वर्ल्ड कप 2019: इंग्लंड विश्वविजेते, मॅच टाय-सुपर ओव्हर टाय- बाऊंड्रीच्या बळावर विजयी

इंग्लंड, न्यूझीलंड, वर्ल् कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजेता इंग्लंड संघ

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत इंग्लंडने अंतिम लढतीत न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

मॅच टाय झाल्यामुळे सुपर ओव्हरद्वारे मॅचचा निर्णय होईल असं स्पष्ट झालं. मात्र सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे मॅचमध्ये कोणत्या संघाचे सर्वाधिक चौकार यावर विजेता ठरवण्यात आला. न्यूझीलंडच्या 14च्या तुलनेत इंग्लंडचे 22 चौकार असल्याने ते वर्ल्ड कपचे विजेते ठरले.

इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता होती. त्यांनी 0,0, 6, 6, 1 आणि रनआऊट, 1 आणि रनआऊट अशा धावा केल्याने मॅच टाय झाली.

सुपर ओव्हरमध्ये बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी 3, 1, 4, 1, 2, 4 अशा 15 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून जेम्स नीशाम आणि मार्टिन गप्तील यांनी वाईड1, 2, 6, 2, 2, 1, 1 आणि रनआऊट अशा धावा करत 15 धावा केल्याने सुपर ओव्हरही टाय झाली.

म्हणूनच सर्वाधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.

84 धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हेन्री निकोल्स (55) आणि टॉम लॅथम (47) यांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

ख्रिस वोक्स आणि लायम प्लंकेट यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी सावध सुरुवात केली. मात्र मॉट हेन्रीने रॉयला आऊट केलं. त्याने 17 धावा केल्या.

कॉलिन डी ग्रँडहोमने जो रूटला लॅथमकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याला फक्त 7 धावा करता आल्या.

लॉकी फर्ग्युसनने भन्नाट वेगाच्या बळावर बेअरस्टोचा त्रिफळा उडवला.

कर्णधार आणि भरवशाचा इऑन मॉर्गन जेम्स नीशामची शिकार ठरला. फर्ग्युसनने अफलातून झेल टिपला.

4 बाद 86 अशा अडचणीत सापडलेल्या इंग्लंडला जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी तारलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या.

लॉकी फर्ग्युसनच्या बॉलिंगवर टीम साऊदीने थरारक झेल टिपत बटलरची खेळी संपुष्टात आणली. त्याने 59 धावांची खेळी केली.

ख्रिस वोक्सचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॉम लॅथमच्या हातात जाऊन विसावला.

लायम प्लंकेटने दहा धावा करत अंतर कमी केलं. बेन स्टोक्सने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)