वर्ल्ड कप 2019: DRS, नो बॉलसह हे 7 नियम प्रथमच लागू होणार

फोटो स्रोत, Getty Images
बॅट आणि बॉलमधील सर्वोत्तम द्वंद्वाचं व्यासपीठ अर्थात क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बाराव्या वर्ल्डकपमध्ये धावांचे नवनवे विक्रम रचले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ट्वेन्टी-20च्या आक्रमणामुळे वनडे फॉरमॅटमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. 500 धावांची नोंद करता येईल, यासाठी स्कोअरकार्ड्समध्ये बदल करण्यात आले आहेत.
आर्थिक गणितं आणि TRPचे आकडे लक्षात घेऊन ICCने वर्ल्डकपमधील संघांची संख्या दहापुरती मर्यादित केली आहे. वर्ल्डकप सर्वसमावेशक आणि आकर्षक करण्यासाठी ICCने सात नवीन नियम अंगीकारले आहेत. त्यांची अंमलबजावणी यंदा प्रथमच वर्ल्डकपमध्ये होणार आहे.
1. बॅड बॉईजची हकालपट्टी होणार
खेळाडूंना ICCच्या कोड ऑफ कंडक्टचे पालन करणं अनिवार्य आहे. मात्र तरीही खेळाडूंकडून नियमांचा भंग केल्याची उदाहरणं घडतात.
मात्र आता चुकीचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, हा संदेश खेळाडूंच्या मनात ठसवण्यासाठी ICCने मैदानावरच्या बॅड बॉईजना शिक्षा देण्याचं ठरवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चुकीचं वर्तन केल्यास खेळाडूला संपूर्ण सामन्यासाठी निलंबित करण्यात येईल. ICC कोड ऑफ कंडक्टमधील लेव्हल 4, 1.3 अंतर्गत अंपायर्सना खेळाडूंना निलंबित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तीन अंपायर मिळून यासंदर्भात निर्णय घेतील. हा निर्णय 2017मध्येच लागू करण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणी होणारा हा पहिलाच वर्ल्डकप आहे.
2. रनआऊटचा बदलला नियम
झपाट्याने वाढणारा रनरेट अनेकदा बॅट्समनना चोरटी धाव घ्यावी लागते. याच प्रयत्नात दोन बॅट्समनच्या दरम्यानच्या संवादात गडबड होते आणि रनआऊट होतो. पूर्वीच्या नियमानुसार, बॅट्समनची बॅट क्रीझवर असेल तर नॉटआऊट दिलं जायचं. मात्र आता नियम बदलण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आता बॅट क्रीझवर असेल आणि क्रीझच्या आत बॅटचा कोणताही भाग नसेल तर बॅट्समनला आऊट देण्यात येईल.
3. नोबॉलची गणती स्वतंत्रपणे
एखाद्या नोबॉलवर जर बाय/लेगबायच्या माध्यमातून रन काढण्यात आले तर आधी ते रन नोबॉलमध्ये गणले जायचे. मात्र आता असं होणार नाही. आता नोबॉल आणि बाय/लेगबायच्या धावांची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात येईल. म्हणजे नोबॉलचा एक रन आणि त्यावर काढण्यात आलेले बायचे रन वेगळे.

फोटो स्रोत, Getty Images
4. दोन टप्पे पडले तर...
गोलंदाजाने बॉलिंग टाकताना चेंडूचे दोन टप्पे पडले तर तो नोबॉल समजण्यात येईल. सोप्या शब्दांत सांगायचं तर गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाजांपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडूचे दोन टप्पे पडले तर पूर्वी डेडबॉल घोषित करण्यात यायचं. मात्र आता दोन टप्प्यांचा चेंडू नोबॉल देण्यात येईल आणि पुढच्या चेंडूवर फ्रीहिट देण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
5. रिव्ह्यू फुकट जाणार नाही
सामना सुरू असताना बॅट्समन किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मैदानावरील अंपायरच्या निर्णयाविरोधात अपील केलं, थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला तर बॅट्समनचा तसंच फिल्डिंग टीमचं रिव्ह्यू वाया जायचा.
मात्र आता तसं होणार नाही. अंपायर्सचा कॉल असेल तर रिव्ह्यू कायम राहील.
6. बॅटच्या आकारावर मर्यादा
पल्लेदार षटकार लगावण्यात मोठ्या आकाराच्या बॅट्सची भूमिका निर्णायक आहे. छोट्या आकाराची मैदानं, प्रचंड आकाराच्या बॅट तसंच फलंदाजधार्जिणे नियम यामुळे गोलंदाज बॉलिंग मशीन झाले आहेत, अशी टीका सातत्याने करण्यात येते.

फोटो स्रोत, Getty Images
बॅट आणि बॉल यांच्यातला मुकाबला समान व्हावा, यासाठी बॅटच्या आकारावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
आता बॅटची लांबी 108 मिलीमीटर, बॅटची कड 40 मिलीमीटर आणि जाडी 67 मिलीमीटरपेक्षा अधिक असू शकत नाही. सामन्यादरम्यान बॅटच्या लांबी-रुंदीविषयी शंका वाटल्यास अंपायर बॅटची तपासणी करू शकतात, त्यासाठी त्यांना विशेष मापनयंत्र देण्यात येणार आहे.
7. हेल्मेट आऊट

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या बॅट्समनने मारलेला फटका क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या हेल्मेटला लागून कॅच उडाला आणि क्षेत्ररक्षकाने तो टिपला तर आऊट देण्यात येईल.
मात्र 'हँडल द बॉल' स्थितीत आऊट दिलं जाणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








