You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियाची तंत्रज्ञान क्षेत्रात जोरदार मुसंडी मारण्याची तयारी
- Author, प्रतिक जखार
- Role, ईस्ट एशिया स्पेशालिस्ट, बीबीसी मॉनिटरिंग
उत्तर कोरिया आपल्या संरक्षण सिद्धतेचं नेहमीच प्रदर्शन करत आला आहे. मात्र तिथं हल्ली नागरी वापरासाठीचं तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर दिला जातोय. किमान उत्तर कोरियाचा तसा दावा आहे.
उत्तर कोरियातील इतर अनेक बाबींप्रमाणेच या दाव्याची सतत्या पडताळणंही कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानाला जे महत्त्व दिलं जात आहे, त्याची नोंद करणं गरजेचं आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसार माध्यमांमध्ये नुकतंच 'इंटेलिजंट होम सिस्टिम' सह इतर अनेक प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं यश साजरं करण्यात आलं.
अशाप्रकारे यश साजरं करण्यामागे गाजावाजा हे कारण तर आहेच. मात्र देशाचे सर्वेसर्वा असलेले किम जाँग-उन यांचा जो अर्थव्यवस्था बळकट करण्याचा उद्देश आहे, त्यासाठी उत्तर कोरिया आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावरही लक्ष केंद्रीत करत असल्याचं यातून स्पष्ट होतं.
तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य खरंच वाढत आहे?
याच प्रगतीतलं एक पाऊल म्हणजे 'मीर' (Mirae) ही नवी वायफाय सेवा. या सेवेमार्फत प्याँगयांगमध्ये सरकारनं मान्यता दिलेलं इंट्रानेट नेटवर्क मोबाईवर वापरता येतं.
सरकारी मालकीच्या कोरियन सेंट्रल टिव्ही चॅनलवर 8 नोव्हेंबर रोजी 'Exhibition of IT Successes' या कार्यक्रमादरम्यान Arirang 171 या स्मार्टफोनवर 'मीर' वायफाय सेवेचा वापर दाखवण्यात आला.
उत्तर कोरियाच्या प्रसार माध्यमामध्ये पहिल्यांदाच बाहेरच्या वायफाय सर्व्हिसविषयी माहिती देण्यात आली आहे आणि ती देशात वायरलेस डेटा सर्व्हिस देणाऱ्या इतर दोन सेल्युलर नेटवर्कला समांतर अशी आहे, असं अमेरिकेतली देखरेख ठेवणारी वेबसाईट 38Northने सांगितलं आहे.
या प्रदर्शनात जे दुसरं यंत्र दाखवण्यात आलं ते होतं 'इंटेलिजन्स होम सिस्टिम'. हे असं यंत्र आहे जे मानवी आवाज ओळखून पंखा, एसी, टिव्ही आणि लाईट्स यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं स्वतः हाताळतं. जसं गुगल होम किंवा ऍलेक्स काम करतं.
ही यंत्रणा किम II-संग विद्यापीठाने विकसित केलेली आहे. देशाला हाय-टेक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेण्याच्या प्रयत्नात हे विद्यापीठ अग्रस्थानी आहे.
या विद्यापीठातल्या संशोधकांनी अनेक आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा (advanced artificial intelligence systems) विकसित केल्याचं DPRK टुडे या जाहिरात करणाऱ्या वेबसाईटनं प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे. कोरियन भाषेतील आदेशही या यंत्रणेला समजू शकतात, असंही त्यात म्हटलं आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी आणि देशात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उद्योगाची उभारणी करण्यासाठी विद्यापीठातील इंटेलिजेंट टेक्नॉलॉजी इन्स्टीट्युट पेटून उठल्याचं सत्ताधारी मजूर पक्षाचं (वर्कर्स पार्टी) मुखपत्र असलेल्या रोडोंग सिनमनमध्ये 2 नोव्हेंबर रोजी छापून आलेल्या बातमीत म्हटलं आहे.
प्रसार माध्यमांमध्ये ज्या सेवांविषयी माहिती देण्यात आली, "ती खरी आहे आणि किमान प्याँगयांगमधले लोक तरी ते रोजच्या जगण्यात वापरतील", असं उत्तर कोरियाचा टेक ब्लॉग चालवणारे मार्टिन विलियम्स यांनी बीबीसीला सांगितलं.
"उत्तर कोरियाकडे कुशल स्वाफ्टवेअर आणि सिस्टीम इंजिनिअर्स आहेत. त्यामुळे बातम्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या स्वाफ्टवेअरविषयी माहिती देण्यात आली, ती खरी आहे आणि DPRK (Democratic People's Republic of Korea, कोरियाचं अधिकृत नाव)मध्ये ती लिहिण्यात आली आहे."
चौथी औद्योगिक क्रांती
अर्थव्यवस्थेची पुनर्रचना आणि 'राष्ट्रीय क्षमते'ला प्रोत्साहन देणं, ही तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यामागची प्रेरणा आहे.
