World Cup 2019: टीम इंडियातून चार वर्षात क्रिकेट वर्ल्डकप संघाबाहेर झालेल्या आठ खेळाडूंची कहाणी

रहाणे, अक्षर, उमेश आणि अश्विन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोमवारी वर्ल्डकप स्पर्धेसाठी BCCIच्या निवडसमितीने पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला.

असा आहे जाहीर झालेला संघ -

  • विराट कोहली
  • महेंद्रसिंह धोनी
  • शिखर धवन
  • रोहित शर्मा
  • लोकेश राहुल
  • दिनेश कार्तिक
  • विजय शंकर
  • हार्दिक पंड्या
  • युझवेंद्र चहल
  • कुलदीप यादव
  • जसप्रीत बुमराह
  • मोहम्मद शमी
  • भुवनेश्वर कुमार
  • केदार जाधव
  • रवींद्र जडेजा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. 15 सदस्यीय संघाच्या बरोबरीने तीन नेट बॉलर भारतीय संघाबरोबर असतील. या संघाची बलस्थानं काय आणि हा संघ एकत्र बलाढ्य ठरू शकतो का, याचं सविस्तर विश्लेषण तुम्ही इथे वाचू शकता.

पण चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात असलेल्या आणि आज पॅकअप झालेल्या खेळाडूंची ही कहाणी -

1. अंबाती रायुडू

संघरचनेत चौथ्या क्रमांकासाठी विचार झालेला अंबाती रायुडू हा वर्ल्डकप संघातून बाहेर झालेलं धक्कादायक नाव आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी रायुडूचा चौथ्या स्थानासाठी विचार करून त्याला संधी दिला होती.

अंबाती रायुडू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अंबाती रायुडू

रायुडूने चांगली कामगिरी केली होती. मात्र गेल्या वर्षी आशिया चषकानंतर रायुडूच्या कामगिरीत घसरण झाली आणि त्याचा त्याला फटका बसला.

चौथ्या महत्त्वपूर्ण स्थानासाठी रायुडूचं नाव चर्चेत होतं. IPL स्पर्धेत चेन्नईसाठी खेळतानाही रायुडूला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा अनुभव गाठीशी असतानाही रायुडूचं नाव अंतिम यादीत आलं नाही.

2. सुरेश रैना

चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या प्राथमिक फेरीच्या लढतीत 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 4 बाद 92 अशी झाली होती. मात्र रैनाने महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीने पाचव्या विकेटसाठी 196 धावांची भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याने नाबाद 110 धावांची खेळी केली.

वर्ल्डकपमध्ये रैनाने 56.80च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. गंमत म्हणजे यशस्वी वर्ल्डकपनंतर रैनाने चार वर्षांत केवळ 11 वनडे खेळल्या.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरेश रैना

एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालतानाच चौकार-षटकारांची खैरात करणारा रैना मधल्या फळीत उपयुक्त होता. मात्र नव्या खेळाडूंच्या आगमनासह रैना निवडसमिचीच्या स्कीम ऑफ थिंग्समधून बाहेर फेकला गेला.

स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश, IPL स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ससाठी रैना खेळत आहे. मात्र यंदाच्या वर्ल्डकपसाठीच्या योजनेत त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाही.

3. अजिंक्य रहाणे

टीम इंडियाचा मधल्या फळीतील आधारस्तंभ, अशी ओळख मुंबईकर अजिंक्य रहाणेने निर्माण केली. चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये रहाणे आठही सामने खेळला होता आणि 34च्या सरासरीने 208 धावा केल्या होत्या.

तेव्हापासून चार वर्षांमध्ये रहाणेने 36 मॅचेसमध्ये 41.75च्या सरासरीने 1,378 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजिंक्य रहाणे

स्ट्राईकरेट ही रहाणेसाठी चिंतेची बाब ठरली. अर्धशतकांचं शतकात रूपांतर करण्यात आलेलं अपयश रहाणेचं नाव निवडसमितीच्या चर्चेतून बाहेर होण्याचं कारण ठरलं. IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या रहाणेने शेवटची वनडे वर्षभरापूर्वी खेळली आहे. यावरूनच खप्पा मर्जी लक्षात यावी.

