेबकडे आहे. नेतृत्त्व बदललं तरी या संघटनेकडून करण्यात येणाऱ्या 'फिदायीन हल्ल्यांचं' सत्र थांबलेलं नाही.
यावर्षीच्या मे महिन्यात ग्वादरमधल्या प्रिरील कॉन्टिनेन्टल हॉटेलवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडच्या सदस्यांनी अशाच प्रकारचा हल्ला केला.
मजीद बलूचच्या नावावरून मजीद ब्रिगेड तयार झाली. 1970च्या दशाकात त्याने तेव्हाचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तोंवर बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्वादरमधल्या हॉटेलवरील हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो आणि व्हीडिओ संदेशही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून प्रसिद्ध करण्यात आले.
नोव्हेंबर 2017मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी 'बलुच राजी अजूई सिंगर' उर्फ 'ब्रास' नावाच्या बलुची या जहालवादी संघटनांच्या गटामध्ये सामीलही झाली.
या गटामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मिखेरीज बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान रिपब्लिकन गाईड्स नावाच्या संघटनाही सामील आहेत.
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या आसपास हा गट कारवाया करतो.
डिसेंबर 2018मध्ये तम्पमध्ये सुरक्षा दलांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासोबतच या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिरबत आणि पंजगौरदरम्यान सुरक्षा दलांवर झालेला हल्ला आणि एप्रिलमध्ये ओरमाढा परिसरातल्या कोस्टल हायवेवर नौदलाच्या अधिकाऱ्यांना बसमधून उतरवून करण्यात आलेल्या हत्यांची जबाबदारी 'ब्रास'ने आतापर्यंत घेतली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)