World Cup 2019: विराट कोहलीच्या टीम इंडियामध्ये KL राहुल, विजय शंकर, दिनेश कार्तिक; रायुडू, ऋषभ पंत बाहेर

फोटो स्रोत, Getty Images
लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा या चार जणांना 2019 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार अंबाती रायुडूला डच्चू देण्यात आला आहे. युवा ऋषभ पंतचाही विचार झालेला नाही.
सोमवारी वर्ल्डकप स्पर्धेसाठी BCCIच्या निवडसमितीने पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला. निवडसमितीचे प्रमुख MSK प्रसाद यांनी मुंबईत संघाची घोषणा केली. प्रसाद यांच्या समितीत शरणदीप सिंग, देबांग गांधी, जतीन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे.
याबाबत मुंबईतून अधिक माहिती बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी दिली. बहुचर्चित चौथ्या स्थानी विजय शंकर खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना MSK प्रसाद म्हणाले की तो एक बॅट्समन आहे, जो गोलंदाजीसुद्धा करू शकतो, म्हणून तो कामाचा गडी ठरेल.
लोकेश राहुल राखीव ओपनर म्हणून संघात असेल.

असा आहे जाहीर झालेला संघ -
- विराट कोहली
- महेंद्रसिंह धोनी
- शिखर धवन
- रोहित शर्मा
- लोकेश राहुल
- दिनेश कार्तिक
- विजय शंकर
- हार्दिक पंड्या
- युझवेंद्र चहल
- कुलदीप यादव
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद शमी
- भुवनेश्वर कुमार
- केदार जाधव
- रवींद्र जडेजा
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. 15 सदस्यीय संघाच्या बरोबरीने तीन नेट बॉलर भारतीय संघाबरोबर असतील.
वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ 25 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध ओव्हल तर 28 मे रोजी बांगलादेशविरुद्ध कार्डिफ येथे सराव सामना खेळणार आहे.
1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2011चं विश्वविजेतेपद पटकावलं होतं.
चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.
संघाची रचना कशी
रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने सातत्यपूर्ण प्रदर्शनासह संघातलं स्थान पक्कं केलं आहे. रनमशीन आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर जगभरात सगळीकडे धावांचा रतीब घालतो आहे. त्यामुळे सलामी आणि वनडाऊन या जागांसाठीचे उमेदवार पक्के आहेत.
चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरला पसंती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त लोकेश राहुलला संघात निवडण्यात आलं आहे. राखीव ओपनरसह मधल्या फळीत खेळू शकणारा राहुल विकेटकीपिंगही करू शकतो.
पाहा बीबीसीचे ऋजुता लुकतुके आणि पराग फाटक यांचं विश्लेषण -
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
पाचव्या आणि सहाव्या स्थानी केदार जाधव आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनी खेळण्याची शक्यता आहे. फिनिशर म्हणून धोनीचं महात्म्य सर्वश्रुत आहे. केदार जाधवने गेल्या दोन वर्षात सातत्याने सामने जिंकून देण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
चौथ्या स्थानी कोण खेळणार यावरून माजी खेळाडू तसंच क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंमध्ये या स्थानासाठी चुरस होती. युवा विकेटकीपर ऋषभ पंतचं नावही या जागेसाठी चर्चेत होतं. पारंपरिक शैलीला छेद देत फटकेबाजी करत ऋषभने अनेकांना प्रभावित केलं होतं. उंचपुरा विजय शंकरने बॅटिंगसह बॉलिंगमध्ये चमक दाखवत आपली दावेदारी सिद्ध केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अष्टपैलू स्थानासाठी हार्दिक पंड्याची निवड औपचारिकता होती. गेल्या वर्षी पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिकला सतावले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत हार्दिकने चांगल्या कामगिरीसह आपला फिटनेसही सिद्ध केला.
युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव जोडीने आपल्या आकडेवारीने निवडसमितीला दखल घ्यायला भाग पाडले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाजीचं त्रिकुट भारताचा कणा आहे.
