वर्ल्ड कप 2019: इंग्लंडची 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' अशी संभावना होणारी टीम कशी बनली विश्वविजेती?

इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजयी इंग्लंड संघ

वर्ल्ड कपचं बिगूल वाजलं. एकामागोमाग एक मॅचेस सुरू झाल्या. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर कॉमेंट्री करत होते. कॉमेंट्रीदरम्यान बोलत असताना कोणते संघ जेतेपदासाठी संभाव्य वाटतात असं गावस्कर यांना विचारण्यात आलं.

इंग्लंड असं उत्तर त्यांनी सहजतेने दिलं. त्यावेळी ते गमतीत असंही म्हणाले की इंग्लंडचा संघ म्हणजे 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' संघ आहे. फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ असणारे आणि कॉमेंट्रीचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या गावस्कर यांचे उद्गार इंग्लंड क्रिकेटच्या बहुविधतेची साक्ष देणारे आहेत.

इऑन मॉर्गन

इंग्लंडच्या संघातील पंधरा खेळाडूंपैकी सातजण मूळ इंग्लंडचे नाहीत. इंग्लंडचा संघनायक इऑन मॉर्गन आयर्लंडचा आहे. आयर्लंडला आंतरराष्ट्रीय पटलावर आणण्यात मॉर्गनचा महत्त्वाचा वाटा आहे.

मात्र आयर्लंडमध्येच राहिलो तर क्रिकेट कारकीर्द मर्यादित राहील हे मॉर्गनच्या लक्षात आल्यानंतर त्याने इंग्लंडची वाट धरली. डावखुऱ्या मॉर्गनच्या बॅटिंग शैलीत देखणेपण आहे.

पारंपरिक शैलीला आधुनिक स्टाइलची जोड हे मॉर्गनच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य. बॅटिंगइतकंच मॉर्गनचे नेतृत्वगुण मोलाचे आहेत. दडपणाच्या क्षणीही शांत राहत चतुराईने योग्य निर्णय घेण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. 2015 वर्ल्ड कपमध्ये मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड टीमचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं.

इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मॉर्गन

त्यावेळी मॉर्गन आणि इंग्लंडच्या संघावर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती. यानंतर इंग्लंड क्रिकेटच्या संरचनेत अमूलाग्र बदल करण्यात आले. चार वर्षांनंतर मॉर्गनच्याच नेतृत्वाखालील संघाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. बेधडक आणि आक्रमक पवित्र्याचं क्रिकेट हा बदल मॉर्गनने घडवून आणला. मॉर्गनचा आयर्लंड ते इंग्लंड असा प्रवास इथे वाचू शकता.

बेन स्टोक्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या परिणामकारक ऑलराऊंडर्समध्ये बेन स्टोक्सची गणना होते. स्टोक्स मूळचा न्यूझीलंडचा. दहाव्या वर्षी स्टोक्स इंग्लंडमध्ये आला. जगातल्या कोणत्याही संघात विशेषज्ञ फलंदाज किंवा विशेषज्ञ गोलंदाज म्हणून खेळण्याचं गुणकौशल्य स्टोक्सकडे आहे. खणखणीत कामगिरीच्या बरोबरीने वादविवादांमध्ये अडकल्याने स्टोक्सचं नाव चर्चेत असतं.

बेन स्टोक्स

फोटो स्रोत, Clive Mason/getty images

फोटो कॅप्शन, बेन स्टोक्स

काही वर्षांपूर्वी अँड्रयू फ्लिनटॉफ हेच काम इंग्लंड संघासाठी करत असे. फ्लिनटॉफची परंपरा स्टोक्स प्राणपणाने जपतो आहे. प्रत्येक मॅचमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर ठसा उमटवण्यात स्टोक्स वाकबगार आहे. बाकी खेळाडूंची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नसताना स्टोक्सने इंग्लंडला तारल्याची अनेक उदाहरणं आहेत.

टॉम करन

झिम्बावेचे माजी क्रिकेटपटू केव्हिन करन यांचा हा मुलगा. केव्हिन यांना तीन मुलं. बेन, सॅम आणि टॉम हे तिघेही क्रिकेट खेळतात. सॅम आणि टॉम यांनी इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. टॉमचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनचा. मात्र त्याचं शालेय शिक्षण झिमाब्बेची राजधानी हरारेतल्या स्प्रिंगवेल हाऊस इथं झालं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हरारेमधल्याच सेंट जॉर्ज कॉलेजात टॉमने प्रवेश घेतला.

टॉम करन

फोटो स्रोत, Andy Kearns/getty images

फोटो कॅप्शन, टॉम करन

इंग्लंडमधील काऊंटी संघ सरे संघाचे प्रशिक्षक इयन ग्रेग यांनी टॉमचं नैपुण्य हेरलं. 2012 मध्ये त्यांनी टॉमला सरे सेकंड इलेव्हन संघातर्फे खेळण्यासाठी इंग्लंडला बोलावलं. टॉमची क्रिकेट कारकीर्द सुरू झाली आणि त्याने लंडनमधील वेलिंग्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र त्याचवर्षी त्याचं पितृछत्र हरपलं. टॉमचे वडील केव्हिन करन यांचं अचानक निधन झालं. दोन्ही भावांच्या पाठिंब्याच्या बळावर टॉम सावरला.

