You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणजी फायनल: विदर्भाचा वासिम जाफर की सौराष्ट्रचा चेतेश्वर पुजारा - कोण मारणार बाजी?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आपल्या खास पारंपरिक शैलीसाठी ओळखले जाणारे चेतेश्वर पुजारा आणि वासिम जाफर आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. लक्ष्य एकच - रणजी करंडक.
वयाच्या चाळिशीत असलेला जाफर विदर्भाची रनमशीन आहे तर ऑस्ट्रेलिया गाजवून परतलेला पुजारा सौराष्ट्रासाठी आधारवड. बॅटिंग कशी करावी आणि कशी करू नये, याचं चालतंबोलतं उदाहरण असलेल्या या जोडगोळीतलं द्वंद्व दर्जेदार मेजवानी आहे.
टीकाकारांना फक्त बॅटनेच उत्तर देणाऱ्या या दोघांचा प्रवासही प्रेरणादायी आहे.
ही गोष्ट आहे साधारण तीन वर्षांपूर्वीची. स्थानिक क्रिकेटमधली रणजी करंडक स्पर्धा सगळ्यांत प्रतिष्ठेची स्पर्धा. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा नावावर असणाऱ्या वासिम जाफरचं नशीब रुसलं होतं. टीम इंडियासाठी सलामीवीराची भूमिका निभावलेला वासिम वर्षानुवर्षे मुंबई क्रिकेटचा आधारस्तंभ होता. वासिम एका सरकारी कंपनीसाठी करारबद्ध होता.
क्रीडापटूंना भरती करण्याचं अनेक कंपन्यांचं धोरण असतं. खेळत असताना या खेळाडूंना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे दररोज येऊन विशिष्ट काम करण्याची सक्ती नसते, कारण त्यांचा बहुतांश वेळ सराव, स्पर्धा आणि प्रवासात जातो. मात्र decategorised झाल्यानंतर, म्हणजे एखादा खेळाचा हंगाम पूर्ण हुकल्यानंतर खेळाडूला अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करावं लागतं.
मात्र दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू न शकल्याने वासिमला अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करायला सांगण्यात आलं. मात्र वासिमला खेळायचं होतं.
मुंबई क्रिकेटपासून दुरावलेल्या वासिमने अन्य संघटनांशी संपर्क साधला. त्याने मित्रांशी चर्चाही केली. नावावर तगडी आकडेवारी असतानाही वासिमला अनेक नकार मिळाले. अनेक वर्षं तळपत्या उन्हात, जिवंत खेळपट्टयांवर, चांगल्या गोलंदाजांविरुद्ध ओतलेल्या धावांच्या राशी उपयोगाच्या ठरणार नाहीत, असं चित्र होतं.
मात्र त्याच वेळी एक आशेचा किरण प्रकटला. उत्तम संघबांधणी झालेल्या विदर्भ संघाला एका सीनियर खेळाडूची आवश्यकता होती, जो बॅटिंग तर करेलच मात्र त्याहीपेक्षा युवा खेळाडूंसाठी मेंटॉर म्हणूनही महत्त्वाचा असेल.
वासिमला विदर्भच्या रूपात हक्काचा संघ मिळाला आणि विदर्भला भक्कम असा आधारवड मिळाला.
मूळच्या त्या भागातल्या नसलेल्या, संघटनेशी संलग्न नसलेल्या मात्र संघाची गरज म्हणून घेण्यात येणाऱ्या खेळाडूला 'प्रोफेशनल प्लेयर' म्हटलं जातं. रणजी क्रिकेटमध्ये खेळणारे संघ संघाला बळ मिळवून देण्यासाठी प्रोफेशनल खेळाडूंना संघात समाविष्ट करतात. त्या खेळाडूला पैसे मिळतात आणि संघाला अनुभवी खेळाडू मिळतो.
जाफरने प्रोफेशनल प्लेयर म्हणून मिळणारं वेतन नाकारलं. मला खेळायला संधी द्या, तेवढं पुरेसं आहे, असं जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनला सांगितलं. तेव्हापासून जाफर आणि विदर्भचे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच.
पस्तिशी ओलांडल्याने शरीराच्या कुरबुरी होत्या. रणजीचा पूर्ण हंगाम खेळायचा असेल तर फिटनेस पक्का हवा, हे जाणून वासिमने दरवर्षीप्रमाणे इंग्लंड गाठलं. इंग्लंडमध्ये एका स्थानिक लीगसाठी वासिम खेळतो.
याबरोबरीने त्याने ट्रेनरच्या मदतीने व्यायाम आणि आहाराचं वेळापत्रक आखलं. जिममध्ये तासन तास देतानाच वासिमने खाण्यापिण्याचं कडक पथ्य पाळायला सुरुवात केली. वासिमने जंक फूड पूर्णत: बंद केलं. पिझ्झा-बर्गरसदृश सगळं त्याने सोडून दिलं. आता तर तो संध्याकाळी सहानंतर काही खातही नाही.
