You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शनीच्या कडा अगदीच तरुण! वय फक्त 10 कोटी वर्षं
- Author, जॉनथन अॅमॉस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
अवकाश निरीक्षक, अभ्यासक यांच्या दृष्टीने सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी होय. शनीच्या भोवतीने असलेल्या कडांमुळे शनीचं वेगळंपण खुलून दिसतं. शनीच्या या कडांबद्दल नुकतंच एक संशोधन झालं असून या शनीच्या या कडांचं वय फार जास्त नसल्याचं दिसून आलं आहे. शनीच्या कडांचं वय 10 कोटी वर्षांपेक्षा जास्त नसावं असं संशोधकांचा दावा आहे. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा अजूनही डायनसोरसचं अस्तित्व होतं, तेव्हा या कडा निर्माण झाल्या असाव्यात.
शनीच्या अभ्यासासाठी अमेरिकेने पाठवलेल्या कॅसिनी या यानाने गोळा केलेल्या माहितीतून संशोधकांना हा निष्कर्ष काढला आहे.
2017मध्ये ही मोहीम संपली. मोहीम संपण्यापूर्वी कॅसिनीतून हा शेवटचा डेटा उपलब्ध झाला होता. सापिएन्झा युनिव्हर्सिटी आफ रोममधील प्रा. ल्युसियानो लेस म्हणाले, " शनीच्या कडांबद्दल पूर्वी जे अंदाज बांधले जात होते त्यासाठी बरेच मॉडेल्स वापरले गेले आहेत, त्यात अचुकता कमी होती. आता आपल्याकडे थेट मापनं उपलब्ध आहेत."
या संदर्भातलं संशोधन सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
शनीच्या कडांचं वय किती असेल याबद्दल संशोधकांत नेहमीच मतभेद राहिले आहेत. काहींना असं वाटतं का बर्षाच्या कणांपासून बनलेल्या या सुंदर कडा शनीच्या बरोबरीनेचं म्हणजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या असाव्यात. तर काहींना या कडांची निर्मिती नंतरच्या काळात झाली असं वाटतं.
अमेरिका आणि युरोपची संयुक्त मोहीम असलेल्या कॅसिनी या मोहिमेच्या मदतीने या जुन्या वादावर पडदा पडू शकणार आहे. कॅसिनीने कडा आणि शनीच्या मध्ये असलेल्या ढगाळ भागातून बराच प्रवास केला आहे. यातून बरीच माहिती मिळू शकली आहे. पूर्वी या कडांचं वस्तुमान 15,400,000,000,000,000 टन असल्याचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात हे वजन 20 पट कमी आहे, असं दिसून आलं आहे. शनीच्या कडांत किती धूळ आहे आणि किती वेगाने त्यात धूळ जमा होत आहे, याचा अंदाज संशोधकांनी बांधला आहे. त्यातून संशोधकांनी कडांचं वय किती असेल याचा वेध घेतला आहे.
या कडांचं वय अगदी कमी एक कोटी वर्ष असेल पण ते 10 कोटी वर्षांपेक्षा जास्त नाही. सूर्यमालेचं एकूण वय लक्षात घेतलं तर ही घटना अगदी कालची आहे, असं लेस म्हणाले.
संशोधकांच्या आणखी एका गटाने शनीच्या कडांवर अभ्यास केला आहे. या काडांतील कण किती वेगाने शनीवर आदळत आहेत, याचा अभ्यास या गटाने केला आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला ऑलिंपिकचा स्पर्धेतील स्विमिंगपुलाच्या आकाराशी तुलना करता येईल इतके कण शनीवर आदळत आहेत, असं या संशोधकांनी म्हटलं आहे. म्हणजे येत्या 10 कोटी वर्षांत शनीच्या कडा पूर्णपणे संपून जातील, असं लॅनकॅस्टर विद्यापीठातील संशोधक टॉम स्टॅलार्ड यांनी म्हटलं आहे.
शनीच्या कडा आता जशा दिसतात, त्या 10 कोटी वर्षांपूर्वी जशा दिसत असतील तितक्या प्रभावी नाहीत, असं ते म्हणाले. पण शनीच्या कडांची निर्मिती कशी झाली यावर कॅसिनी माहिती देऊ शकलेलं नाही.
शनीच्या भोवती फिरणाऱ्या चंद्राच्या भूगर्भाच्या अभ्यासातून ही माहिती मिळू शकेल असं ते म्हणाले. शनीच्या ग्रहांच्या खालच्या थरांत या रहस्याचं उत्तर मिळू शकेल, असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)