जोफ्रा आर्चर : बार्बाडोसमध्ये जन्म ते थेट इंग्लंडच्या क्रिकेट संघात स्थान

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर सरावादरम्यान
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भन्नाट वेग आणि अचूकता यासाठी ओळखला जाणारा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं आहे.

आगामी एका सिझनसाठी उपलब्ध नसल्याचं आर्चरने यापूर्वीच जाहीर केलं होतं. पण तरीही मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर मोठी बोली लावून त्याला आपल्याकडे ओढून घेतलं. हा गोलंदाज विरोधी संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

हरणासारखे काटक पाय, जाड नाही आणि बारीकही नाही, अशी परफेक्ट निमुळती होत जाणारी शरीरयष्टी, बारीक कोरलेल्या केसांची अनोखी स्टाईल, कानात डूल, हाताला अॅपल वॉच, गळ्यात लखलखणाऱ्या सोन्याची चेन - ही सगळी गुणवैशिष्ट्यं आहेत जोफ्रा आर्चरची.

जोफ्रा मूळचा बार्बाडोसचा म्हणजेच कॅरेबियन बेटांवरचा. पण आता तो इंग्लंडचं ट्रंप कार्ड आहे. त्याची ही वाटचाल जगभरातल्या स्थलांतरितांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी अशी.

कॅरेबियन बेटांवरच्या बार्बाडोस या नयनरम्य बेटरूपी देशात जोफ्राचा जन्म झाला. समुद्राची गाज ऐकत त्याचं बालपण गेलं. क्रिकेट, बास्केटबॉल आणि एकूणतच खेळणं त्याच्या रक्तात होतं.

वेस्ट इंडीज हे फास्ट बॉलिंगचं माहेरघर. आयुष्य सुशेगात असलं तरी मैदानावरचा आवेग भल्याभल्या बॅट्समनना घाम फुटायला लावणारा. भन्नाट वेग हे जोफ्राचंही अस्त्र. वेगावर आरूढ होणारे अनेक बॉलर्स अचूकतेपासून दूर असतात. जोफ्राचं वेगळेपण यात आहे.

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर इंग्लंड काऊंटी स्पर्धेत ससेक्स संघासाठी खेळतो

प्रचंड वेगात स्टंप्सच्या बुंध्यात यॉर्कर टाकण्याची त्याची कला खास अशी आहे. ऑफस्टंप कॉरिडॉर हा क्रिकेटमधला संवेदनशील प्रदेश. ऑफस्टंप्सवर सातत्याने मारा करत बॅट्समनना सतावणं, ही जोफ्राची खासियत.

त्याचा रनअपही पाहण्यासारखा. एका विशिष्ट लयीत पडणारी त्याची पावलं आणि हातून बंदुकीच्या गोळीसारखा सुटणारा चेंडू पाहणं कधीही आनंददायी.

बॉलिंगच्या बरोबरीने जोफ्रा उपयुक्त बॅटिंग करतो. सिक्स पॅक वगैरे नसले तरी पल्लेदार षटकार खेचण्यात तो माहीर आहे.

त्याची फील्डिंगही चपळ. धावा अडवतो, रनआऊटही करतो. या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसह जोफ्रा बार्बाडोस आणि पर्यायाने वेस्ट इंडिजमधल्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत होता.

...आणि तो इंग्लंड संघात गेला

जोफ्रा वेस्ट इंडिजसाठी U19 वर्ल्डकपही खेळला. मात्र वेस्ट इंडिजसाठी खेळण्याचं स्वप्न इतक्यात पूर्ण होणार नाही, हे जोफ्राला जाणवलं. त्याच काळात मूळचा कॅरेबियन परंतु इंग्लंडसाठी खेळणाऱ्या ख्रिस जॉर्डनशी जोफ्राची भेट झाली. "ती इंग्लंडमध्ये खेळायला का येत नाहीस?" अशी जॉर्डनने विचारणा केली.

