1983 Cricket World Cup : असा जिंकला भारताने पहिला वर्ल्ड कप

25 जून 1983 चा दिवस... लॉर्ड्सवर क्रिकेटचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू होता. सामना रंगात आला असताना कपिलदेव निखंज आणि मदनलाल यांच्यात काहीतरी चर्चा झाली.

या चर्चेचा परिणाम केवळ सामन्याच्या निकालावरच झाला नाही तर त्याने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला. विव्ह रिचर्ड्सची तुफान फटकेबाजी सुरू होती आणि बघता बघता त्यांनी 33 धावा फटकावल्या होत्या. मदनलाल यांच्या बॉलवर त्यांनी तीन चौकार ठोकले होते. त्यामुळेच कपिलदेव दुसऱ्या एखाद्या बॉलरला बॉलिंग देण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात मदनलाल यांनी कपिल देव यांना आणखी एक ओव्हर देण्याची विनंती केली.

मदनलाल सांगतात, "हे खरंय की मी कपिलदेव यांच्याकडून बॉल घेतला. मात्र, मी कपिलदेव यांच्याकडून बॉल हिसकावून घेतला, असं जे सांगितलं जातं ते चूक आहे. माझ्या तीन ओव्हरमध्ये 20-21 धावा निघाल्या होत्या. मला आणखी एक ओव्हर टाकू दे, असं मी कपिलला म्हणालो. मी विचार केला, की रिचर्ड्सला एक शॉर्ट बॉल टाकेन. मी सुरुवातीच्या बॉलपासूनच वेगवान गोलंदाजी केल्यानं बॉलनं पिचला चांगलंच हिट केलं होतं. रिचर्ड्सने बॉलला हुक करताना 'मिसटाईम' केलं आणि कपिल देवनं 20-25 यार्ड मागे जात अगदी बोटांच्या टोकावर तो बॉल झेलला."

ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शॉपिंगची इच्छा

25 जून 1983ला शनिवार होता. लॉर्ड्सच्या मैदानावर काळे ढग दाटले होते. क्लाईव्ह लॉईड आणि कपिल देव मैदानावर टॉससाठी येताच सूर्याने ढगांना बाजूला सारलं आणि प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्यांचा गडगडाट केला.

मिहीर बोस यांनी भारतीय क्रिकेट इतिहासावर नुकतंच एक पुस्तक लिहिलंय. 'The Nine Waves - The Extraordinary Story of Indian Cricket.' मिहीर बोस त्यांची एक आठवण सांगतात. ते म्हणाले, "जेव्हा आम्ही लॉर्ड्सच्या आत जात होतो तेव्हा बुकींनी भारताला 50 ला 1 आणि 100 ला 2 असा भाव दिला होता. दोन भारतीयांनीही हातात बॅनर घेतले होते. त्यात भारत फेव्हरेट असल्याचं लिहिलं होतं. ते आमची टर उडवत होते. लॉर्ड्सच्या आत वेस्ट इंडिजचे अनेक समर्थक होते. भारताचे फारसे समर्थकच नव्हते."

पुढे ते सांगतात, "वेस्ट इंडिजचे चाहते आधीपासूनच वेस्ट इंडिज हॅटट्रीक करणार, असं मोठमोठ्याने ओरडत होते. प्रेस बॉक्समध्येदेखील एखाद-दुसरेच भारतीय पत्रकार होते. मी संडे टाईम्ससाठी लिहायचो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना ही फायनल कंटाळवाणी होईल, असं वाटत होतं."

"इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात असते तर काहीतरी मजा आली असती, असा त्यांचा रोख होता. भारतीय खेळाडू मैदानात उतरले. मात्र, त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली नाही. वेस्ट इंडिजने बॅटिंग सुरू केली तेव्हा संदीप पाटीलने सुनिल गावस्करला मराठीत म्हटलं, 'बरं आहे मॅच लवकर संपेल. आपल्याला ऑक्सफोर्ड स्ट्रीटवर शॉपिंग करता येईल.' वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरू झाली तेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांचं बोलणं ऐकून मला इतकं वाईट वाटलं, की मी प्रेस बॉक्समधून बाहेर आलो आणि बरं वाटावं म्हणून मैदानाजवळ फिरू लागलो," बोस सांगतात.

श्रीकांतची तुफान फटकेबाजी

त्या दिवशी कपिल देव टॉस हरले होते. अँडी रॉबर्ट्सने 'बिग बर्ड' जोएल गार्नरसोबत बॉलिंगची सुरुवात केली. रॉबर्ट्सने भारताला पहिला झटका दिला तो गावस्करच्या रूपात. अवघ्या दोन धावा झाल्या असताना रॉबर्ट्सच्या गोलंदाजीवर दुजोनं गावस्करचा कॅच घेतला.

