IPL 2020 : दिनेश कार्तिकनं कोलकात्याचं कर्णधारपद का सोडलं?

दिनेश कार्तिक

फोटो स्रोत, KKR.IN

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोलकाता नाईट रायडर्स संघांचं नेतृत्व दिनेश कार्तिकऐवजी आयोन मॉर्गनकडे असणार आहे. केकेआर संघव्यवस्थापनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात घोषणा केली.

बॅटिंगवर लक्ष केंद्रित करायचं असल्याने दिनेशऐवजी आयोन मॉर्गनकडे सोपवण्यात आल्याचं केकेआर संघव्यवस्थापनाने म्हटलं आहे. दिनेश आणि आयोन हे कोलकाताचे आधारस्तंभ आहेत.

याआधीही त्या दोघांच्या अनुभवाचा संघाला फायदा झाला आहे. दिनेशकडे नेतृत्व असतानाही मॉर्गनने वरिष्ठ खेळाडू म्हणून समन्वयाची भूमिका निभावली आहे. दिनेशच्या निर्णयाचं आम्हाला आश्चर्य वाटलं. परंतु त्याचा निर्णयाचा आम्ही आदर करतो.

मॉर्गन वर्ल्डकपविजेता कर्णधार आहे. इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्याची मोलाची भूमिका होती. दिनेशप्रमाणेच कोलकाताला विजयपथावर राखण्यासाठी तो कटिबद्ध असेल असा विश्वास वाटतो असं केकेआर संघव्यवस्थापनाने म्हटलं आहे.

इऑन मॉर्गनचा आतापर्यंतचा प्रवास

जगाला क्रिकेट इंग्लंडने शिकवलं. इंग्लंड साम्राज्याच्या वसाहती असलेल्या देशांमध्ये क्रिकेट खऱ्या अर्थाने रुजलं, फोफावलं. वर्ल्डकप म्हणजे कॉमनवेल्थ स्पर्धा अशी टीका केली जाते. क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्स इंग्लंडमध्येच आहे. इतकं सगळं असूनही इंग्लंडच्या नावावर एकही वर्ल्डकप जेतेपद नाही.

चार वर्षांपूर्वी प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळल्यानंतर इंग्लंड क्रिकेटने कात टाकली. चार वर्षांनंतर नवी जर्सी आणि नव्या दृष्टिकोनासह इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे. इंग्लंडच्या स्वप्नांची धुरा एका स्थलांतरिताकडे आहे.

इऑन मॉर्गन इंग्लंडचा संघनायक आहे. मॉर्गन मूळचा आयर्लंडचा. त्यांच्यासाठी क्रिकेटही खेळला. मात्र आयर्लंडच्या तुलनेत इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय पातळीसाठी लवकर परिपक्व झाला. चांगल्या संधीच्या शोधात मॉर्गनने इंग्लंडची निवड केली.

मॉर्गन इंग्लंडमध्येच रमला. चार वर्षांपूर्वी झालेल्या चुका टाळून इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यासाठी मॉर्गन मंडळी सज्ज झाली आहेत.

आयर्लंड ते इंग्लंड

इऑन मॉर्गनचं आयर्लंड ते इंग्लंड संक्रमण समजून घेण्यासाठी इंग्लंड आणि आयर्लंड यांची भौगौलिक रचना, आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध समजून घेणं अनिवार्य आहे.

इऑन मॉर्गन, इंग्लंड, आयर्लंडज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन

इंग्लंड आणि ब्रिटन आपण एकच समजतो, परंतु प्रत्यक्षात या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. 1603 रोजी जेम्स चौथा यांचं स्कॉटलंडवर राज्य होतं. त्याने इंग्लंड आणि स्कॉटलंड आपल्या साम्राज्याखाली एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्वत:ला द किंग ऑफ ग्रेट ब्रिटन म्हणून घोषित केलं. परंतु दोन्ही देशातील राजकारण आणि जनतेचा वाढता विरोध यामुळे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिलं.

1702 मध्ये राणी अॅनी सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्व देशांना एकत्र आणण्याचा मनसुबा व्यक्त केला. 1 जानेवारी 1801 मध्ये संपूर्ण देश स्थापण्यात आला. युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड. ग्रेट ब्रिटनसह इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स यांचा समावेश करण्यात आला. राजकीय हेतूनं हे एकत्रीकरण करण्यात आलं होतं.

आयर्लंडमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळ झाली, ज्याचा परिणाम म्हणजे 1922 मध्ये रिपब्लिक ऑफ आयर्लंड अस्तित्वात आलं. नॉर्थन आयर्लंडवगळता रिपब्लिक ऑफ आयर्लंडचे सर्व प्रदेश युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटनमधून वेगळे झाले.

नकाशा

इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थन आयर्लंड सह ग्रेट ब्रिटनचे युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड असं नामकरण झालं. हे आजचं युनायटेड किंग्डम आहे.

