वर्ल्ड कप 2019: यंदाचे सामने भारतीयांच्या लक्षात कशामुळे राहतील?

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चारुलता पटेल
    • Author, जॅक स्केलटन
    • Role, बीबीसी स्पोर्ट्स

टीम इंडियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. आता उरल्या आहेत फक्त आठवणी.

गुणपत्रिकेमध्ये आघाडीवर असणाऱ्या आणि टूर्नामेंटच्या आधीपासूनच वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय टीमला न्यूझीलंडने धक्का दिला.

भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला त्याप्रमाणे दृढ संकल्पानिशी खेळणाऱ्या आणि मोक्याच्या क्षणी चांगला खेळ करणाऱ्या न्यूझीलंडला ओलांडून फायनलमध्ये दाखल होणं शक्य नव्हतं.

पण तरीही भारतीय संघाने या वर्ल्डकपमध्ये अनेक संस्मरणीय क्षण दिले.

उत्साही फॅन्स

न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती आधी 3 बाद 5 धावा आणि नंतर 4 बाद 24 धावा अशी झाली तेव्हा किवींचा वरचष्मा हा गर्दीच्या आवाजावरूनही जाणवत होता.

राखून ठेवलेल्या दिवशी मॅच होत असल्याने मैदान फक्त दोन तृतीयांशच भरलेलं होतं. पण तरीही अगदी एका धावेलाही मोठ्या जल्लोषात प्रतिसाद मिळत होता.

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय चाहते

भारतीय टीमला सर्व मॅचेसना जल्लोषात मिळालेला पाठिंबा यावरूनच दिसून येतो. फक्त भारताचा महेंद्रसिंह धोनी आऊट झाल्यानंतरच ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर शांतता पसरली होती.

बांगलादेश आणि पाकिस्तानचे फॅन्सही असेच उत्साही असतात. पण भारतीय फॅन्स त्यांच्या मोठ्या संख्येमुळे या सगळ्यांवर मात करतात.

झेंडे, ढोल, शरीर रंगवलेल्या व्यक्ती अशी भारतीय टीम खेळताना भन्नाट वातावरण निर्मिती नक्की असते.

हा वर्ल्डकप कोहलीसाठी मात्र काहीसा शांत किंबहुना निराशाजनक ठरला. त्याने 9 खेळींदरम्यान 55.37च्या सरासरीने 443 धावा केल्या. त्याने पाच अर्धशतकं केली पण त्याला शतक मात्र करता आलं नाही.

या 30 वर्षीय खेळाडूसाठी उपांत्यफेरीही निराशाजनकच ठरली. त्याने न्यूझीलंडच्या विरोधात केवळ एक धाव काढली. 2015मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये आणि 2011मध्ये पाकिस्तानच्या विरुद्धही तो एकच रन काढून आऊट झाला होता.

पण असं असूनही कोहलीने या टूर्नामेंटवर आपल्या करिश्म्याने छाप सोडली.

बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्यावर त्याचं 87 वर्षांच्या फॅन चारुलता पटेल यांना भेटायला जाणं सर्वांच्याच मनाला भिडलं. कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध खेळताना रिप्लेमध्ये बॅट लागल्याचं दिसत नसूनही त्याने मैदान सोडलं होतं.

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय चाहते

अगदी स्टीव्हन स्मिथची हेटाळणी करणाऱ्या त्याच्या पाठिराख्यांनाही त्याने असं करण्यापासून थांबवलं.

पण दुसऱ्या बाजूला तोच कोहली आहे ज्याने इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टनमध्ये हरल्यानंतर अगदी जवळ असणाऱ्या सीमारेषेवर आक्षेप घेतला होता.

पण अखेरीस त्याच्या संघाला हरवणाऱ्या न्यूझीलंड संघांच्या कौशल्याचं कौतुक करत त्याने मानाने एक्झिट घेतली.

बॅटिंग आणि बॉलिंगची शानदार सुरुवात

न्यूझीलंडच्या विरुद्ध रोहित शर्मा फक्त एक रन करून आऊट झाला पण तोपर्यंत तो या विश्वचषकात भन्नाट खेळला. त्याला याघडीचा जगातला सर्वोत्तम वनडे ओपनर म्हणता येऊ शकतं.

एकाच वर्ल्डकपमध्ये पाच शतकं करणारा तो पहिला आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने शतक ठोकलं.

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा

असं होण्याची शक्यता नाही पण जर डेव्हिड वॉर्नरने उर्वरित टूर्नामेंटमध्ये 10 धावा केल्या नाहीत तर रोहित अजूनही या वर्ल्डकपमधला सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. त्याने 9 खेळींमध्ये 81च्या सरासरीने आणि 98.33च्या स्ट्राईकरेटने 648 रन्स केले.

विकेट्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या यादीमध्ये मिचेल स्टार्क सर्वात पुढे असला तरी भारतीय फास्ट बोलर जसप्रित बुमरानेही तो वनडे रँकिंगमधला पहिल्या क्रमांकाचा बॉलर आहे, हे दाखवायची संधी सोडली नाही.

बुमराने 9 सामन्यांमध्ये 20.61च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या.

भारतासाठी पुढे काय?

सलग गेल्या दोन वर्ल्डकपमध्ये भारत उपांत्य फेरीत हरला. पण आता पुढची स्पर्धा 2023 मध्ये भारतातचं होत आहे, तेव्हा हा वर्ल्डकप तिसऱ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न भारत करेल.

आताच्या संघातले काही जण टीमचा निरोप घेतील. विकेटकीपर आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी. 38 वर्षांच्या धोनीचा हा नक्कीच शेवटचा वर्ल्डकप होता आणि गेल्या काही काळामध्ये त्याचा प्रभावही कमी झालेला आहे.

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी रनआऊट झाला तो क्षण.

"फॅन्सचा धोनीवर असलेला विश्वास अतुलनीय आहे पण मला वाटतं आपल्याला यापुढे त्याला वर्ल्डकपमध्ये पाहता येणार नाही. तो पुढचा वर्ल्डकप खेळेल असं मला वाटत नाही," टेस्ट मॅचचं विशेष समालोचन करणाऱ्या प्रकाश वाकणकर यांनी सांगितलं.

32 वर्षांचा रोहितही पुढची चार वर्षं टिकेल का याबाबत शंका आहे पण भारताकडे तरुण खेळाडूंची मजबूत फळी आहे जी त्यांचा मजबूत वनडे टीम असल्याचा दर्जा कायम ठेवू शकते.

बुमरा 25 वर्षांचा आहे. उशीरा बोलावण्यात आलेल्या ऋषभ पंतनेही चमक दाखवली आणि तो फक्त 21 वर्षांचा आहे. ऑल राऊंडर हार्दिक पांड्या 25 वर्षांचा आहे तर वर्षभर उत्तम खेळूनही या विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करू न शकलेला डावखुरा स्पिनर कुलदीप यादव 24 वर्षांचा आहे.

भारत, वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराह

आणि घरच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये या सगळ्यांचं नेतृत्त्व करण्यासाठी विराट कोहली उत्सुक असेल यात शंकाच नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)