4. रविचंद्रन अश्विन

भारतीय उपखंडात कसोटीमध्ये भल्याभल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या अश्विनची वनडे संघातून हकालपट्टी झाली आहे. टेस्ट संघात प्रमुख फिरकीपटू असलेल्या अश्विनला वनडेत धावा रोखण्यात अपयश येतं.

ऑफिस्पिनर अश्विनच्या गोलंदाजीचा प्रतिस्पर्धी फलंदाजांनी केला. त्यातूनच अश्विनचे कच्चे दुवे स्पष्ट झाले.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवीचंद्रन अश्विन

अश्विनच्या कामगिरीत घसरण होत असताना लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि 'चायनामन' कुलदीप यादव यांनी दमदार प्रदर्शनासह निवडसमितीला प्रभावित केलं. अश्विनने शेवटची वनडे दोन वर्षांपूर्वी खेळली आहे.

5. स्टुअर्ट बिन्नी

बॉलिंग करू शकणारा बॅट्समन किंवा बॅटिंग करू शकणारा बॉलर अशा व्याख्येत स्टुअर्ट बिन्नी चोख बसतो. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय बॉलर्सचं सर्वोत्तम वैयक्तिक प्रदर्शन स्टुअर्टच्या नावावर आहे. 2015 वर्ल्डकपवेळी निवडसमितीने युवराज सिंगसारख्या अनुभवी खेळाडूऐवजी स्टुअर्ट बिन्नीला पसंती देण्यात आली तेव्हा प्रचंड टीका झाली होती.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टुअर्ट बिन्नी

योगायोग म्हणजे स्टुअर्ट संपूर्ण विश्वचषकात एकही मॅच खेळला नाही. वर्ल्डकपनंतर स्टुअर्ट फक्त पाच वनडे खेळला. बॅट्समन किंवा बॉलर म्हणून स्टुअर्टला टेस्ट तसंच वनडे संघात स्वत:ला प्रस्थापित करता आलं नाही.

स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी खेळणारा स्टुअर्ट IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. मात्र यंदाच्या वर्ल्कपसाठी स्टुअर्टचं नाव निवडसमितीच्या योजनेत नाही.

6. अक्षर पटेल

डावखुरा फिरकीपटू, उपयुक्त फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक ही अक्षर पटेलची ओळख. मात्र अक्षर वर्ल्डकपमध्ये एकही मॅच खेळला नाही. कामगिरीत चढउतार झाल्याने अक्षर सातत्याने भारतीय संघात आतबाहेर झाला आहे.

अक्षर भारत अ संघाकडून नियमित खेळतो.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अक्षर पटेल

अक्षरने शेवटची वनडे दोन वर्षांपूर्वी खेळली आहे. IPL मध्ये अक्षरने मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

7. मोहित शर्मा

स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीच्या बळावर भारतासाठी निवड झालेला मोहित शर्मा आता निवडसमितीच्या चर्चेत नाही. चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये मोहितने 8 मॅचेसमध्ये 13 विकेट्स मिळवल्या होत्या.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहित शर्मा

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमधील सर्वसाधारण कामगिरीचा फटका मोहितला बसला. मोहितने वर्ल्डकपनंतर फक्त 6 वनडे खेळल्या.

IPL मध्ये मोहित चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळतो. मात्र टीम इंडियासाठी खेळणं मोहितसाठी दिवास्वप्न आहे.

8. उमेश यादव

विदर्भाचा हा रांगडा वीर चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी होता. मात्र चार वर्षात उमेशला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.

टीम इंडिया, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उमेश यादव

त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी सातत्याने धावा कुटल्या. कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असणारा उमेश वनडे संघातही सातत्याने आतबाहेर होत राहिला. मात्र गेल्या वर्षभरात त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी वाटलेली धावांच्या खिरापतीचा त्याला फटका बसला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)