तसं पाहिलं तर सध्या संघाचं चित्र बहुतांशी स्पष्ट आहे. पण अंतिम 15च्या संघात स्थान मिळवण्यासाठी दिनेश कार्तिक, लोकेश राहुल, विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यात चुरस आहे. ऋषभ पंत 21व्या वर्षी वर्ल्डकप संघात स्थान पटकावतो का, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
पण कोण कोण आहेत या संघात, यावर एकदा नजर टाकूया.
1. महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनीचा हा चौथा वर्ल्डकप असणार आहे. 2007 मध्ये धोनीची भूमिका विकेटकीपर बॅट्समनपुरतीच मर्यादित होती.
2011 मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखालीच भारतीय संघाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार झालं होतं. वर्ल्डकप फायनलमध्ये नाबाद 91 धावांची खेळी करून संघाला विजयापर्यंत पोहोचवलं होतं. त्याचा तो विजयी षटकार आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे.
2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

फोटो स्रोत, Getty Images
वाढतं वय आणि फॉर्ममध्ये चढउतार यामुळे धोनी 2019 वर्ल्डकप खेळणार का, याविषयी साशंकता होती. मात्र गेल्या दीड वर्षात धोनीने दमदार प्रदर्शनासह वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं सिद्ध केलं.
धोनीकडे आता कर्णधारपद नाही परंतु त्याचा अनुभव आणि फिनिशर म्हणून भूमिका निर्णायक ठरू शकते.
2. विराट कोहली
कर्णधार म्हणून विराट कोहलीसाठी ही पहिलीच वर्ल्डकप मोहीम आहे. 'रनमशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटची गेल्या तीन वर्षातली कामगिरी अचंबित करणारी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
धावांचा पाठलाग करताना विराटचं प्रदर्शन त्याला सर्वोत्तम वनडे बॅट्सनच्या पंक्तीत नेऊन ठेवतं.
पण यंदाच्या IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्सं बेंगळुरू संघाला पहिल्या 6 सामन्यांमध्ये एकदाही विजय न मिळवता आल्याने त्याच्या नेतृत्वक्षमतेवर टीका झाली.
मात्र टीम इंडियासाठी त्याची कर्णधार म्हणून कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखालील 68 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 49 जिंकले आहेत, म्हणजे अंदाजे 73 टक्के.
3. शिखर धवन
धवन हा टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर आहे. अनोख्या शैलीत गोलंदाजांना बुकलून काढणाऱ्या धवनला सूर गवसणं प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतं.
धवनचं वैशिष्ट्य म्हणजे ICC स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी अन्य मालिकांपेक्षा दमदार होते. या व्यतिरिक्त इंग्लंडमध्ये धवनला खेळायला आवडतं. चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्येही धवनने सलामीच्या भूमिकेला न्याय दिला होता. रोहित शर्माच्या बरोबरीने धवनची निवड पक्की मानली जात आहे.
4. रोहित शर्मा
वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असणारा 'हिटमन' रोहित शर्मा टीम इंडियाचं ट्रंप कार्ड ठरू शकतो. आक्रमकता आणि नजाकत यांचा सुरेख मिलाफ रोहितच्या खेळात पाहायला मिळतो.

फोटो स्रोत, Getty Images
उपकर्णधार, ओपनर, चपळ क्षेत्ररक्षक अशा विविध आघाड्यांवर रोहित संघासाठी उपयुक्त ठरतो. रोहित आणि शिखर जोडीने टीम इंडियासाठी भक्कम आणि स्थिर सलामीची जोडी म्हणून प्रस्थापित केलं आहे.
5. केदार जाधव
टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा केदार जाधव टीम इंडियात येण्याचा प्रमुख हकदार आहे. पारंपरिक पुस्तकी शैलीला छेद देत अनोख्या शैलीसह बॅटिंग करणारा केदार मधल्या फळीत आणि हाणामारीच्या षटकांमध्ये निर्णायक ठरू शकतो.