ब्रिटिश आईल्स ही एक भौगौलिक संज्ञा आहे. ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील सर्व बेटांना आणि देशांना एकत्रितरीत्या ब्रिटिश आईल्स म्हटलं जातं. यामध्ये रिपब्लिक ऑफ आयर्लंड देशाचा समावेश होतो.

ब्रिटिश आईल्स कोणत्याही देशाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. 'रिपब्लिक ऑफ आयर्लंड' हा ब्रिटिश आईल्सचा भाग असला तरी या देशातील नागरिक ब्रिटिश म्हणून ओळखले जात नाहीत.

थोडक्यात इंग्लंड आणि आयर्लंड म्हणजे भावबंदकी वागवणारे सख्खे भाऊ.

क्रिकेट खेळणारं कुटुंब

आयर्लंडमधल्या डब्लिन शहरात मॉर्गन लहानाचा मोठा झाला. रश क्रिकेट क्लब हे मॉर्गनचं दुसरं घरच. निसर्गाची मुक्त उधळण आणि अमाप शांतता हे डब्लिनचं वैशिष्ट्य. मॉर्गनला क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळालेला.

मॉर्गनचे वडील क्रिकेट खेळायचे. इऑनच्या दोन बहिणी आणि तीन भाऊही क्रिकेट खेळतात. मात्र इऑनकडे खास गुणवत्ता आहे, हे घरच्यांनी हेरलं. मॉर्गनच्या उमेदवारीच्या काळात एडी स्कॅनलान यांनी त्याच्या गुणवत्तेला पैलू पाडले.

इऑन मॉर्गन, इंग्लंड, आयर्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन आणि कोच ट्रेव्हर बायलिस

एका स्कॉलरशिपच्या निमित्ताने मॉर्गनने कॅथलिक युनिव्हर्सिटी स्कूल जॉईन केलं. या शाळेच्या संघाचा तो अविभाज्य भाग झाला. प्रत्येक हंगामात खोऱ्याने धावा करणाऱ्या मॉर्गनवर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मॉर्गनला मोठं आकाश खुणावत होतं. त्याला खेळायचं होतं आणि आयर्लंड मुख्य प्रवाहात नसल्याने खेळण्याच्या संधी मर्यादित राहणार, हे कुटुंबीयांच्या लक्षात आलं.

16व्या वर्षी मॉर्गनने इंग्लंडमधल्या डलविच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्येच मॉर्गनने फलंदाजीची कौशल्यं आणखी घोटीव केली.

इंग्लंडमधल्या कॉलेजात शिकत आणि खेळत असतानाच मॉर्गनने आयर्लंडसाठी पदार्पण केलं. 16व्या वर्षी मॉर्गनने स्कॉटलंडविरुद्ध आयर्लंडसाठी पदार्पण केलं. पदार्पणाच्या मॅचमध्ये शंभरी गाठण्याचा मॉर्गनचा पराक्रम अवघ्या एका धावेने हुकला. 99वर आऊट झाल्याने हताश झालेल्या मॉर्गनचा फोटो आजही दर्दी चाहत्यांच्या लक्षात आहे.

इऑन मॉर्गन, इंग्लंड, आयर्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन सुरुवातीला आयर्लंडसाठी खेळायचा

सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत इंग्लंडमधील काऊंटी संघ मिडलसेक्सने मॉर्गनला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. मिडलसेक्सच्या संघात स्वत:ला सिद्ध करत असताना मॉर्गन 2007चा वर्ल्ड कप आयर्लंडसाठी खेळला. वर्ल्ड कप पदार्पण लौकिकाला साजेसं झालं नाही.

वर्ल्ड कप ते IPL ते वर्ल्ड कप

त्या वर्ल्ड कपच्या 9 मॅचेसमध्ये मॉर्गनला फक्त 91 धावा करता आल्या. फर्स्ट क्लास क्रिकेट इंग्लंडमधील मिडलसेक्स संघासाठी आणि राष्ट्रीय संघ आयर्लंड अशी मॉर्गनची दुहेरी कसरत सुरू होती. मॉर्गनच्या दिमाखदार प्रदर्शनाच्या बळावर आयर्लंडने 2011 वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.

बेटर प्रॉस्पेक्ट्सचा विचार करता मॉर्गन इंग्लंडसाठी खेळणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. 2011 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडला स्थान मिळवून दिल्यानंतर मॉर्गनने करिअरमधला सगळ्यात कठोर निर्णय घेतला. जिथे त्याचं बालपण गेलं, जिथे त्याने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली त्या आयर्लंडला सोडून मॉर्गनने इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

मायदेशाशी असलेली नाळ तोडून सख्ख्या शेजारी देशाकडून खेळण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या अवघड होता. मात्र व्यावहारिकतेचा मुद्दा लक्षात घेतला तर मॉर्गनने केलेलं स्थलांतर रास्त होतं.