वासिम कधीच 'सिक्स पॅकअॅब्स' दाखवणाऱ्या खेळाडूंपैकी नव्हता. मात्र तीन महिन्यांच्या रणजी हंगामासाठी आपण शारीरिकदृष्ट्याही कणखर असायला हवं, हे जाणून वासिम जिममध्ये रीतसर घाम गाळतो.
या सगळ्याचा परिणाम वासिमच्या गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्याही कामगिरीत दिसतो आहे. वासिमने हंगामात हजार धावांचा टप्पा पार केला. रणजी स्पर्धेत अकरा हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.
वासिमचे समकालीन खेळाडू कॉमेंट्री किंवा कोचिंगमध्ये स्थिरावले आहेत. मात्र वासिम अजूनही खेळतो आहे. आणि केवळ शोभेसाठी नाही तर खोऱ्याने धावा करत संघाच्या विजयात सातत्याने योगदान देतो आहे. यंदाच्या रणजी हंगामात वासिमच्या धावा आहेत- 34, 206, 98, 178, 126, 30, 13, 0, 153, 41, 34, 27, 63.
प्रेक्षकांचं मन रिझवण्यासाठी काहीतरी अतरंगी, आकर्षक फटके मारणाऱ्यांपैकी वासिम नाही. मॅचमधली परिस्थिती काय, खेळपट्टीचा नूर कसा आहे, गोलंदाजी कशी आहे, हे समजून घेऊन शास्त्रोक्त इनिंग्ज बांधणाऱ्यावर वासिमचा विश्वास आहे.
IPL आणि त्याधर्तीवर जगभरात पेव फुटलेल्या ट्वेन्टी-20 लीगमुळे कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा, हे समीकरण रुळताना दिसत आहे. अशा बॅटिंगमध्ये अनाठायी धोका पत्करणं अपेक्षित असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान वगैरे तत्त्वांपेक्षा येणारा प्रत्येक चेंडू बाउंड्रीबाहेर पिटाळणं, हे बॅट्समनसाठी महत्त्वाचं कौशल्य झालं आहे.
भारतासाठी, मुंबईसाठी आणि विदर्भासाठी खेळलेला वासिम IPLमध्येही होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून पहिल्या दोन हंगामांमध्ये जेमतेम आठ सामने तो खेळला. मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून, शिस्तबद्ध इनिंग्ज उभारण्याच्या कौशल्यावर त्याचा आजही विश्वास आहे. त्यामुळेच त्याला 16.25च्या सरासरीने या आठ सामन्यांमध्ये एकूण 130 धावा काढल्या. त्यातही एक अर्धशतक होतं, हे विशेष.
पण पारंपरिक फॉर्मॅटमध्ये वयाच्या चाळिशीतही तो अवघड खेळपट्यांवर, चांगल्या बॉलिंगसमोर धावा करतो आहे. तो कालबाह्य होत नाही.
रणजी स्पर्धेत 11,000 धावा त्याच्या नावावर आहेत. रणजी स्पर्धेत सर्वाधिक मॅचेस खेळण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. यंदाच्या हंगामात हजार धावांचा टप्पाही जाफरने ओलांडला आहे. आजकाल त्याची प्रत्येक धाव कुठला ना कुठल्या विक्रमाला गवसणी घालते.
स्थानिक क्रिकेटमधल्या दुर्लक्षित संघापैकी विदर्भ एक होता. या संघात अनेक गुणी युवा खेळाडू आहेत. फैझ फझल आणि उमेश यादव यांनी विदर्भ संघाला बैठक प्राप्त करून दिली आहे. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि अनुभवी खेळाडू वासिम जाफर या मुंबईकरांनी विदर्भाला बळकटी दिली.
गेल्या वर्षी विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. विदर्भचं कौतुक झालं, मात्र ते one season wonder आहेत, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळांमध्ये होती. मात्र यंदाही दमदार खेळ करत विदर्भाने अंतिम फेरी गाठली आहे.
नागपूरच्या जामठा स्टेडियमवर अर्थात घरच्याच मैदानावर त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे सौराष्ट्रचं.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न तब्बल 72 वर्षांनी पूर्ण झालं. प्रत्येक कसोटीत खेळपट्टीवर ठाण मांडून मॅरेथॉन खेळी रचणारा चेतेश्वर पुजारा या ऐतिहासिक मालिका विजयाचा शिल्पकार ठरला.
या मालिकेपूर्वी सगळी चर्चा विराट कोहलीभोवती केंद्रित होती. कोहलीला ऑस्ट्रेलियात धावा करायला आवडतात. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला पुरून उरत बॅटने चोख उत्तर देणं विराटला आवडतं. म्हणूनच या मालिकेपूर्वीच्या जाहिरातींचं स्वरूप कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया असं होतं.
