डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांची भेट व्हिएतनाममध्ये का होत आहे?

मार्च 1965मध्ये अमेरिकन सैन्यानं दक्षिण व्हिएतनाममधल्या डानांग या शहरात पहिल्यांदा पाय ठेवलं होते. त्यानंतर या युद्धात दोन्ही देशांची मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली होती.

आता 44 वर्षांनंतर, याच शहरात व्हिएतनामचा कट्टर विरोधी अमेरिका आणि शीत युद्धातला मित्र देश उत्तर कोरिया एकत्र येणार आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे येत्या 27-28 फेब्रुवारीला व्हिएतनामध्ये दुसऱ्यांदा भेटणार आहेत.

भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेला कम्युनिस्ट व्हिएतनाम आता दोन्ही देशांचा म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचा मित्र देश मानला जात आहे.

या भेटीसाठी डानांग किंवा हॅनोई यापैकी एक ठिकाण निश्चित केलं जाणार आहे.

ट्रंप - किम भेटीसाठी व्हिएतनामच का?

"ट्रंप-किम भेटीसाठी व्हिएतनाम हा तटस्थ देश मानला जात आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या भेटीच्या सर्व आवश्यक गोष्टी व्हितनाममध्ये पूर्ण होत आहेत," असं व्हिएतनाम राष्ट्राचे विश्लेषक कार्ल थेयर यांनी बीबीसीला सांगितलं.

थेयर हे ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये प्राध्यापक आहेत.

"व्हिएतनाममधली ट्रंप-किम भेट ही केवळ प्रतिकात्मक नाहीये. या भेटीसाठी व्हिएतनाम हा देश संपूर्ण सुरक्षा पुरवू शकतो, हे यातून दाखवायचं आहे. व्हिएतनाम हा तटस्थ असल्याचं दोन्ही पक्षांनी मान्य केलं आहे," असं ते पुढे म्हणाले.

किम यांनी व्हिएतनामवर सहमती का दर्शवली?

किम यांना व्हिएतनामला जाण्यासाठी चीनमार्गे सुरक्षित विमान प्रवास करता येणार आहे. दोन्ही देशांसोबत उत्तर कोरियाचे चांगले संबंध आहेत, असं प्रा. थेयर सांगतात.

"उत्तर कोरिया एकाकी पडलेला नाहीये," हे व्हिएतनाम भेटीतून किम यांना दाखवायचं आहे. किम यांनी व्हिएतनामच्या विकासाचा अभ्यास केला आहे. या भेटीत त्यांना हा विकास प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

"व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची पार्श्वभूमी. त्यानंतर सुधारलेले द्विपक्षीय संबंध आणि मुक्त व्यापारबाबतची चर्चा या सगळ्या गोष्टी उत्तर कोरियन सरकारच्या हिताच्या आहेत, असं थेयर यांना वाटतं."

व्हिएतनाम देशाचे अभ्यासक आणि ISEAS-Yusof Ishak Institute, सिंगापूर येथील प्रा. ली हाँग हिएप यांनी AFPला सांगितलं, "व्हिएतनामची प्रगती पाहण्यासाठी किम उत्सुक असणार आहेत. त्यातून त्यांना स्फूर्ती मिळेल आणि उत्तर कोरियाची प्रगतीसाठी नवी दिशा मिळेल."

ट्रंप व्हिएतनाममध्ये भेटण्यासाठी का तयार झाले?

जर किम यांना व्हिएतनामच्या यशामधून स्फूर्ती मिळत असेल तर हा मुद्दा अमेरिकेच्या फायद्याचा ठरू शकतो.

एक 'समाजवादी अर्थव्यवस्था' उभारण्याच्या उद्देशाने 1986मध्ये व्हिएतनाममध्ये आर्थिक सुधारणा कार्यक्रम करण्यात आल्या. याला म्हणूनही ओळखलं जातं. आता व्हिएतनामची आर्थिक व्यवस्था ही आशियतली सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहे.

किम (व्हिएतनामच्या विकासाचा) असाच "चमत्कार" उत्तर कोरियात करू शकतात, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार सचिव माइक पाँपेओ यांनी 2018मध्ये व्हिएतनाममध्ये म्हटलं होतं.

2017मध्ये Asia-Pacific Economic Cooperation (APEC) परिषदेसाठी ट्रंप व्हिएतनामला आले होते. त्यामुळे आता हा देश त्यांच्यासाठीही एक कम्फर्ट झोन झाला आहे, असं प्रा. थेयर सांगतात.

"अमेरिकेला माहिती आहे की विनाशकारी शस्त्रावर बंदी घालण्याच्या त्यांच्या मागणीला व्हिएतनामचा पाठिंबा आहे. तसंच UNने उत्तर कोरियावर घातलेल्या निर्बंधांवरही व्हिएतनाम अमेरिकेशी सहमत आहे," असं प्रा. थेयर सांगतात.

या ऐतिहासिक भेटीद्वारे व्हिएतनाम जगाचं लक्षं वेधण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे हा देश राजनैतिक संबंध तसंच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असेल.

दरम्यान, दक्षिण कोरियानेही व्हिएतनाममध्ये होणाऱ्या या ट्रंप-किम भेटीचं स्वागत केलं आहे. "एकेकाळी एकमेकांच्या जिवावर उठलेले अमेरिका आणि व्हिएतनाम आज मित्रराष्ट्र आहेत. आम्ही आशा करतो व्हिएतनाममध्ये आता उत्तर कोरिया आणि अमेरिका इतिहास घडवतील," असं दक्षिण कोरियाच्या सरकारचे प्रवक्ते किम फुई-क्योम म्हणाल्याचं योन्हाप वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)