डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन व्हिएतनाममध्ये पुन्हा भेटणार

उत्तर कोरियाच्या नेत्यांबरोबर या महिन्यात दुसरी परिषद आयोजित करणार आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या वार्षिक भाषणात म्हटलं आहे.

Choosing Greatness अशी यावर्षीच्या भाषणाची थीम होती.

मी 27 आणि 28 फेब्रुवारीला किम जाँग-उन यांना व्हिएतमानमध्ये भेटणार आहे, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी या दोन नेत्यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर दुसऱ्या परिषदेचं आयोजन करण्याविषयी चर्चा सुरू होती.

गेल्या वर्षी जून महिन्यात सिंगापूरमध्ये झालेली ट्रंप आणि किम यांची बैठक ही अमेरिकेचे कार्यरत राष्ट्राध्यक्ष आणि कोरियाच्या नेत्यांमधली पहिली बैठक ठरली होती.

"आमचे बंधक घरी परतले आहेत, अणुचाचण्यांचं परीक्षण थांबवण्यात आलं आहे, तर गेल्या 15 महिन्यांत मिसाईल चाचणी घेण्यात आलेली नाही," असं मंगळवारी ट्रंप यांनी म्हटलं आहे.

"जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलो नसतो, तर अमेरिका आणि कोरिया यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असती," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

"अजून बरंच काम शिल्लक आहे, पण माझं आणि किम यांचं नातं चांगलं आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

याशिवाय मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचाही ट्रंप यांनी भाषणात उल्लेख केला आहे. या प्रकारच्या सीमेला अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी पाठिंबा दिला आहे, असं त्यांनी म्हटलं.

"अतिशय गंभीर अशा सीमेवर नियंत्रण मिळवण्यास देश अयशस्वी ठरल्यामुळे अजून एकासुद्धा नागरिकाला आता जीव गमावावा लागू नये," असंही त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)