गावस्करच्या जागी आलेल्या मोहिंदर अमरनाथ यांनी एक बाजू सांभाळली. दुसऱ्या बाजूला श्रीकांत यांना चांगला सूर गवसल्याचं जाणवत होतं. त्यांनी आधी गार्नरला चार धावांसाठी स्लॅश केलं. नंतर रॉबर्ट्सच्या बॉलला मिड-विकेटला बाउंड्रीच्या बाहेर भिरकावलं आणि थोड्याच वेळात त्यांना 6 धावांसाठी हुक केलं. मी श्रीकांतला विचारलं, की तुम्ही बॅटिंग करायला गेलात तेव्हा काय विचार केला होता? श्रीकांत यांचं उत्तर होतं, "मला तिथे जाऊन माझा 'नॅचरल गेम' खेळायचा होता. फटकेबाजी करता आली तर करायची नाहीतर बाहेर पडायचं."

वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांची धारदार बॉलिंग

श्रीकांत फलंदाजी करताना खूप धोकाही पत्करत होते आणि तिकडे लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेल्या खेळाडूंच्या हृदयाची धडधड वाढत होती. लॉईड यांनी मार्शलला बॉलिंग दिली आणि त्यांनी येताच श्रीकांत यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, श्रीकांतने काढलेल्या 38 धावा दोन्ही संघामधल्या सर्वाधिक धावा होत्या.

मोहिंदर आणि यशपाल शर्मा यांनी अत्यंत धीम्या गतीने 31 धावा काढल्या. मात्र, वेस्ट इंडिजचे गोलंदाज एखाद्या कॉम्प्युटराईझ्ड रॉकेटप्रमाणे आक्रमक बॉलिंग करत होते. रॉबर्ट्स जायचे तर मार्शल यायचे. मार्शल जायचे तर होल्डिंग बॉलिंगची धुरा सांभाळायचे. यशपाल आणि मोहिंदर दोघेही पाठोपाठ बाद झाले.

मार्शल यांचा बलविंदरला बाउंसर

भारतानं केवळ 11 धावांमध्ये 6 विकेट्स गमावल्या. लॉर्ड्सवर मॅच बघणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली होती. तिकडे भारतात क्रिकेटप्रेमी संतापाने आपले रेडिओ आणि टीव्ही सेट बंद करत होते. मात्र, भारताच्या शेवटच्या चार खेळाडूंनी 'करो या मरो'च्या भावनेने खेळ करत 72 रन्स काढल्या. अकराव्या क्रमांकावर खेळायला आलेले बलविंदर संधू अत्यंत धैर्याने खेळले. त्यांना विचलित करण्यासाठी मार्शल यांनी एक बाउंसर टाकला जो त्यांच्या हेल्मेटला लागला.

सय्यद किरमाणी तो किस्सा आठवताना सांगतात, "बलविंदर आणि मी पिचवर होतो तेव्हा मार्शलने त्यांना टाकलेला पहिला बॉल बाउंसर होता. तो बॉल थेट त्यांच्या हेल्मेटला लागला. मार्शल त्याकाळचे जगातले सर्वात वेगवान गोलंदाज होते. तो बॉल बल्लूच्या हेल्मेटला लागताच त्याला दिवसा तारे दिसले. मी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्याकडे धावलो. मी बघितलं, की बल्लू हेल्मेटवर हाताने घासत होते."

"मी विचारलं, की तू हेल्मेट का घासतोय, त्याला लागलंय का? त्याचवेळी अंपायरने मार्शलला टेल-एंडरला बाउंसर टाकल्यामुळं चांगलंच फटकवलं. त्यांनी मार्शलला बल्लूची माफी मागायलाही सांगितलं. मार्शल त्याच्याजवळ येऊन म्हणाले, 'I did not mean to hurt you. I am sorry. (तुला जखमी करण्याचा माझा हेतू नव्हता. मला माफ कर.)' बल्लू म्हणाले, 'Malkam do you think that my brain is in my head. No it is in my knee. (माल्कल, तुला काय वाटतं माझा मेंदू माझ्या डोक्यात आहे. नाही तो गुडघ्यात आहे.)' हे ऐकून माल्कमला खूपच हसू आलं," किरमाणी सांगतात.