शिक्षण आणि विज्ञान "राष्ट्र उभारणीचा पाया आणि राष्ट्रीय ताकदीचे महत्त्वाचे घटक असायला हवे" आणि "विज्ञान आणि शिक्षण कार्यात क्रांतीकारी बदल करायला हवा", असं राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांनी एप्रिलमध्ये झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत म्हटलं होतं. KCNA या सरकारी न्यूज संस्थेने हे सांगितलं आहे.
वैज्ञानिक समाज निर्माणासाठी उत्तर कोरियाने शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर असलेल्यांना मोठमोठी घरं आणि इतर सोयीसुविधांसारख्या बऱ्याच सवलती द्यायला सुरुवात केली आहे.
उत्तर कोरियामधली प्रसारमाध्यमं विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसतंय.
29 ऑक्टोबर रोजी रोडोंग सिनमनमध्ये अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक असलेले रि-कि साँग यांचा एक लेख छापून आला आहे. त्यात ते म्हणतात, "उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेचं रुपांतर अत्याधुनिक ज्ञान असलेल्या अर्थव्यवस्थेत झालं पाहिजे."
त्यांनी विशेषतः माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि इतर अत्याधुनिक विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे.
दक्षिण कोरियाच्या याँग्नम विद्यापीठातले प्राध्यापक लीम उल-चुल म्हणतात, "बड्या उद्योगांमुळे आर्थिक भरभराटीला वेग येतो, हे सर्वांना माहीत आहे. उत्तर कोरिया चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे." 21 नोव्हेंबरला यॉनहॅप वृत्त संस्थेने हे वृत्त दिलं आहे.
'संतुलन साधणं कठीण'
दक्षिण कोरियाप्रमाणे तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल अशी काही उत्तर कोरियाची ओळख नाही. त्यामुळे संशयाला जागा आहे.
विलियम्स सांगतात, "अत्याधुनिक उत्पादन निर्मितीची उत्तर कोरियाची फारशी क्षमता नाही. त्यामुळे जे फोन आणि कंप्युटर देशांतर्गत तयार केले, असं सांगितलं जातं, ते खरं म्हणजे चीनमध्ये उत्पादित केलेले असतात."
उत्तर कोरियाने SiliVaccine या उपकरणासाठी आमची बौद्धिक संपदा (intellectual property) किंवा सोर्स कोड बेकायदेशीरपणे चोरला, असा आरोप मे 2018 मध्ये जपानच्या ट्रेन्ड मायक्रो या अँन्टी-वायरस कंपनीने केला होता.
गेल्या वर्षी उत्तर कोरियामधल्या प्रसारमाध्यमांनी देशांतर्गत बनवलेल्या टॅबलेटसाठी आयपॅड हे नाव वापरलं होतं. त्याला 'याँह्गून आयपॅड' असं नाव देण्यात आलं होतं.
2017साली NK न्यूज वेबसाईटवर म्हटलं होतं, "थेट कॉपी करून तयार केलेली उत्पादन ते आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आणत आहेत. नावाजलेल्या 'आयपॅड' सारख्या ट्रेडमार्क असलेल्या नावांचा वापर करून ते महागड्या वस्तूंच्या नकला करत आहेत."
तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करताना उत्तर कोरियाने खरेपणाची साथ सोडलेली दिसतेय.
ओढून-ताणून मिळवलेलं अर्थसहाय्य, कठीण आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यामुळे उत्तर कोरियाच्या कृत्रिम बुद्धिमता उद्योगला खीळ बसण्याची शक्यता आहे, असं 2017मध्ये सेऊलमधल्या कोरिया डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.
त्यात विलियम्स भर घालतात. ते म्हणतात, "निर्बंध उठवले तरीसुद्धा आपली प्रतिमा डागाळेल या भीतीमुळे काही देश आणि कंपन्या उत्तर कोरियासोबत व्यापार करणं टाळतील."
"सरकारने प्रोत्साहन दिलं तर दक्षिण कोरियातील कंपन्याच उत्तर कोरियात सर्वाधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे," असा विश्वास ते व्यक्त करतात.
उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑटोमॅटिक कार, 3D प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि गेमिंग तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी 15 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील टेक्नॉलॉजी हब असलेल्या पँन्ग्यो टेक्नो व्हॅलीला भेटही दिली होती.
याशिवाय उत्तर कोरिया आपली माहिती इतर कुणालाही कळू देत नाही, त्यांची हीच मानसिकता नवनिर्मितीच्या मार्गातला अडथळा ठरू शकते.
विलियम्स म्हणतात, "देशाचा ताबा आपल्या हातात ठेवत माहिती आणि चांगल्या आयुष्याची जनतेची गरज भागवण्यासाठी लहान लहान पावलं उचलणं, हाच उत्तर कोरियासाठी सर्वांत मोठा आशेचा किरण आहे."
(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)