बॅटिंगच्या बरोबरीने केदार आपल्या खास स्लिंगिंग अॅक्शनने विकेट्सही मिळवतो, भागीदाऱ्या तोडतो. आधी धोनी आणि नंतर कोहली असा कर्णधारांचा पाठिंबा असल्याने केदारची कामगिरी बहरतेय. वर्ल्डकपमध्ये केदारच्या रूपात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होऊ शकतं.
6. जसप्रीत बुमराह

फोटो स्रोत, Getty Images
यॉर्कर टाकून भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणणारा हा युवा तारा भारतीय संघाचा नवा हिरो आहे. बुंध्यात पडणारे यॉर्कर, फसवे स्लोअर-वन्स, भेदक उसळते चेंडू, अशी भात्यात एकापेक्षा एक अस्त्रं असणारा बुमराह प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडतो.
डावाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या षटकांमध्ये धावांना अंकुश लावत विकेट्स पटकावणं ही बुमराहची खासियत आहे. पहिलीवहिली वर्ल्डकपवारी ऐतिहासिक करण्यासाठी बुमराह उत्सुक आहे.
7. मोहम्मद शमी
'गन बॉलर' असं शमीचं वर्णन कर्णधार कोहली करतो. पिच कसंही असलं, बॅट्समन कितीही कर्तृत्ववान असले तरी सातत्याने विकेट्स मिळवणं, ही शमीची खासियत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे शमीची क्रिकेट कारकीर्द धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती होती. पण शमीने क्रिकेटवरचं एकाग्रचित्त कायम राखत चांगला खेळ केला.
चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्यांच्या यादीत शमी चौथ्या स्थानी होता. हा अनुभव टीम इंडियासाठी मोलाचा ठरू शकतो.
8. भुवनेश्वर कुमार
इनस्विंग आणि आऊटस्विंग करू शकणारा भुवनेश्वर इंग्लंडमध्ये मोलाचा ठरू शकतो. विकेट-टू-विकेट अर्थात शिस्तबद्ध गोलंदाजीत भुवनेश्वर प्रवीण आहे. वेळ पडल्यास बॅटिंग करू शकणारा भुवनेश्वर चपळ क्षेत्ररक्षकही आहे.
बुमराह आणि शमीच्या साथीने भुवनेश्वरने टीम इंडियाची गोलंदाजीची आघाडी भक्कमपणे सांभाळली आहे. चार वर्षांपूर्वी भुवनेश्वर वर्ल्डकप संघात होता, मात्र यंदा खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवण्याची संधी भुवीकडे आहे.
9. हार्दिक पंड्या
बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर संघाला संतुलन मिळवून देईल, अशा अष्टपैलू खेळाडूची टीम इंडियाला आवश्यकता होती. आक्रमक पवित्र्यासह बॅटिंग आणि हमखास भागीदारी तोडणारी बॉलिंग हे हार्दिकचं बलस्थान आहे.
चपळ क्षेत्ररक्षणाने हार्दिक धावा वाचवतो आणि रनआऊट्सही घडवून आणतो. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी हार्दिकला प्रदीर्घ काळ खेळता आलं नव्हतं. मात्र आता हार्दिक फिट आहे.
'कॉफी विथ करण' या चॅटशोमध्ये आक्षेपार्ह उद्गारांमुळे हार्दिक वादात सापडला होता आणि त्यानंतर त्याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. मैदानाबाहेरील वाद बाजूला ठेऊन पहिली विश्वचषक मोहीम फत्ते करण्याचा हार्दिकचा प्रयत्न आहे.
10. युझवेंद्र चहल आणि 11. कुलदीप यादव
लेगस्पिनर युझवेंद्र आणि चायनामन कुलदीप अशी ही जोडी 'कुलचा' नावाने प्रसिद्ध आहे. धावांना ब्रेक लावून विकेट्स पटकावण्यात ही जोडी माहीर आहे. रविचंद्रन अश्विनची सद्दी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मोडून काढत या जोडीने प्रमुख स्पिनर्स म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं.