इऑन मॉर्गन IPLमध्ये कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन IPLमध्ये कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळला

आयर्लंडमध्ये क्रिकेट शिकून इंग्लंडचा फायदा करून देणार म्हणून मॉर्गनवर टीकाही झाली. मात्र कुलपणासाठी प्रसिद्ध मॉर्गनने वाचाळपणा केला नाही. आयर्लंडप्रती मी कृतज्ञ असं सांगता सांगता मॉर्गन इंग्लंडचा झाला होता. 2011 वर्ल्ड कपमध्ये मॉर्गन इंग्लंडच्या जर्सीत दिसला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

हे स्थलांतर मॉर्गनच्या पथ्यावर पडलं. 2009 मध्ये 23व्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 34 चेंडूत 67 आणि ट्वेन्टी-20 स्पर्धेत 45 चेंडूत 85 धावांच्या खेळीने मॉर्गनने छाप उमटवली. पुढच्याच वर्षी IPL स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला संघात घेतलं. ही भागीदारी फार काळ चालली नाही. काही वर्षांनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मॉर्गनचं नैपुण्य हेरलं. त्यानंतर मॉर्गन कोलकाता संघाच्या कोअर टीमचा भाग झाला. क्रूर आणि तोडफोड न वाटता चौकार-षटकारांची आतषबाजी हे मॉर्गनचं वैशिष्ट्य आयपीएलमध्येही पाहायला मिळालं.

इंग्लंडसाठी वनडेतला आधारस्तंभ झालेल्या मॉर्गनने कसोटी पदार्पणही केलं. मात्र कसोटीसाठी आवश्यक असलेला संयम आणि तंत्रकौशल्य नसल्याने मॉर्गन त्या संघात स्थिरावून शकला नाही. मात्र वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये मॉर्गन इंग्लंड संघाचा कणा झाला. दडपणाच्या क्षणी शांत राहून योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे अँड्र्यू स्ट्रॉसनंतर इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा मॉर्गनकडे आली.

इऑन मॉर्गन, इंग्लंड, आयर्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन इंग्लंडसाठी टेस्ट मॅचेसही खेळला.

मधल्या फळीत बॅटिंग आणि कॅप्टन्सी अशा दोन्ही आघाड्या मॉर्गन सांभाळू लागला. कामगिरीत सातत्य असल्याने त्याला वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मॉर्गनचं इंग्लंड करिअर बहरत असताना दुसरीकडे मॉर्गनविना खेळणाऱ्या आयर्लंडनेही सकारात्मक वाटचाल करत वनडे खेळण्याचा मान मिळवला.

मॉर्गन आयर्लंडसाठी खेळत राहिला असता तर संघाची वाटचाल सुकर झाली असती अशा चर्चा रंगतात. मॉर्गनने आयर्लंडला दगा दिला असंही सुनावलं जातं. मात्र आयुष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागतं. मॉर्गनने इंग्लंडचा खेळाडू होण्याचा निर्णय घेतला. चांगल्या कामगिरीसह हा निर्णय सार्थ ठरवला आणि कधीही टीकाकारांना उलटं उत्तर दिलं नाही.

चार वर्षांपूर्वी मॉर्गनच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडवर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. इंग्लंड क्रिकेट बोर्डावर आणि संघावर तेव्हा कडाडून टीका झाली. कोच पीटर मूर्स यांना हटवण्यात आलं.

मात्र निवडसमितीने मॉर्गनवर विश्वास ठेवला. त्या मानहानीकारक प्रसंगातच चांगल्या भविष्याचं बीज दडलं होतं. मॉर्गनने त्याचा दृष्टिकोन मानणाऱ्या आणि दिलखुलासपणे खेळणाऱ्या खेळाडूंची मोट बांधली. या प्रक्रियेत वेळ गेला परंतु मॉर्गनने त्याला हवा तसा संघ उभारला. चार वर्षात मॉर्गनच्या इंग्लंड संघाने रन्स आणि विकेट्स अशा दोन्ही आघाड्या गाजवल्या.

इऑन मॉर्गन, इंग्लंड, आयर्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इऑन मॉर्गन संघातील सहकाऱ्यांसमवेत

जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडला एकदाही विश्वविजेतेपद पटकावता आलेलं नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पहिलंवहिलं जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी एका बाहेरच्या खेळाडूवर, म्हणजेच मूळच्या आयर्लंडच्या इऑनवर आहे.

इंग्लंड क्रिकेटला नवा आयाम मिळवून देणाऱ्या इऑनची अफगाणिस्तानविरुद्धची खेळी हा शिरपेचातला आणखी एका मानाचा तुरा. मंगळवारी त्याने एका वनडे इनिंग्जमध्ये सर्वाधिक सिक्सेसचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर हा विक्रम होता. फेब्रुवारी 2015 मध्ये गेलने झिम्बाब्वेविरुद्ध 16 सिक्सेस लगावले होते.

इऑन मॉर्गन

फोटो स्रोत, Getty Images

वर्ल्ड कप ट्रॉफीसह आयर्लंड ते इंग्लंड हे स्थलांतर मॉर्गनने यशस्वी करीन दाखवलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)