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेदरम्यान चाहत्यांबरोबर जोफ्रा आर्चर

जोफ्राचे वडील इंग्लंडचे आणि आई बार्बाडोसची. पालकांपैकी एक ब्रिटिश असल्याने जोफ्राकडे इंग्लंडचा पासपोर्ट होता. 2014 मध्ये सगळं चंबुगबाळं घेऊन पोरगेला जोफ्रा इंग्लंडमध्ये दाखल झाला.

डोळ्यात स्वप्नं होती पण पैसे जेमतेमच होते. सुरुवातीची वर्षं खडतर गेली. इंग्लंडमधील काऊंटी संघ ससेक्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यांच्या कनिष्ठ संघासाठी तो खेळू लागला. एका घरात पंधराजण अशा सेटअपमध्ये जोफ्रा राहायचा. तो जेवणही बनवायचा.

हळूहळू त्याचं कौशल्य प्रशिक्षकांनी हेरलं. ससेक्स संघाचा तो भाग झाला आणि जगण्याच्या अडचणी कमी झाल्या.

बॉलिंग हे प्रमुख काम, गरज पडेल तेव्हा बॅटिंग आणि दमदार फिल्डिंग या बळावर जोफ्रा ससेक्स संघाचा अविभाज्य भाग झाला. त्याच्या यॉर्करची चर्चा होऊ लागली. त्याचे विकेट्सच्या आकड्यांची इंग्लंड काऊंटीमध्ये चर्चा होऊ लागली. या कामगिरीची परिणाम म्हणजे जोफ्रा ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत खेळला. त्याचा खेळ आणि स्टाईल आता हळूहूळ जगभरात पोहोचलं होतं.

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर

जोफ्रा इंग्लंडमध्ये स्थिरावत असतानाच 2015 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या संघाला नव्या ऊर्जेची, नव्या चेहऱ्यांची आवश्यकता होती. मात्र त्यानंतरच्या दोन वर्षांमध्येही त्यांचं धडपडणं सुरू राहिलं.

2017 पासून इंग्लडने गती पकडली. बटलर, बेअरस्टो, रॉय, हेल्स, स्टोक्स हे बॅट्समन त्यांचं काम जोमाने करू लागले. मॉर्गनने नेतृत्वावरची पकड घट्ट केली. मोईन अली आणि आदिल रशीद हे फिरकीची धुरा सांभाळू लागले. इंग्लंडकडे फास्ट बॉलर नक्कीच होते. परंतु प्रतिस्पर्ध्यांनी घाबरावं असा बॉलर आपल्याकडे नाही याची जाणीव इंग्लंडच्या निवडसमितीला झाली. त्यावेळी जोफ्रा आर्चरचं नाव रडारवर आलं.

मात्र एक नियम जोफ्राच्या निवडीत आड येत होता. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी पात्रतेचा एक नियम होता - की खेळाडूने सात वर्षं इंग्लंडमध्ये वास्तव्य असायला हवं. जोफ्रा अर्थातच ही अट पूर्ण करत नव्हता. त्यामुळे इंग्लंडच्या वर्ल्डकपसाठीच्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये नसेल, हे दिसत होतं.

परंतु पहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील निवडसमितीने जोफ्राचा विचार करून नियमच बदलला. इंग्लंडच्या संघात येण्यासाठी सात वर्षं वास्तव्याची अट कमी करून तीन वर्षं करण्यात आली. हा नियम बदल होताच निवडसमिती जोफ्राचा गांभीर्याने विचार करते आहे हे स्पष्ट झालं. मात्र वर्ल्डकपवारी एवढी सोपी नाही.

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

जोफ्रा IPLसाठी यंदा भारतात आला. राजस्थान रॉयल्ससाठी खेळू लागला. त्याच काळात वर्ल्डकपसाठीचे संघ जाहीर होत होते. जोफ्रा इंग्लंडसाठी वर्ल्डकप खेळणार का याविषयी अमाप उत्सुकता होती.