वडिलांच्या जाण्याने खचून न जाता टॉमने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. टॉमने दाखल झाल्यापासून पाच वर्षात इंग्लंडसाठी पदार्पण केलं. वेग आणि स्विंग या दोन्ही आघाड्यांवर टॉमने प्रभावित केलं आहे. बॅटिंगही करत असल्याने टॉमची उपयुक्तता वाढते. मार्क वूड, लायम प्लंकेट, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्या बरोबरीने राखीव खेळाडू म्हणन टॉमची वर्ल्ड कप संघात निवड होणं हे त्याच्या सातत्यपूर्ण खेळाचं प्रतीक आहे.

जेसन रॉय

पिचवर येता क्षणापासून दे दणादण बॅटिंग करणारा जेसन रॉय हा वीरेंद्र सेहवाग स्टाईल शैलीतला. चार वर्षांपूर्वी वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंडने त्यांच्या वनडे खेळण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल केला. जेसन रॉय या बदललेल्या दृष्टिकोनाचा पाईक आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव या पद्धतीने खेळणारा जेसन प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरतो आहे. सातत्याने चौकार-षटकारांची लयलूट करत मॅचचं पारडं पालटवण्याची ताकद जेसनकडे आहे.

जेसन रॉय

फोटो स्रोत, David Rogers/getty images

फोटो कॅप्शन, जेसन रॉय

इंग्लंडचा बिनीचा शिलेदार असलेला रॉय मूळचा दक्षिण आफ्रिकेचा. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला मात्र इंग्लंडकडून खेळलेला केव्हिन पीटरसन नाताळ संघाचा. जेसनला नेक्स्ट केपी असं म्हटलं गेलं. जेसन रग्बीही चांगलं खेळायचा. जेसन दहा वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबीयांनी इंग्लंडला स्थलांतर केलं. त्यानंतर जेसनचे आईबाबा विभक्त झाले.

सरे संघाच्या अकादमीत जेसनच्या नैपुण्याला हिरे पाडण्यात आले. प्रशिक्षकांनी जेम्सची आक्रमक शैली बदलली नाही. त्यांनी त्याच्या बचाव तंत्रावर काम केलं. गेल्या चार वर्षांपासून रॉय जगभरातल्या बॉलर्सचा पालापाचोळा करतो आहे. जेसन जेव्हाही शतक झळकावतो किंवा मोठी खेळी करतो तेव्हा इंग्लंडचा संघ जिंकतो असं समीकरण वर्ल्ड कपमध्येही कायम राहिला.

मोईन अली

बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा मोईन अली इंग्लंडच्या संघाला अनोखं संतुलन मिळवून देतो. मोईनचे आजोबा पाकिस्तानचे आणि आजी इंग्लंडची. अली कुटुंब पाकिस्तानहून इंग्लंडमध्ये स्थायिक झालं. मोईनचे बाबा मुनीर अली आणि त्यांच्या भावाची मोईनच्या क्रिकेटपटू म्हणून जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.

प्रशिक्षण देता यावं यासाठी मुनीर यांनी नोकरी सोडली. मोईन आणि त्याच्या काकांची मुलं क्रिकेट खेळतात. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा सगळ्या प्रकारात मोईनला स्वत:ला इंग्लंडच्या संघात स्थापित केलं आहे. मोईन नियमितपणे सामाजिक उपक्रमात सहभागी होतो. ज्यांना सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत त्यांच्यासाठी मोईन क्रिकेट प्रशिक्षण देतो. पाच वर्षांपूर्वी भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचदरम्यान मोईन सेव्ह गाझा आणि फ्री पॅलेस्टाईन अशा रिस्टबँडसह खेळला होता.

मोईन अली

फोटो स्रोत, Alex Davidson/getty images

फोटो कॅप्शन, मोईन अली

निष्पाप नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी मोईनने हे पाऊल उचललं होतं. उम्माह वेल्फेअर ट्रस्ट ही सामाजिक संस्था गाझामधील नागरिकांसाठी कार्य करतं. मोईनच्या रिस्ट बँडच्या लिलावातून 500 युरोचा निधी या संस्थेला मिळाला. दरम्यान मॅचदरम्यान राजकीय, धार्मिक, वर्णभेदात्मक कोणताही संदेश देणारा गणवेश अथवा साहित्य परिधान करू नये असा नियम आहे. रिस्ट बँडमुळे मोईन वादाच्या भोवऱ्यात सापडला. मात्र वादाची राळ बाजूला सारत मोईनने आपल्या कामगिरीने दखल घेण्यास भाग पाडलं.

आदिल रशीद

स्विंग गोलंदाजी ही इंग्लंड क्रिकेटची ताकद आहे. मात्र त्यांना चांगल्या लेगस्पिनरची आवश्यकता होती. आदिल रशीद नेमकेपणाने हेच काम करतो आहे. रशीदच्या गोलंदाजीवर धावा लुटल्या जातात असा आरोप होतो मात्र रशीद विकेट्स पटकावतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बॅट्समनना माघारी धाडण्याचं काम रशीद करतो.