भारताने केल्या 183 धावा

भारताचा डाव 183 धावांतच आटोपला आणि वेस्ट इंडिजची टीम आता वर्ल्डकप आपल्या खिशातच आहे, अशा आविर्भावात मैदानात आली. मी सय्यद किरमाणी यांना विचारलं, की तुम्ही फिल्डिंगला उतरला तेव्हा तुमच्या मनात काय सुरू होतं? ते म्हणाले, "हे आम्हाला ओपनिंग स्टँडमध्येच खाऊन टाकतील, असं आम्हाला वाटत होतं. मात्र, हिंमत न हरता सर्वजण सकारात्मक खेळ करूया, असा विचार आम्ही केला."

ग्रिनीजचा 'ऑफ स्टंप' उडाला

वेस्ट इंडिजकडून हेन्स आणि ग्रिनीज बॅटिंग करण्यासाठी उतरले. चौथ्या ओव्हरमध्ये बलविंदर संधुच्या एका बॉलवर ग्रिनीजला वाटलं की बॉल बाहेर जातोय आणि त्याने बॅट उचलली. मात्र, बॉल आत वळला आणि त्याचा 'ऑफ स्टंप' उडाला.

रिचर्डच्या आउट होण्याची गोष्ट तर तुम्ही वाचली आहेच. आता भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दिसू लागला होता. लॉईडने बिन्नीला ड्राईव्ह मारला आणि शॉर्ट मिड विकेटवर उभ्या असलेल्या कपिलदेव यांच्या हातात एक जबरदस्त शॉट आला.

मोहिंदर यांनी घेतली शेवटची विकेट

गोम्स आणि बॅकर्स बाद झाल्यानंतर दूजो आणि मार्शलने फलंदाजीची धुरा जोरकसपणे लावून धरली. त्यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा काढल्या. मोहिंदर यांनी दूजोला बाद केलं. वेस्ट इंडिजची शेवटची जोडी गार्नर आणि होल्डिंग स्कोअर 140 पर्यंत घेऊन गेले. मात्र, मोहिंदर यांनी ठरवलं होतं आता खूप झालं. लॉर्ड्सचं ऐतिहासिक मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. मी कीर्ती आझाद यांना म्हटलं, की ते दृश्य आठवा जेव्हा मोहिंदर यांनी होल्डिंगला आऊट केलं.

कीर्ती म्हणाले, "तुम्ही वर्ल्डकपचा विषय काढला आणि ते दृश्य अगदी माझ्या डोळ्यासमोर आलं. माझ्या अंगावर काटा आला आहे. तुम्ही कुठलाही खेळ खेळत असाल, तुम्हाला त्या खेळाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्याची इच्छा असतेच. तो एक अविस्मरणीय अनुभव होता."

शशी कपूर लॉर्ड्सवर आले

जेव्हा हा विजय साजरा करणं सुरू होतं तेव्हा प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर तिथे आले. 'Straight From The Heart' या आपल्या आत्मकथेत कपिल देव यांनी लिहिलं आहे, "आम्ही ड्रेसिंग रुमच्या बाहेर पडलो तेव्हा तिथे साऊथ हॉलहून आलेल्या काही पंजाबी लोकांनी आनंदानं नाचायला सुरुवात केली. तेवढ्यात कुणीतरी मला सांगितलं की शशी कपूर बाहेर उभे आहेत आणि त्यांना आत यायचं आहे."

"मी टीमच्या दोन खेळाडूंसोबत त्यांना घ्यायला बाहेर गेलो. त्यादिवशी आम्ही लॉर्ड्सचे सर्व नियम तोडले. लॉर्ड्सच्या मुख्य स्वागत कक्षात कोट-टाय घालूनच आत यायला परवागनी आहे. आम्ही त्यांच्यासाठी टायची व्यवस्था तर केली. मात्र, ते इतके लठ्ठ झाले होते की आमच्यापैकी कुणाचाच कोट त्यांना येत नव्हता. मात्र, ते स्मार्ट होते. त्यांनी एखाद्या स्टारप्रमाणे कोट आपल्या खांद्यावर घेतला आणि टाय बांधून आत आले. मग त्यांनी आमच्यासोबत विजय साजरा केला."

कपिल देव आणि मदनलाल यांच्या पत्नींची अनुपस्थिती

या संपूर्ण सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अंतिम सामन्यावेळी कपिलदेव आणि मदनलाल यांच्या पत्नी लॉर्ड्सवर नव्हत्या. कपिलदेव लिहितात, "भारतीय खेळाडू एकापाठोपाठ बाद होताना बघून माझी पत्नी रोमी मदनलाल यांच्या पत्नी अनुला म्हणाली, 'मला आता इथे बसवत नाही. मी हॉटेलला जातीये.' थोड्याच वेळात अनुही हॉटेलला गेल्या."

