अल्झारी जोसेफ: आई गेल्यानंतर काही तासांतच तो बॅटिंगसाठी मैदानात उतरला

अल्झारी जोसेफ - वेस्ट इंडिजचा 22 वर्षांचा हा तरणाबांड बॉलर. भन्नाट वेगाने भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या अल्झारीसाठी रविवारचा दिवस एक अत्यंत वाईट बातमी घेऊन उजाडला. ती बातमी होती त्याची आई गेल्याची.

मायदेशातच नॉर्थ साऊंड इथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसरी टेस्ट मॅचमध्ये अल्झारी खेळत होता. पण त्याने खेळण्याचं कर्तव्य सोडलं नाही.

अल्झारीची आई शॅरोन जोसेफ यांना ब्रेन ट्युमर झाला होता. त्यावर उपचारही सुरू होते. मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

कुठल्याही व्यक्तीसाठी हा धक्का पचवणं अवघडच. अवघ्या तासात खेळ सुरू होणार होता. वेस्ट इंडिजच्या संघाने अल्झारीचं सांत्वन केलं. त्याच्या आईला त्यांनी सगळ्यांनी मिळून आदरांजली वाहिली. मॅच सोडून अल्झारी घरी परतेल, अशी स्थिती होती. ते साहजिकही होतं. म्हणून "तुला खेळायलाच हवं असं अजिबात नाही. तू आईचं शेवटचं दर्शन घ्यायला जाऊ शकतोस," असं वेस्ट इंडिज संघानेही त्याला सांगितलं.

पण अल्झारीने हाती असलेल्या कर्तव्याला न्याय द्यायचं ठरवलं. त्याने खेळण्याचा निर्णय घेतला.

खेळ सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाने वॉर्मअप केला आणि हडल केलं, त्यावेळी अल्झारीला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. अल्झारीच्या आईला आदरांजली म्हणून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दंडाला काळी फित बांधली. खेळ सुरू झाल्यानंतर तासाभराच्या आत अल्झारी फलंदाजीला उतरला.

कर्तव्याप्रति त्याच्या निष्ठेसाठी मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून अभिवादन केलं. अल्झारीने 7 धावा केल्या. या धावांपेक्षा त्याने दाखवलेल्या धैर्याची सोशल मीडियावर चर्चा होती.

बॅटिंग झाल्यावरही अल्झारी घरी परतला नाही. बॉलिंग करताना त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला माघारी धाडलं. भारतासाठी विराट कोहली जसा, तसा इंग्लंडसाठी रूट आहे. त्यामुळे मॅचचं पारडं वेस्ट इंडीजकडे झुकवण्यात या विकेटचं महत्त्व मोलाचं होतं.

शिवाय, अल्झारीने पदार्पणवीर जो डेन्ली यालाही तंबूचा रस्ता दाखवला. अर्थातच अल्झारीने या विकेट्सचं सेलिब्रेशन केलं नाही. वेस्ट इंडिजच्या संघाने दिमाखदार खेळ करत तिसऱ्याच दिवशी सामना जिंकला.

पण वयाच्या 22व्या वर्षी आईचं छत्र हरवलेल्या अल्झारीच्या कणखर मानसिकतेचं जगभरातून कौतुक होत आहे.

माजी खेळाडू आणि समालोचक इयन बिशप यांनीही अल्झारीचं मॅच सुरू होण्यापूर्वी सांत्वन केलं.

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक मायकल वॉन यानेही ट्वीट करून त्याचं बळी दिला.

भारताचेही माजी खेळाडू VVS लक्ष्मण आणि मोहम्मद कैफ यांनीही त्याचं कौतुक केलं.

''अल्झारीची आई गेल्याची बातमी कळल्यानंतर खेळायला उतरणं आम्हा सगळ्यांसाठी कठीण होतं. त्याला आधार देणं आवश्यक होतं. त्याच्या आईसाठी आम्हाला ही मॅच जिंकायची होती. आई गेल्याची बातमी समजल्यानंतरही अल्झारी संघासाठी थांबला. त्याने धावाही केल्या, विकेट्सही काढल्या. त्याच्या मनोधैर्याला सलाम'', अशा शब्दांत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)