आदिल रशीद

फोटो स्रोत, NurPhoto/getty images

फोटो कॅप्शन, आदिल रशीद

रशीदच्या गोलंदाजीवर सहजपणे धावा करता येतील या हेतूने बॅट्समन धोका पत्करतात. मात्र रशीद चतुर गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांना पूरक ठरत रशीद मोक्याच्या क्षणी धावांना वेसण घालतो आणि विकेट्सही मिळवतो. यॉर्कशायर काऊंटीच्या मुशीत घडलेला रशीदचं मूळ पाकिस्ताना आहे. 1967 मध्ये त्याचे कुटुंबीय इंग्लंडला स्थलांतरित झाले.

जोफ्रा आर्चर

कॅरेबियन बेटांवरील बार्बाडोसच्या जोफ्रा आर्चरचा प्रवास थक्क करणारा आहे. भन्नाट वेग आणि त्याच्या जोडीला अचूकता हे जोफ्राचं वैशिष्ट्य. वयोगट स्पर्धा गाजवल्यानंतर जोफ्रा वेस्ट इंडिजसाठी U19 वर्ल्ड कप खेळला. मात्र वेस्ट इंडिजसाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होणार हे लक्षात आल्यानंतर जोफ्राने इंग्लंडची वाट धरली.

इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट गाजवल्यानंतर आर्चरच्या नावाची वर्ल्ड कपसाठी चर्चा सुरू झाली. इंग्लंडच्या संघात खेळायला पात्र ठरण्यासाठी सात वर्षांचं वास्तव्य आवश्यक आहे. आर्चरची गुणवत्ता आणि उपयुक्तता लक्षात घेऊन ईसीबीने क्वालिफिकेशन नियम शिथिल केला.

मात्र वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या प्रोव्हिजनल संघात आर्चरची निवड करण्यात आली नाही. मात्र आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत आर्चरने इंग्लंडसाठी पदार्पण केलं. वर्ल्ड कपसाठी डेव्हिड विलीच्या ऐवजी आर्चरची निवड करण्यात आली.

2015 वर्ल्ड कपमध्ये प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळल्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल झाले.

जोफ्रा आर्चर

फोटो स्रोत, PAUL ELLIS/getty images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर

इंग्लंडचा संघ अगदी पारंपरिक शैलीत वनडे क्रिकेट खेळत असे. 250-270 धावांची मजल त्यांना खूप वाटत असे. बाकी संघ तीनशेचा टप्पा सहजपणे ओलांडत होते. जिंकण्यात सातत्य हवं असेल तर तीनशे-साडेतीनशेचा टप्पा ओलांडण्यासाठी त्यांनी बॅट्समनला जोरदार फटकेबाजीचा परवानाच दिला.

एकेरी, दुहेरी धावांच्या बरोबरीने सातत्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करतील अशा फलंदाजांना इंग्लंडने प्राधान्य दिलं. या धोरणामुळे अलेक्स हेल्स, जेसन रॉय इंग्लंडच्या वनडे संघाचा भाग झाले. जॉनी बेअरस्टो, जोस बटलर हे अधिक आक्रमक झाले. तंत्रशुद्धतेसाठी ओळखला जाणारा जो रूटवर संयमी खेळी करत डावाला आकार देण्याची जबाबदारी देण्यात आली.

वनडे आणि टेस्ट क्रिकेट अशी विभागणी केली. टेस्टसाठीचा संघ त्या फॉरमॅटला साजेसं खेळेल आणि वनडे संघ आक्रमक स्वरुपाचं क्रिकेट खेळेल अशी संरचना करण्यात आली.

बेन स्टोक्सने इंग्लंडच्या संघाला जबरदस्त संतुलन मिळवून दिलं. अँड्रयू फ्लिनटॉफ जे काम करत असे ती परंपरा आता बेन स्टोक्स नेटाने पुढे चालवतो आहे.

प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर फक्त वेगवान गोलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही याची इंग्लंडला जाणीव झाली. बॉलिंग युनिट सर्वसमावेशक करण्यासाठी त्यांनी आदिल रशीदवर विश्वास ठेवला. रशीदच्या गोलंदाजीवर धावा होत असल्या तरी तो मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवतो. मॉर्गन ठामपणे रशीदच्या पाठीशी उभा राहिला.

मधल्या षटकांमध्ये विकेट्सची चणचण जाणवते हे लक्षात घेऊन इंग्लंडने लायम प्लंकेटला संघात घेतलं. प्लंकेट प्रामुख्याने 11 ते 40 या ओव्हर्समध्येच बॉलिंग करतो. या टप्प्यात धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या प्लंकेट इमानेइतबारे सांभाळतो आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये प्लंकेटने न्यूझीलंडचा कणा असलेल्या केन विल्यमनसनला बाद करत सामन्याचं पारडं फिरवलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त