"त्यांना स्टेडियममधून मोठमोठ्याने आवाज ऐकू आले तेव्हा त्यांनी टीव्ही सुरू केला. टीव्ही सुरू करताच त्यांनी मला रिचर्ड्सचा कॅच घेताना बघितलं. दोघीही आनंदाने पलंगावर उड्याच मारायला लागल्या. इतका आवाज ऐकून खालून हॉलेटचे कर्मचारी वर आले. या दोघींनी कसंबसं त्यांना समजावून परत पाठवलं. विजयानंतर जिथे त्या दोघी असतील असं मला वाटत होतं, त्या दिशेनं मी अंदाजाने शॅम्पेन स्प्रे करायला सुरुवात केली. तेवढ्यात मदन माझ्या कानात कुजबुजला, की मला अनु आणि रोमी कुठे दिसत नाहीयेत. त्या दोघी इच्छा असूनही पुन्हा मैदानात येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ती हे सांगण्याचं धाडस करू शकली नाही की भारत जिंकला तेव्हा त्या दोघी तिथे नव्हत्या."

वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममधून आली होती शॅम्पेन

लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देवने शॅम्पेनची बाटली उघडली आणि खाली नाचत असलेल्या चाहत्यांना त्यात भिजवून टाकलं. गंमत म्हणजे कपिल देव यांनी ती शॅम्पेनची बाटली वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममधून आणली होती. भारतीय टीमने विजयाची कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये शॅम्पेनची सोयच केलेली नव्हती.

मिहीर बोस सांगतात, "कपिल देव वेस्ट इंडिजच्या कॅप्टनशी बोलण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. वेस्ट इंडिजचे खेळाडू खूप दुःखी होते. तिथे त्यांना शॅम्पेनच्या काही बाटल्या दिसल्या. त्यांनी लॉईडला विचारलं की मी या घेऊ का? लॉईड ठीक आहे, असं म्हणाले. भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा केवळ पराभवच केला नाही तर त्यांची शॅम्पेनही संपवली."

भारतीय ड्रेसिंग रूममध्ये 11 उपवर

मी भारतीय क्रिकेट नियामक मंडाळाचे तत्कालिन अध्यक्ष राजसिंह डुंगरपूर यांना विचारलं होतं, की त्यावेळी भारतीय 'ड्रेसिंग रुम'मध्ये कसं वातावरण होतं? ते म्हणाले, "लग्नघरासारखं वातावरण होतं. अर्थात, लग्नात एक नवरदेव असतो. त्या दिवशी मात्र भारतीय ड्रेसिंग रुममध्ये 11 नवरदेव होते. त्या दिवशी भारतीय टीमचं अभिनंदन करण्यासाठी वेस्ट इंडिजची संपूर्ण टीम आली होती. मी हे कधीच विसरू शकणार नाही. फक्त त्यांचे चार वेगवान गोलंदाज नव्हते. त्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की सर्वोत्तम फलंदाज असूनही त्यांची संपूर्ण टीम 184 धावा काढू शकली नाही."

इंदिरा गांधींनी घेतली भेट

भारतीय टीम मुंबईत दाखल झाली तेव्हा मुसळधार पावसात पन्नास हजार प्रेक्षकांनी वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये टीमचं स्वागत केलं.

'Straight From The Heart' या आपल्या आत्मचरित्रात कपिल देव यांनी लिहिलं आहे, "इंदिरा गांधी यांना भेटण्यापूर्वी गावस्कर श्रीकांतला म्हणाले होते, की तुला डोळे मिचकावण्याची आणि नाक हलवण्याची वाईट सवय आहे. इंदिराजींसमोर स्वतःवर ताबा ठेव आणि नीट वाग. श्रीकांत म्हणाले, की ठीक आहे. इंदिरा गांधी गावस्करशी बोलत असताना श्रीकांत आपल्याकडून काही चूक घडू नये, याची पूर्ण काळजी घेत होते. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की इंदिरा गांधी यांनाही श्रीकांतप्रमाणे डोळे बंद करण्याची सवय आहे. त्या श्रीकांतजवळ पोचल्या तेव्हा त्यांनी डोळे बंद केले. तोवर श्रीकांतचंही नियंत्रण सुटलं होतं आणि त्यांनंही डोळे मिचकावत नाक हलवलं. आम्ही सर्व याच काळजीत होतो की इंदिरा गांधी यांना असं वाटायला नको की श्रीकांत त्यांची टिंगल करताहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)