You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : भारताने हल्ला केला तर तयारीत राहा, इम्रान खान यांचा लष्कराला आदेश
जर भारत आक्रमक बनला आणि हल्ला केला तर त्यांचा निकराने सामना करा, भारताच्या कृत्याचा योग्य समाचार घ्या असा आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला असल्याचं पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूननं म्हटलं आहे.
काश्मीरमध्ये पुलवामात CRPF जवानांवर हल्ला झाला. त्या हल्ल्यात 40 हून अधिक जवानांनी प्राण गमावले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी काश्मीरचा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींचा वेध घेतला. कोणतीही चौकशी न करता भारताने पाकिस्तानवर टीका केल्याचं इम्रान खान म्हणाले.
"काश्मीरमध्ये झालेल्या घटनेचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. या हल्ल्याचा कट भारतातच रचला गेला. त्याची अंमलबजावणीही भारतातच झाली. पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने दहशतवादाचा बिमोड करण्याचं कार्य जलदगतीने करावं," असं या बैठकीत इम्रान खान यांनी सांगितल्याचं एक्सप्रेस ट्रिब्यूननं म्हटलं आहे.
पाकिस्ताननं भारताला सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला भारतानं सकारात्मकतेनं घ्यावं असं देखील इम्रान खान यांनी बैठकीत म्हटल्याचं . पाकिस्तानचं वृत्तपत्र डेली टाइम्सनं म्हटलं आहे. भारतानं जर पुरावा दिला तर गुन्हेगारांना आम्ही शिक्षा करू अशी चर्चा झाली.
मात्र, काश्मीरमधील लोकांना मृत्यूची भीती का वाटते याचं आत्मपरीक्षण भारतानं करावं असं देखील या बैठकीत इम्रान खान म्हणाले.
'भारतानं सारासार विचार करून भूमिका घ्यावी'
अशा कठीण परिस्थितीमध्ये भारतानं संवेदनशीलतेनं वागावं असा सल्ला डेली टाइम्सनं आपल्या अग्रलेखात दिला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यानंतर जे वक्तव्य केलं त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात बोलण्याची घाई केली. पाकिस्ताननं दहशतवादविरोधी भूमिका घेतली आहे याचा विचार भारतानं करावा असं देखील यात म्हटलं आहे.
पाकिस्ताननं दहशतवादविरोधात भूमिका घ्यावी याचा पुनरूच्चार भारतीय परराष्ट्र खात्यातील मुत्सद्द्यांनी केला पण गेल्या 10 वर्षांपासून आम्ही हेच करत आहोत असं डेली टाइम्सनं म्हटलं आहे.
जर भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या वक्तव्यांवर ताबा ठेवावा आणि आपला फाजिल देशाभिमान बाजूला ठेऊन अर्थपूर्ण बोलणी केली तर ती दोन्ही देशांच्या फायद्याची राहील असा चिमटा देखील डेली टाइम्सनं काढला आहे.
भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला भीती?
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला भारताकडून हल्ला होईल अशी भीती वाटत आहे.
त्या भीतीमुळे पाकिस्ताननं लष्कराला सावध राहा असा इशारा दिला आहे तसेच रुग्णालयांना देखील तयार राहावं असं सूचवण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हाती दोन महत्त्वपूर्ण कागदपत्रं लागली आहेत. त्या आधारावर त्यांनी हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील लष्करी तळावरील अधिकाऱ्यांनी जिलानी रुग्णालयाला पत्र पाठवलं आहे. जर भारतासोबत युद्धाची स्थिती उद्भवली तर सिंध आणि पंजाब प्रांतातील रुग्णालयं सज्ज ठेवावीत असं म्हटलं आहे.
(या बातमीसाठी बीबीसी मॉनिटरिंगने इनपुट दिले आहेत. बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)