You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: डेल स्टेनचं जगज्जेतेपदाचं स्पप्न राहणार अपुरं...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
डेल स्टेन हे दक्षिण आफ्रिकेचं प्रमुख अस्त्र होतं. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. या बातमीसह स्टेनचं वर्ल्ड विजयाचं स्वप्न अधुरंच राहण्याची शक्यता आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅचसाठी डेल स्टेन फिट होऊन परतेल अशी चर्चा होती. इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी डेल स्टेनचं संघात असणं महत्त्वाचं होतं.
मात्र मंगळवारची सकाळ एक वाईट बातमी घेऊन थडकली. डेल स्टेन आऊट ऑफ वर्ल्ड कप अशा नोटिफिकेशन्स जगभरातल्या स्मार्टफोन्समध्ये थडकल्या. ही बातमी जगभरातल्या स्टेन चाहत्यांना निराश करणारी. मात्र स्टेनच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी तो नसणं हे दिलासा देणारं.
डेल स्टेन हा फक्त फास्ट बॉलर नाही. तो एक अनुभव आहे. डेल स्टेनकडे बघितल्यावरच हा फास्ट बॉलर आहे हे मनात ठसतं.
ग्रे आणि निळसर हिरव्या रंगाचे भेदक डोळे, पिळदार शरीरयष्टी आणि शरीरभर पसरलेला अंगार. बॉल स्विंग करणं, खतरनाक यॉर्कर सोडणं, बॅट्समन घायाळ होईल असे भेदक बाऊन्सर दागणं, एकामागोमाग एक वेगवान बॉल्सच्या मध्ये फसवा स्लोअर वन टाकणं ही सगळी गुणवैशिष्ट्यं स्टेननं प्राणपणाने जपली.
पण याबरोबरीने त्याला बघूनच अनेकांना घाम फुटतो. स्टेनसाठी फायरब्रँड अशी उपमा वापरली जाते. कदाचित हा शब्द स्टेनला समोर ठेऊनच निर्माण झाला असावा.
2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर स्टेनगन धडधडू लागली. प्रचंड ऊर्जा आणि जोडीला भात्यात एकापेक्षा एक अस्त्रं असं समीकरण असल्याने स्टेननं आफ्रिकेचा प्रमुख बॉलर हे कर्तेपण अल्पावधीतच स्वीकारलं.
गेली अनेक वर्ष स्टेन आणि दक्षिण आफ्रिका सिंक्रोनाइज्ड झाले होते. बॉलर्सची कत्तल होण्याच्या काळात स्टेनने दबदबा राखला. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू लागल्यावर खेळाडूंचे कच्चे दुवे खुले होतात. स्टेनचे सगळे व्हीडिओ उपलब्ध असतानाही त्याला खेळणं अवघड होतं.
टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला अव्वल स्थान मिळवून देण्यात स्टेनचा सिंहाचा वाटा आहे. स्टेनच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅमी स्मिथ आणि एबी डी'व्हिलियर्स यांच्या नेतृत्वाखाली तो खेळला. दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्व आणि संघही तेव्हा स्थिर होता. स्टेनला मॉर्ने मॉर्केल, अल्बी मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, कागिसो रबाडा, लोनवाबो त्सोसोबे, कायले अबॉट, मर्चंट डी लाँज अशा सहकाऱ्यांची साथ मिळाली. परंतु एक सल स्टेनच्या मनात आयुष्यभर राहील.
मोठे खेळाडू आपल्या संघाला सर्वोच्च स्पर्धेचं जेतेपद पटकावून देतात. उदाहरणार्थ इम्रान खान यांनी 1992 साली युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाची मोट बांधत पाकिस्तानला विश्वविजेतेपद पटकावून दिलं.
सचिन तेंडुलकरचा समावेश असलेल्या टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप उंचावला. रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाला सातत्याने वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवून दिलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कपने सातत्याने हुलकावणी दिली आहे. हा इतिहास बदलावा असं स्टेनचं स्वप्न होतं. मात्र परवा स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर अशी वार्ता थडकली. स्टेनचं वय 35 आहे. आता तो खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.
याआधीही त्याला अनेकविध दुखापतींनी सतवलं आहे. वय आणि दुखापतीचं ग्रहण पाहता, स्टेन 2023 वर्ल्ड कपमध्ये असेल असं वाटत नाही. त्यामुळे स्टेनगनचं वर्ल्ड कपचं स्वप्न अधुरंच राहील अशी चिन्हं आहेत.
विशेष म्हणजे स्टेन तीन वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. वर्ल्ड कपच्या 14 मॅचेसमध्ये त्याच्या नावावर 23.39च्या सरासरीने 23 विकेट्स आहेत. हे आकडे कोणालाही अभिमान वाटावेत असे. 2011 वर्ल्ड कपमध्ये स्टेन सहा मॅचेस खेळला. उपउपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला 221 धावांतच रोखलं. वनडे क्रिकेटमध्ये हे आव्हान पेलण्यासारखं होतं. मात्र प्रत्युत्तरादाखल खेळताना आफ्रिकेचा डाव 172 धावांतच आटोपला.
चार वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या लढतीत प्रयत्नांची शर्थ केली. ऑकलंड इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने 281 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने ब्रेंडन मॅकक्युलम, ग्रँट एलियट आणि कोरे अँडरसनच्या अर्धशतकांच्या बळावर थरारक विजय साकारला.
स्टेनच्याच बॉलिंगवर एलियटने उत्तुंग षटकार खेचत दक्षिण आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आणलं. वाघाचं काळीज असणाऱ्या स्टेनने अश्रूभरल्या डोळ्यांनी पिचवरच बसकण मारली होती. एलियट स्टेनचं सांत्वन करत असतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
वाढत्या वयानुसार दुखापतींनी वेढा दिलेल्या शरीराशी संघर्ष करत स्टेन यंदाच्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. त्याआधी आयपीएलमध्ये खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. मात्र आयपीएल स्पर्धेत दोन मॅचेसनंतरच स्टेनने दुखापतीमुळे माघार घेतली. वर्ल्ड कप लक्षात घेऊनच स्टेनने ही माघार घेतली असा समज होता.
स्टेन असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वजन प्राप्त झालं होतं. मात्र इंग्लंडविरुद्ध तो खेळलाच नाही. बांगलादेशविरुद्धही तो खेळला नाही. भारताविरुद्धच्या मॅचआधी त्याच्या पुनरागमनाची आशा असताना त्याच्या पॅकअपची बातमी समोर आली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)