विंबल्डन 2019: फायनलमध्ये नोवाक जोकोविच रॉजर फेडररपेक्षा सरस का ठरला?

जोकोविच

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अविस्मरणीय, अनाकलनीय आणि अतुलनीय. नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडररमधल्या यंदाच्या विंबल्डन फायनलचं वर्णन करायला अशी अनेक विशेषणं अपुरी ठरतील.

चौदा जुलैला, रविवारी झालेला हा ऐतिहासिक सामना जोकोविचनं 7-6 (7-5), 1-6, 7-6 (7-4), 4-6, 13-12 (7-3) असा जिंकला आणि विजेतेपदाची ट्रॉफी आपल्याकडेच कायम ठेवली. विंबल्डन पुरुष एकेरीत जोकोविचचे हे सलग दुसरं आणि आजवरचं पाचवं विजेतेपद ठरलं. तसंच ग्रँड स्लॅम स्पर्धांमधलं जोकोविचचं हे एकेरीतलं सोळावं विजेतेपदही ठरलं.

पण हा विजय जोकोविचला काही अगदी सहज मिळाला नाही, तर त्यासाठी त्याला फेडररनं बराच घाम गाळायला लावला.

विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर चार तास सत्तावन्न मिनिटं चाललेला हा सामना विंबल्डन पुरुष एकेरीच्या इतिहासातला सर्वांत लांबलेला अंतिम सामना ठरला. ही लढाई चुरशीची होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, आणि ती पूर्णही झाली.

जोकोविचचा लढाऊ खेळ

खरं तर वय आणि सध्याची कामगिरी पाहता या सामन्याआधी बहुतेक समीक्षकांनी जोकोविचचं पारडं जड असल्याचं म्हटलं होतं.

पण प्रत्यक्ष सामन्यात फेडररची सर्व्हिस भेदण्यासाठीही त्याला अडीच तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. फेडररनं डावावर वारंवार पकड मिळवली, त्यामुळं नोवाक अनेकदा बचावात्मक खेळताना, झगडताना दिसला.

जोकोविच

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या विजयासाठी जोकोविचला बराच घाम गाळावा लागला.

पण झगडण्याची हीच वृत्ती आणि निर्णायक क्षणी घाव घालण्याची क्षमता जोकोविचच्या कामी आली. सामन्यातल्या तीन्ही टायब्रेकरमध्ये जोकोविचनं बाजी मारली.

इतकंच नाही, तर त्यानं दोन मॅच पॉइंट्सही वाचवले. पाचव्या सेटमध्ये फेडरर ८-७ असा आघाडीवर होता, तेव्हा सामना जिंकण्याच्या दोन संधी फेडररकडे चालून आल्या होत्या. पण दोन्ही पॉइंट्स जिंकून जोकोविचनं तो गेमही जिंकला आणि ८-८ अशी बरोबरी साधली. पुढे १२-१२ अशी बरोबरी झाली तेव्हा नव्या नियमानुसार टायब्रेकर खेळवण्यात आला. तिथेच जोकोविचनं बाजी मारली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

जोकोविचचा यशाचा मंत्र

"अशा क्षणी मी फक्त स्वतःवरचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो, शांत राहतो, बॉल खेळण्यावर लक्ष केंद्रीत करतो. सर्वांत महत्त्वाच्या क्षणी, टायब्रेकरमध्ये मी माझा सर्वोत्तम खेळ केला," असं जोकोविचनं सामन्यानंतर म्हटलं.

दुसरीकडे फेडरर ऐन मोक्याच्या क्षणी आणि टायब्रेकरमध्ये दबावाखाली येताना दिसला. कारकीर्दीतलं नववं विंबल्डन विजेतेपद मिळवून ग्रँड स्लॅम एकेरीत विजेतेपद मिळवणारा सर्वांत वयस्कर पुरुष खेळाडू ठरण्याची संधी त्याच्याकडे होती.

पण सामना जिंकण्याच्या गमावलेल्या दोन्ही संधींची बोच फेडररला आणखी काही काळ लागत राहील. सामना संपल्यावर तो म्हणालाही, "मी हे विसरायचा प्रयत्न करेल. माझअयाकडे संधी होती तशी त्याच्याकडेही होती. आम्ही उत्तम दर्जाचं टेनिस खेळलो."

जोकोविचनं मात्र, हा सामना आपण बराच काळ लक्षात ठेवू, असं म्हटलं आहे. विंबल्डन फायनलमध्ये तीनदा फेडररशी मुकाबला करून तिन्ही वेळा त्याला हरवण्याची कामगिरीही जोकोविचच्या नावावर जमा झाली आहे.

फेडररचं नवं रूप

पराभव झाला असला, तरी रॉजर फेडररचा या सामन्यातला खेळ विसरता येणार नाही. लागोपाठ राफेल नदाल आणि नोवाक जोकोविचसारख्या तगड्या खेळाडूंना तोंड देणं ही सोपी गोष्ट नाही.

फेडररनं ते धाडस दाखवलं. सेमी फायनलमध्ये त्यानं राफेल नदालला हरवलं आणि मग फायनलमध्ये जोकोविचलाही अगदी कडवी टक्कर दिली.

फेडरर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सामना हरल्यानंतर हताश फेडरर

फेडररचं हे वेगळं रूप त्याच्या चाहत्यांना सुखावणारं तर आहेच, शिवाय त्याच्यात अजूनही बरंच टेनिस बाकी असल्याची ग्वाही देणारं आहे. काही आठवड्यांतच तो अडतीस वर्षांचा होणार आहे, आणि ३२ वर्षांच्या जोकोविचलाही तो आव्हान देताना दिसतो आहे.

सामन्यानंतर वयाविषयी विचारलं असता, फेडरर म्हणाला, "आशा आहे की, 37 वर्षांचे झालात म्हणजे सगळं संपलं नाही, असा विश्वास मी काही जणांना देतो आहे." जोकोविचनं त्याचा उल्लेख करत म्हटलं, "त्या काहीजणांमध्ये मीही आहे अशी आशा आहे. फेडरर मलाही प्रेरणा देतो हे नक्की."

विजयानंतरचा हा विनय, दोन महान खेळाडूंमधल्या या ऐतिहासिक लढतीलाही महान बनवणारा ठरला, हे नक्की.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)