यजमान इंग्लंडने जगाला क्रिकेट शिकवलं परंतु त्यांच्या पदरात वर्ल्डकपचं एकही जेतेपद नाही. पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी आतूर इंग्लंडने संघ वर्ल्डकपसाठी प्रोव्हिजनल संघ जाहीर केला. त्यात जोफ्राचं नाव नव्हतं. ज्याच्यासाठी सगळा अट्टाहास सुरू होता ते स्वप्न विखरून जाणार अशी चिन्हं होती. परंतु निवडसमितीने हुशारीने एक डाव खेळला. वर्ल्डकपआधी इंग्लंडच्या आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध मॅचेस होत्या. या सीरिजसाठी जोफ्राची निवड करण्यात आली.

जोफ्रा आर्चर, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चरला रॉबर्ट की यांनी इंग्लंडची कॅप दिली तो क्षण.

जोफ्रा या मॅचेस खेळला. त्याची कामगिरी ग्रेट नव्हती पण चांगली होती. पण तरीही वर्ल्डकपच्या अंतिम संघात त्याची निवड होईल याची खात्री नव्हती.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. अखेर इंग्लंडच्या निवडसमितीने वर्ल्डकपचा संघ जाहीर केला. फास्ट बॉलर डेव्हिड विलीच्या जागी जोफ्राची निवड करण्यात आली. विली गेली तीन ते चार वर्षं चांगली कामगिरी करत होता.

डावखुरा विली अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी अडचणीचा ठरतो. परंतु निवडसमितीने विलीऐवजी जोफ्राला पसंती दिली. विली नाराज होणं साहजिक होतं. दुसरीकडे टीममधल्या कोणाचीही मी जागा बळकावणार नाही, असं जोफ्रा आधी म्हणत होता.

आता त्याची निवड झाली होती आणि त्याने विलीची जागा बळकावली. विलीला वगळल्याप्रकरणी आणि जोफ्राला घेतल्याप्रकरणी उलटसुलट चर्चा रंगल्या. इंग्लंडला त्यांच्या देशात असा बॉलर घडवता आला नाही अशी टीकाही झाली. परंतु निवडसमितीचा निर्णय झाला होता. जोफ्रा आर्चर, इंग्लंड हे समीकरण पक्कं झालं होतं.

कॅरेबियन देश अन्य खेळांमध्ये प्रत्येक बेट स्वतंत्र देश म्हणून खेळतात, परंतु क्रिकेटमध्ये या सगळ्या बेटांची मिळून वेस्ट इंडीज अशी टीम होते. २४ वर्षांचा जोफ्रा या वेस्ट इंडिज संघात असू शकला असता परंतु नियतीच्या मनात वेगळं होतं.

राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज वर्ल्डकपमध्ये एकमेकांसमोर असतील. आपल्या जन्मदात्या देशाविरुद्ध खेळण्याचं भावनिक आव्हान जोफ्रासमोर असेल. त्याचवेळी संघातल्या प्रस्थापिताच्या जागेवर खेळण्यास मी समर्थ आहे हे सिद्ध करण्याचं व्यावसायिक आव्हान जोफ्रासमोर आहे.

इंग्लंडने अंतिम लढतीत न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. जोफ्रा आर्चरने 11 मॅचेसमध्ये 20 विकेट्स घेत इंग्लंडच्या जेतेपदापर्यंतच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावली.

वर्ल्ड कपनंतर आर्चर दुखापतग्रस्त होता. मात्र अॅशेस मालिकेपर्यंत तो फिट झाला. अॅशेसच्या पहिल्या कसोटीत आर्चरला संधी मिळाली नाही. मात्र इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतग्रस्त झाल्याने लॉर्ड्स कसोटीत आर्चरला पदार्पणाची संधी देण्यात आली.

मित्र ख्रिस जॉर्डनच्या हस्ते आर्चरला इंग्लंड कॅप देण्यात आली.

स्थलांतरामुळे माणसं आपली माती, आपलं राज्य, देश सोडतात. पोटाची खळगी भरणं आणि सुरक्षित आयुष्य यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. या धडपडीतूनच जोफ्राने पाच वर्षांपूर्वी इंग्लंड गाठलं. पाच वर्षात हा मुलगा इंग्लंड क्रिकेट टीमचं ट्रंप कार्ड झाला आहे. कोणाचं नशीब कुठे फळफळेल हे सांगता येत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)