मधल्या षटकांमध्ये या जोडीला खेळून काढणं मोठ्या फलंदाजांसाठीही आव्हानात्मक ठरलं आहे. इंग्लंडमध्ये या जोडगोळीची कामगिरी प्रभावी आहे.
या खेळाडूंचं संघातलं स्थान बऱ्यापैकी सुरक्षित आहे. मात्र उर्वरित चार जागांसाठी अजूनही प्रचंड चुरस अनुभवायला मिळत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
12. लोकेश राहुल
वनडे पदार्पणात शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुलला पुढच्या सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. जबरदस्त स्ट्राईक रेट ही राहुलचं बलस्थान आहे.
तूर्तास मधल्या फळीसाठी विचार होणारा राहुल राखीव ओपनरही म्हणूनही उपयुक्त ठरू शकतो. अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक असलेला राहुल गरज पडल्यास विकेटकीपिंगही करू शकतो.
चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावणं हा राहुलचा कच्चा दुवा आहे. 'ऑल-फॉरमॅट स्पेशलिस्ट' म्हणून स्वत:ला विकसित करणाऱ्या राहुलवर कर्णधार विराटचा खूप विश्वास आहे.
IPLमध्ये उत्तम फॉर्मात असलेल्या राहुलला कारकिर्दीत पहिल्यांदाच वर्ल्डकपचं तिकीट मिळणार का, हे पाहणं रंजक ठरेल.
13. दिनेश कार्तिक
महेंद्रसिंग धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा दिनेश कार्तिक अजूनही खेळतो आहे. दर्जेदार विकेटकीपिंग, प्रचंड अनुभव आणि फिनिशर म्हणून वेळोवेळी निभावलेली भूमिका यामुळे निवडसमितीला कार्तिककडे दुर्लक्ष करणं अवघड आहे.
धोनीसाठी पर्यायी विकेटकीपर म्हणून कार्तिकचा पर्याय सक्षम आहे. कार्तिक याआधी इंग्लंडमध्ये खेळला होता. कामगिरीत सातत्य राखता न येणं कार्तिकसाठी अडचणीचं ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
33 वर्षांच्या कार्तिकशी स्पर्धा युवा ऋषभ पंतशी होते आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी शतक आणि दमदार विकेटकीपिंग केल्याने ऋषभवरील अपेक्षा वाढल्या आहेत. 21 वर्षांच्या ऋषभने IPL स्पर्धेतही तडाखेबंद फलंदाजी केली आहे.
आक्रमकतेच्या नादात विकेट फेकण्याची सवय आणि अल्प अनुभव, यामुळे निवडसमिती ऋषभऐवजी कार्तिकचा विचार करू शकते.
14.रवींद्र जडेजा
संघात अतिरिक्त फिरकीपटू खेळवायचा का अतिरिक्त वेगवान गोलंदाज यावर निवडसमितीला बराच खल करावा लागू शकतो. कमीत कमी वेळात षटक पूर्ण करणं, विकेट-टू-विकेट गोलंदाजी करत धावांना ब्रेक लावणं, फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवणं, भन्नाट क्षेत्ररक्षण असे अनेक मुद्दे जडेजाच्या बाजूने आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षभरात जडेजाने वनडे संघात यशस्वी पुनरागमन केलं आहे. मात्र इंग्लंडमध्ये जडेजाच्या फिरकीपेक्षा फलंदाजीसह उपयुक्त वेगवान गोलंदाजी करणारा विजय शंकर निवडसमितीच्या रडारवर आहे. विजय शंकरकडे मर्यादित अनुभव आहे.
15. विजय शंकर
परिपक्व तंत्रकौशल्याने त्याने मधल्या फळीत चांगला खेळ केला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने हाणामारीच्या षटकात धावांवर अंकुश लावला होता. विजय चपळ क्षेत्ररक्षक आहे. हार्दिक पंड्यासह अष्टपैलू म्हणून विजय शंकरला पसंती देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