पण मालिकेअखेरीस सगळीकडे चेतेश्वर पुजाराच्याच नावाची चर्चा होती. धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पुजाराला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्काराने गौरवण्यात आलं. तो दिवस होता - 7 जानेवारी.
15 जानेवारीला पुजारा लखनौत सौराष्ट्रच्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये खेळत होता. ऑस्ट्रेलियाहून घाईने परतण्याचं कारण होतं - सौराष्ट्र संघाला रणजी जेतेपद खुणावत होतं.
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नामोहरम करणारा पुजारा संघात आला तर सौराष्ट्रचं पारडं बळकट होणार होतं. ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचे रोमांचकारी क्षण मनात जपून ठेवत पुजारा थेट सौराष्ट्रसाठी खेळायला उतरला. जेट लॅगचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता, कारण धड झोपच झाली नव्हती.
पहिल्या डावात पुजाराला लौकिकाला साजेशा खेळ करता आला नाही. मात्र पुढच्या दोन दिवसात झोपेचा कोटा पूर्ण केलेल्या पुजाराने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.
कर्नाटकच्या रूपात उपांत्य फेरीत सौराष्ट्रसमोर खडतर आव्हान होतं. मॅचवर कर्नाटकने घट्ट पकड मिळवत सौराष्ट्रला जिंकण्यासाठी 279 धावांचं लक्ष्य दिलं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी खेळायला अवघड होत जाते. रनरेट चांगला राखणं आवश्यक होतं आणि विकेट्स गमावूनही चालणार नव्हतं.
पुजारा आणि शेल्डन जॅक्सन यांनी शतकी खेळी साकारत सौराष्ट्रला थरारक विजय मिळवून दिला. पुजाराने 449 मिनिटं खेळपट्टीवर ठाण मांडत नाबाद 131 धावांची खेळी साकारली. अंपायर्सच्या निर्णयामुळेही ही मॅच चांगलीच चर्चेत राहिली.
ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर सौराष्ट्रसाठी खेळण्याच्या पुजाराच्या निर्णयाचं राहुल द्रविडनेही कौतुक केलं. "ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर लगेच सौराष्ट्रसाठी खेळायला उतरण्याचा पुजाराचा निर्णय कौतुकास्पद आहे. पुजारा हे दाखवण्यासाठी किंवा प्रतीकात्मक खेळणार नाही. तो 100 टक्के पाचही दिवस संघासाठी खेळेल. हे महत्त्वाचं आहे," अशा शब्दांत द्रविडने पुजाराची पाठ थोपटली.
चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होणाऱ्या पुजारासाठी 2018 वर्ष दैदिप्यमान असं ठरलं आहे. वेगवान गोलंदाजी असो किंवा फिरकी तसंच जगातली कोणतीही खेळपट्टी असो- पुजाराचं तंत्र घोटीव आहे, याची प्रचिती वारंवार येते. मात्र धावा करण्याचा पुजाऱ्याच्या वेगाबद्दल सातत्याने चर्चा होते. 'कूर्म गतीने धावा करतो', अशी पुजारावर टीकाही होते.
2018मध्येच इंग्लंड दौऱ्यात अॅजबॅस्टन कसोटीत पुजाराला चक्क वगळण्यात आलं होतं. कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज कोणत्याही संघासाठी महत्त्वाचा असतो. फिट असतानाही पुजाराला वगळल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. पुजाराच्या चाहत्यांची संख्याही किती अफाट आहे, याचा प्रत्यय त्यावेळी आला होता.
संघातून वगळल्यानंतर पुजाराने सोशल मीडियावर थयथयाट केला नाही. पुढच्या टेस्टला त्याला संघात घेण्यात आलं. उर्वरित वर्षात पुजाराची कामगिरी सगळ्यांसमोर आहे.
ओल्ड स्कूल अप्रोचने खेळणाऱ्या पुजारानेच ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाचा पाया रचला. रिव्हर्स स्विच, रिव्हर्स हिट, दिलस्कूप, हेलिकॉप्टर शॉट अशा फटक्यांच्या आहारी न जाता आपल्या विकेटची किंमत ओळखून पुजाराने इनिंग्ज कशी उभारावी याचा वस्तुपाठ ऑस्ट्रेलियात सादर केला.
मालिका संपल्यानंतर कोहलीने समर्पक शब्दांत पुजाराच्या योगदानाचं वर्णन केलं. "पुजाराने आम्हाला संयम शिकवला. पुजारा संघासाठी किती मौल्यवान आहे, हे लोकांना समजत नाही. त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. कामगिरीतून त्याने ते सिद्ध करून दाखवलं," अशा शब्दांत कोहलीने प्रशंसा केली.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर रविवारपासून जाफर आणि पुजारा म्हणजेच पर्यायाने विदर्भ आणि सौराष्ट्र समोरासमोर आहेत. 'ओल्ड स्कूल शैली'चे पाईक असणाऱ्या दोघांपैकी कोण जेतेपद जिंकून देतो, हे पाहणं बावनकशी मेजवानी असणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)